तैवानची राजकीय परिस्थिती आणि इतिहास हा चीनशी निगडित आहे. चीनमधील साम्यवादी क्रांतिगटाशी झालेल्या संघर्षांतूनच तैवान हा एक स्वतंत्र देश म्हणून उभा राहिलाय. १६८३ साली चीनमधील तत्कालीन क्विंग साम्राज्याने तैवान बेट चीनमध्ये सामील केले. पुढे १८९५ साली चीनमधील तत्कालीन मांचू घराण्याचे साम्राज्य आणि जपानचे साम्राज्य यांच्यात युद्ध झाले. युद्धात चीनचा पराभव होऊन तैवानचा ताबा जपानकडे गेला. दुसऱ्या महायुद्धात जपानचा पराभव होईपर्यंत तैवानचा ताबा जपानकडेच राहिला. या काळात तैवानकडून जपानला तांदूळ व साखरेचा पुरवठा होत राहिला. जपानी राजघराण्यातल्या व्यक्तींच्या शिक्षणाची व्यवस्था या काळात तैवानमध्येच केलेली होती.

इकडे चीनमध्ये एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीपासून बुद्धिजीवी वर्गात लोकशाहीवादी सरकार येण्याची आकांक्षा मूळ धरू लागली होती. चिनी समाजात लोकशाहीवादी चळवळीने अखेर जोर धरला आणि त्याची परिणती म्हणून कोमितांग पक्षाच्या नेतृत्वाखाली १९११ साली मांचू घराण्याची राजवट मोडून काढण्यात आली. चीनमधील अडीच हजार वर्षांची राजेशाही संपुष्टात येऊन तिथे कोमितांग पक्षाकडे सत्ता आली.

१९१२ मध्ये सन्-यत्-सेन यांच्या नेतृत्वाखाली चीनमध्ये चिनी प्रजासत्ताक म्हणजे ‘रिपब्लिक ऑफ चायना’ची स्थापना झाली. १९१५ साली कोमितांग पक्षाचे नेतृत्व चँग कै-शेक या सरसेनापतीकडे आले. याच दरम्यान शेजारच्या रशियात कम्युनिस्टांचे सरकार आले आणि पाठोपाठ मार्क्‍सवाद-लेनिनवादाचे आकर्षण वाढून १९१९ मध्ये चीनमध्ये कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली. कम्युनिस्टांच्या कारवाया जसजशा वाढत गेल्या, तसतसे कोमितांग पक्षाच्या प्रजासत्ताक शक्ती आणि मार्क्‍सवादी यांच्यातला संघर्ष वाढतच गेला. १९४५ साली दुसऱ्या महायुद्धात जपानचा पराभव होऊन तैवानचा ताबा चँग कै-शेक यांच्या प्रजासत्ताक सरकारकडे आला. चँग कै-शेक आणि माओची कम्युनिस्ट रेड आर्मी यांत पुढे १९४६ पासून संघर्ष वाढून सरळसरळ युद्ध सुरू झाले. १९४९ मध्ये चँग कै-शेक यांचा निर्णायक पराभव होऊन त्यांना त्यांचे सैन्य आणि काही पाठीराख्यांसमवेत तैवानमध्ये जाऊन आश्रय घ्यावा लागला. चँग यांनी १० ऑक्टोबर १९४९ रोजी तैवानमध्ये आपले सरकार स्थापन केले. तेव्हापासून तैवान एक स्वतंत्र, सार्वभौम देश बनला आहे!

सुनीत पोतनीस sunitpotnis94@gmail.com