हा हू करताहेत, डोळ्यातून, नाकातून पाणी येतंय, पण तरीही मिरची, तिखट पदार्थ चवीनं खात आहेत, असे अनेक जण आपल्या अवतीभवती सापडतील. खरं तर तिखट ही चव नव्हे, तर तोंडाचा दाह आहे. मिरची कुळातील वनस्पतींत कॅप्सायसायनॉइड प्रकारची संयुगं असतात. त्यापकी ‘कॅप्सायनिन’ हे संयुग आपल्या वापरातील मिरच्यांत आढळतं. त्यामुळेच मिरचीला तिखटपणा आलेला असतो. आपल्याला असं वाटतं की,  मिरचीच्या बीमध्ये आणि सालीमध्ये जास्त तिखटपणा असतो. पण जास्त तिखटपणा असतो तो मिरचीच्या आतील पांढऱ्या दांडय़ासारख्या भागात.  
तिखटपणा ‘स्कोविल’ या एककात मोजतात. आपल्या भोपळी मिरचीचा तिखटपणा एक स्कोविलपेक्षाही कमी आहे, तर नेहमीच्या वापरातील मिरची १०,००० स्कोविल तिखट असते. अस्सल कॅप्सायनिन १००,०००,००० स्कोविलचं असतं. जर एक लाख पाण्याच्या थेंबांत त्याचा एक थेंब मिसळला आणि या द्रावणाचा एक थेंब जिभेवर ठेवला, तर तोंडाचा जाळ होईलच, पण जिभेवर फोडही येतील.
तोंडाच्या आतील त्वचेशी कॅप्सायनिनचा संपर्क आला की, तेथील वेदना आणि उष्णता ग्रहण करणाऱ्या संवेदी पेशी संवेदना मेंदूपर्यंत पोहोचवतात. म्हणूनच तोंडाची आग होत आहे असं वाटतं.  मेंदूकडे संवेदना पोहोचली की त्याची प्रतिक्रिया म्हणून एंडोर्फिन्स हे पेशींना चेतावणारं विकर स्रवतं. एंडोर्फिन्स हे चांगलं वेदनाशामक तर आहेच पण त्याचबरोबर स्फूर्ती, आनंद देणारंही आहे. मिरची खाल्ल्यामुळे आनंद मिळतो, तो यामुळेच.  
कॅप्सायनिन रेणूंची रचना जलविरोधी आहे.  कॅप्सायनिन रेणू पाण्याच्या रेणूस जोडले जातात, म्हणूनच पाणी प्यायल्यामुळे तोंडातील दाह कमी झाल्यासारखा वाटतो. पण हे रेणू पाण्यात विरघळत नसल्यामुळे पाण्यासह पुन्हा तोंडात पसरतात आणि त्यामुळे दाह तोंडभर पसरतो. त्याऐवजी तूप-लोणी खाल्लं तर मिरचीची दाहकता कमी होते. कॅप्सायनिन मेदात सहज विरघळतं. त्यामुळे तोंडातील कॅप्सायनिन तूप-लोण्यात विरघळून जातं. कॅप्सायनिन इथेनॉलमध्येही विरघळतं; त्यामुळं अल्कोहोलिक पेयांमुळेही मिरचीची आग कमी होते.
चारुशीला जुईकर (मुंबई)  मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

मनमोराचा पिसारा – मानवी वंशाच्या सर्वनाशाला कारणीभूत कोण?
भूकंप, महापूरसारखे नैसर्गिक उत्पात, महामारी, देवी -प्लेगसारखी रोगराई आणि साथीचे रोग.. असे भयावह विनाश होण्यामागे केवळ अज्ञान, अडाणीपण? की जगाची घडी निसर्ग हेतूत: विस्कटून टाकतो आणि पुन्हा नव्यानं बसवतो? या विनाशामध्ये काही मेथड असू शकते का? वाढती बेसुमार लोकसंख्या आणि अपुरी नैसर्गिक संसाधनं यांच्यात समन्वय आणि समतोल गाठण्यासाठी सृष्टी असे विनाश घडवून आणते का? विज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञान या नैसर्गिक प्रक्रियांमध्ये लुडबूड करत नाही ना?
.. आणि त्याच जैवतंत्रज्ञानाचा (वाईट) उपयोग करून जगामधले काही प्रश्न सोडवले तर? प्लेगसारख्या महाविनाशक साथीला आवतण दिलं तर? माथेफिरू संशोधकानं हाती विनाशसूत्र घेतली तर त्याला थांबवायचं कोणी आणि कसं? यावर उपाय करणार कोण? हे टिपिकल कथासूत्र म्हणजे जगातल्या सुष्ट आणि दुष्ट शक्तींचा चिरंतन झगडा. डॅन ब्राऊननं ‘इन्फर्नो’ या कादंबरीत उत्कंठावर्धक पद्धतीनं हा संघर्ष सादर केलाय.
यापूर्वी त्यानं ‘दा विंची कोड’ आणि ‘एंजल्स अ‍ॅण्ड डेमन्स’ या कादंबरीमधून साक्षात ऑर्थोडॉक्स चर्चला आवाहन केलं. अर्थात त्यामुळे त्याला त्याच्या मतांबद्दल ना दमदाटी झाली ना कादंबरीवर बंदी आली. ‘डिव्हाईन कॉमेडी’ या दान्तेच्या सुप्रसिद्ध कलाकृतीचा आधार घेऊन अत्याधुनिक सोशल मीडिया, इंटरनेट, अतिशीघ्र काळात कादंबरी घडते. कादंबरीतील सैतान अर्थातच विद्वान, विद्याविभूषित व्यक्ती आहे. सर्व जगाची पुनर्रचना करण्यासाठी आधी विनाश आणि मग बांधणी यासाठी तो विनाशकुपी तयार करतो आणि कुठे तरी लपवून ठेवतो. ती फुटण्याआधी नष्ट करायला हवी, असा ध्यास घेतलेला कथानायक ती कुठे आहे याचा शोध घेतो. पण ते रहस्य दान्तेच्या कॉमेडीमधील प्रतीकं, प्रतिमा आणि वचनात दडलेलं असतं. लँग्डन हा पुरातन प्रतिमा-प्रतीकांचा अभ्यासक प्राध्यापक.. कुपीचं स्थान निश्चित करण्याच्या धडपडीत त्याला जागतिक आरोग्य संघटक भेटतात. फ्लॉरेन्समधल्या एका रुग्णालयात तो जागा होतो. तिथं शुद्ध येते पण विक्षिप्त दृश्यभास, संभाव्य हल्ला आणि रोगी व्यक्ती यानं विलक्षण गोंधळतो. त्याला साथ देते इटलीतली अमेरिकन डॉक्टर.
संपूर्ण कादंबरी फ्लॉरेन्स, व्हेनिस आणि इस्तंबुलमध्ये घडते. तिथं होणारा पाठलाग, पुरातन भुयारी मार्ग, गूढ धार्मिक स्थळं यामधून प्रत्येक क्षणी उत्कंठा वाढते. या शहरांची वर्णनं इतकी तपशिलासकट आली आहेत की, ‘धिस पार्ट ऑफ द नॉवेल इन स्पॉन्सर्ड बाय टुरिझम डिपार्टमेंट ऑफ इटली’ असं वाटायला लागतं!
डॅन ब्राऊन मात्र काही मूलभूत प्रश्न उपस्थित करतो, माणसातलं बुद्धीसामथ्र्य, कल्याणकारी शस्त्रसामथ्र्य किंवा वित्तसामथ्र्य यांना मूल्यात्मक पाया नसेल तर सर्वनाश ओढवू शकतो. आणि त्यासाठी सैतान आधुनिक जनुकीय आणि वैद्यकीय शास्त्र दावणीला बांधू शकतो. इतकी र्वष वैद्यकविज्ञानाला केवळ आरोग्य आणि रोगप्रतिबंधकशास्त्र असा आयाम होता, पण तेच शास्त्र विध्वंसक  ठरलं तर.. विचारानं अंगावर शहारा येतो.
डॅन ब्राऊननं प्रचंड रिसर्च करून लिहिलेल्या कादंबरीला ब्रिटिश समीक्षकानं झोडपून काढलं तर अमेरिकन जनतेनं डोक्यावर घेतलं. बेस्टसेलर नंबर १ म्हणून अधिराज्य गाजवलं. गंमत म्हणजे डॅनच्या इतर कादंबऱ्यांप्रमाणे (दा विंची कोड, एन्जल्स अँड डेमन्स) ‘इन्फर्नो’वरही सिनेमा येतोय. नायक अर्थातच टॉम हँक्स. कादंबरी वाचतानादेखील स्क्रीनप्ले वाचल्याचा भास होतो. नाही तरी अमेरिकनांना दुष्ट सैतानाच्या सेनेला हाणून पाडणारा एकांडा शिलेदार नायक हवा असतो. बॉण्ड नि इंडियाना जोन्ससारखे माषूक आणि धडपडे, स्पायडरमॅनसारखा आम आदमी आणि सुपरमॅनसारखा बालिश आणि लॅग्डन. ओह! सो इंटलेक्च्युअल अ‍ॅण्ड नो रोमान्स प्लीज..
डॉ.राजेंद्र बर्वे -drrajendrabarve@gmail.com

flowers, plant flowers,
निसर्गलिपी : हिरवा कोपरा
Health Special, Pregnancy , dohale,
Health Special: गरोदरपणा आणि डोहाळे; किती खावे, काय टाळावे?
alu in garden
निसर्गलिपी : येता बागेला बहर…
Can adding salt to drinking water help prevent dehydration this summer
उन्हाळ्यात पाण्यात चिमूटभर मीठ टाकून प्यावे का? डॉक्टर काय सांगतात वाचा….

प्रबोधन पर्व – लो. टिळक म्हणतात, कृत्रिम उपायांनीं काय होणार?
‘‘मराठीस मातृभाषा किंवा मायभाषा म्हटल्यानें मराठी भाषेच्या अभिवृद्धींत कांहीं भर पडतें असें नाहीं. मागे आम्हीं सांगितलेंच आहे कीं, भाषा ही राष्ट्राच्या स्थितीचें निदर्शक आहे. राष्ट्र जर उदयोन्मुख असेल तर त्यांतील भाषाही वाढीस लागलेली असावयाची; आणि राष्ट्राचे व्यापार किंवा व्यवहार संकुचित असले तर त्याप्रमाणेंच भाषेची व्याप्ती किंवा वाढ ही मर्यादित राहावयाची, हा सिद्धान्त अबाधित आहे.. मराठी ही गुजरातीप्रमाणें व्यापाराची भाषा कधींच झालेली नव्हती. त्यामुळें गुजराती भाषेची व्याप्ती कायम राहण्यास हल्लीं जी सवड राहिली आहे तीही मराठी भाषेस प्राप्त झाली नाहीं.. उद्यां जर व्यापारी लोक व्यापारासाठीं मराठी व्यवहार करूं लागले, अनेक जुन्या व नव्या शास्त्रांचें अध्ययन व अध्यापन याच भाषेंत होऊं लागलें, आणि राजदरबारींही सर्व राज्यकारभार मराठी भाषेंतच होऊं लागला तर मराठी भाषेचा हां हां म्हणतां उत्कर्ष होईल.’’ असे सांगत लो. टिळक मायमराठीबद्दल म्हणतात, ‘‘ भाषेची खरी वाढ होण्यास ती भाषा वापरणारांचा व्यवहार अधिक वाढला पाहिजे आणि स्वभाषेंत आपले विचार लोकांस कळवून लोकांची प्रवृत्ती किंवा मनें फिरवण्याची जरूरही देशांतील पुढाऱ्यांस अधिकाधिक वाटूं लागली पाहिजे. असें जेव्हां होईल, जेव्हां विद्वान लोक अनेक शास्त्रांचें स्वभाषेंत अध्ययन व अध्यापन करतील, जेव्हां सामाजिक, राजकीय, औद्योगिक आणि शास्त्रीय वाद किंवा चर्चा हरएक प्रसंगीं व हरएक वेळीं जेव्हां स्वभाषेंत होऊं लागेल, जेव्हां धर्मजागृती किंवा सुधारणा करण्यास स्वभाषेचाच उपयोग करण्यांत येईल आणि जेव्हां दरबारांत, कचेरींत, बाजारांत, लष्करांत किंवा विद्यालयांत सर्व व्यवहार स्वभाषेनेंच चालेल, तेव्हां स्वभाषेची खरी वाढ होणार!.. कृत्रिम उपायांनीं भाषेच्या अंगांतील उष्णता कांहीं कालपर्यंत राखतां येईल; पण अंगची नैसर्गिक जीवनशक्ती जर कायम नसेल तर कृत्रिम उपायांनीं काय होणार?’’