23 February 2019

News Flash

टर्बिअमचा रंजक इतिहास

टर्बिअमचे वर्गीकरण दुर्मीळ मृदा मूलद्रव्यात केले आहे.

टर्बिअमचे वर्गीकरण दुर्मीळ मृदा मूलद्रव्यात केले आहे. टर्बिअम हे मूलद्रव्य मुक्त स्वरूपात आढळत नाही, सेराइट, गॅडोलिनाइट, मोनाझाइट अशा अनेक खनिजात टर्बिअम तर दुर्मीळ मृदा मूलद्रव्यांबरोबर एकत्रित आढळते. मोनाझाइटमध्ये त्याचे प्रमाण ०.३% असून यात तर दुर्मीळ मृदा मूलद्रव्यांची संख्या अर्धा डझनपेक्षा अधिक आहे. पूर्वी रसायनशास्त्रज्ञांना या मूलद्रव्यांना वेगळं करण्याचे आव्हान पेलताना अनेक पद्धतींचा वापर करावा लागत असे व यशाची खात्री नसे. आता आयन एक्सचेंज तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीमुळे टर्बिअम, फ्लोराइड स्वरूपात वेगळा करता येतो व तद्नंतर विद्युत विघटनाने शुद्ध टर्बिअम मिळते.

१८४० च्या आसपास मूलद्रव्यांच्या शोध मोहिमेत टर्बिअमचा शोध लागला. या शोध मोहिमेची सुरुवात १७८७ मध्ये झाली. स्वीडिश सैन्यातील लेफ्टनंट कार्ल अर्हेनीयसला स्वीडनमधील यटर्बी गावाजवळ एक विलक्षण काळ्या रंगाचा दगड सापडला. त्याने तो दगड आपला मित्र रसायनशास्त्रज्ञ जोहान गॅडोलीनला दिला. गॅडोलीनने त्याचे विश्लेषण केले असता त्यात पूर्णत: नवीन खनिज असल्याचे आढळले व त्याचे नामकरण यटर्बी गावावरून यट्रीया असे केले. परंतु ही तर पुढील नवनवी कोडी उलगडण्याच्या साखळीची केवळ सुरुवात होती.

१८४३ मध्ये अजून एका स्वीडिश रसायनशास्त्रज्ञाने, कार्ल मोझँडरने दाखवून दिले की यट्रीयामध्ये मुख्यत: यट्रीयम ऑक्साइडशिवाय अजून दोन खनिजे आहे. या एकूण तीन खनिजांना यटर्बीवरून अनुक्रमे अर्बिया, टर्बिया व यट्रीया अशी नावे दिली गेली. यातील टर्बिया पिवळट रंगाचा तर अर्बिया गुलाबी रंगाचा होता. मोझँडर केलेले संशोधन अतिशय क्लिष्ट होते, संशोधनासाठी लागणारी साधने नसल्यामुळे अनेक उणिवा असत. शेवटी इतर रसायनशास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासावरून टर्बियाचे नामकरण अर्बिया व अर्बियाचे नामकरण टर्बिया झाले. टर्बिअमच्या शोधाचे श्रेय मोझँडरला जाते, परंतु स्वत:च्या हयातीत शुद्ध टर्बिअम बघण्याचे भाग्य त्याला लाभले नाही. कालांतराने १८८६ मध्ये फ्रेंच रसायनशास्त्रज्ञाला शुद्ध टर्बिअम तयार करण्यात यश मिळाले.

– मीनल टिपणीस

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

First Published on August 13, 2018 12:49 am

Web Title: terbium chemical element