टंग्स्टनचा शोध सन १७८३ मध्ये लागला, पण टंग्स्टनची महती कळायला मात्र जवळपास १०० वर्षे जावी लागली. सन १८६४ मध्ये रॉबर्ट म्युशेट या इंग्रज माणसाने प्रथमच पोलादात पाच टक्के टंग्स्टन मिसळलं. तापून लाल झालेलं असतानाही उच्च तापमानाला ते टिकाव धरतंच, पण त्याची कठीणता नुसती टिकूनच राहात नाही तर आधीपेक्षा त्यात वाढच होते, असं दिसून आलं. अतिवेगाने फिरणाऱ्या यंत्रातील कापणाऱ्या हत्यारांचे अग्रभाग करण्यासाठी तसंच धातू कापण्याच्या यंत्रसामग्रीची कार्यक्षमता वाढवण्यासाठी पोलादात टंग्स्टनचा सहभाग महत्त्वाचा ठरला. कोणत्याही क्षाराला, आम्लाला आणि उच्च तापमानाला न बधणारे, न गंजणारे टंग्स्टन मिसळून केलेले पोलादाचे मिश्रधातू प्रभावी ठरले.

बंदुकीसाठी लागणाऱ्या पोलादात अगदी कमी प्रमाणात टंग्स्टन मिसळून प्रा. लिपिन यांनी १८८२ मध्ये मिश्रधातू तयार केला. बंदुकांच्या नळ्यांवर दारूच्या धुराचा परिणाम होऊन त्या गंजतात. पण टंग्स्टनयुक्त पोलादापासून तयार केलेल्या बंदुकीच्या नळ्यांवर दारूच्या धुराचा परिणाम होत नसे. याचं महत्त्व ओळखून पहिल्या महायुद्धात जर्मनीने या बंदुका वापरल्या. या बंदुका नळीतून १५,००० स्फोट होईपर्यंत उत्तम प्रकारे चालत तर रशियन, फ्रेंच बंदुका मात्र सहा हजार ते आठ हजार स्फोटांतच खराब होत. यावरून टंग्स्टनच्या शक्तीची कल्पना यावी. साहजिकच अनेक यंत्रं, शस्त्रं, साधनं यांत टंग्स्टनचा वापर अनिवार्य ठरू लागला. टंग्स्टनचं महत्त्व वाढलं. खनिजांपासून टंग्स्टन मिळवायचं म्हणजे त्या खनिजांचा शोध घेणं आलं. त्यासाठी शोधमोहिमा काढल्या गेल्या. पूर्वी कधीच्या काळी कथिल काढून घेतल्यानंतर राहिलेला वुल्फ्रॅमाइटचा गाळदेखील धुंडाळला गेला.

सन १७८ मध्ये शील यांनी कॅल्शियम टंग्स्टेट या खनिजापासून पिवळ्या रंगाचं आम्लधर्मीय वुल्फ्रॅम ट्रायऑक्साइड बनवलं होतं. या खनिजाला त्यांच्या सन्मानार्थ शीलाइट हे नाव दिलं गेलं. शीलाइटखेरीज वुल्फ्रॅमाइट, ह्युब्नेराइट, स्टोल्झाइट, टंग्स्टेनाइट, क्युप्रोटंग्स्टाइट, वुल्फ्रॉमओकर ही टंग्स्टनची धातुकं आहेत. त्यापैकी शीलाइट आणि वुल्फ्रॅमाइट ही आर्थिकदृष्टय़ा महत्त्वाची आहेत.

आज टंग्स्टनच्या जागतिक उत्पन्नापैकी ८० टक्के भाग उच्च दर्जाच्या पोलादासाठी वापरला जातो. सुमारे १५ टक्के टंग्स्टन कठीण प्रतीच्या पोलादाच्या निर्मितीसाठी आणि पाच टक्के टंग्स्टन त्याच्या अंगी असलेल्या विशिष्ट गुणधर्माचा उपयोग करून घेण्यासाठी अत्यंत शुद्ध स्वरूपात वापरलं जातं.

पृथ्वीच्या कवचातील टंग्स्टनचं प्रमाण सुमारे ०.०००१५ टक्के (दशलक्ष भागांत १.५ भाग) इतकं आहे. चीन, ब्रह्मदेश, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, बोलिव्हिया, पोर्तुगाल, कोरिया, रशिया या देशांत टंग्स्टनची धातुकं आढळतात.

चारुशीला जुईकर , मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org