मोडाल तंतू हा दुसऱ्या पिढीतील व्हिस्कोज तंतू आहे असे म्हटले जाते. हा तंतू तयार करण्यासाठी फक्त ‘बीच’ या झाडाचे लाकूड कच्चा माल म्हणून वापरले जाते. ‘मोडाल’ हे नाव सुधारित व्हिस्कोज रेयॉनच्या अशा वर्गासाठी, की ज्यामध्ये कणखरपणाबरोबरच उच्च आद्र्र स्थितीतील ताकद असते अशा तंतूंसाठी पडलेले हे नाव आहे. अनेक कंपन्या या प्रकारचा तंतू उत्पादित करतात आणि त्या सर्वाना मोडाल तंतू असे म्हणतात. प्रत्येक कंपनीचे ब्रॅण्ड नाव वेगळे असते. ऑस्ट्रियामधील लेन्झिग ही कंपनी मोडाल तंतू बनविणारी एक अग्रेसर कंपनी आहे. याशिवाय स्लोवाकिया, झेक लोकसत्ताक, हंगेरी आणि जर्मनी या देशात मोडाल तंतूंचे उत्पादन केले जाते. टिं’ हे लेन्झिग कंपनीने बनविलेल्या मोडाल तंतूचे ब्रॅण्ड नाव आहे. भारतामध्ये बिर्ला व्हिस्कोज कंपनी मोडाल तंतूंचे उत्पादन करते.
मोडाल तंतूची उत्पादन प्रक्रिया ही सामान्यपणे व्हिस्कोज रेयॉन तंतूंच्या उत्पादन प्रक्रियेसारखीच असते. फक्त उत्पादन प्रक्रियेच्या एक-दोन पायऱ्यांत काही बदल केलेले असतात. मोडाल तंतूंच्या आद्र्र कताई प्रक्रियेत तंतूंचे घनीकरण आणि खेच एकाच वेळी केले जाते आणि मूळ तंतूंच्या लांबीच्या तिप्पट खेच दिला जातो. हा व्हिस्कोज तंतूंच्या कताई प्रक्रियेत दिल्या जाणाऱ्या खेचापेक्षा किती तरी जास्त असतो. याचा परिणाम म्हणून मोडाल तंतूंमधील सेल्युलोज बहुवारिकाची रेणूसंख्या अधिक असते आणि हे रेणू एकमेकांशी आणि तंतूच्या लांबीशी अधिक समांतर रचले जातात. यामुळे मोडाल तंतूंची कोरडय़ा स्थितीतील ताकद व्हिस्कोजपेक्षा अधिक असतेच, पण या तंतूंची ओल्या स्थितीतील ताकद व स्थितिस्थापकतासुद्धा कमी होत नाही. तर काही वेळा कापसाप्रमाणे थोडीशी वाढते. या तंतूंची लंबन क्षमता कापसाइतकीच म्हणजे ७ ते ८% इतकी असते. मोडाल तंतू अनेक प्रकारे कापसासारखेच वर्तन करतो; परंतु याशिवाय या तंतूची अधिक वैशिष्टय़े आहेत. हा तंतू कापसापेक्षा कमी प्रमाणात आक्रसतो आणि म्हणून या तंतूपासून तयार केलेल्या कपडय़ांचे मोजमाप किंवा आकारमान अधिक स्थिर असते.
चं. द. काणे  (इचलकरंजी) ,मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  
चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

संस्थानांची बखर – बहुआयामी रायगढ शासक चक्रधरसिंग
भारतीय कला, कथ्थक नृत्य, अभिजात संगीत यांचा महान आश्रयदाता असलेला रायगढ शासक राजा चक्रधरसिंग याची कारकीर्द इ.स. १९२४ ते १९४७ अशी तेवीस वष्रे झाली. चक्रधरसिंग कथ्थक आणि संगीताच्या कलाकारांना रायगढात बोलावून त्यांचे कार्यक्रम आयोजित करीत असे. जयपूर, लखनौ आणि बनारस घराण्यांच्या कलाकारांचा तर रायगढ दरबारात नेहमीच राबता होता. कथ्थक नृत्यात स्वत: प्रवीण असलेल्या चक्रधरसिंगाने विविध नृत्यप्रकार एकत्र करून एक नवीनच नृत्यशैली तयार केली. याच नृत्यशैलीला रायगढ घराणे असे नाव झाले. कथ्थक नृत्याबरोबरच तो तबला आणि पखवाजवादनातही तरबेज होता. १९३८ साली अलाहाबाद येथे झालेला पहिला अखिल भारतीय संगीत समारोह चक्रधरसिंगाच्या नेतृत्वाखाली झाला. त्याच्या कलाकारांच्या चमूत साठ कलाकारांनी आपली कला पेश केली. या कार्यक्रमाला ब्रिटिश व्हाइसरॉय लिनलिथगो हजर होता. कल्याण दासचे नृत्य व चक्रधरचे तबलावादन यामुळे प्रभावित होऊन चक्रधरला त्याने संगीतसम्राट ही पदवी दिली. नृत्य संगीताशिवाय चक्रधरसिंग हिंदी, संस्कृत, उर्दू आणि उडिया (ओरिया) या भाषांचा जाणकार होता. त्याने ‘तालबोल पुष्पाकर’, ‘नर्तन सर्वस्य’, ‘रागरत्नमंजूषा’, ‘मृगनयनी’ इत्यादी १६ ग्रंथ नृत्य-संगीतविषयक लिहिले. नृत्य-संगीतातच भान न विसरता चक्रधराने राज्य कारभारही चोख केला.
सुनीत पोतनीस -sunitpotnis@rediffmail.com