ख्रिस्ती धर्मप्रसारासाठी ट्रांकेबार येथे आलेल्या मिशनरी श्वार्ट्झ याने आपल्या भाषा व्यासंगासाठी अधिकतर काळ तंजावरमध्ये व्यतीत केला. सलग ४८ वर्षे तंजावर, ट्रांकेबारमध्ये राहून मराठी, संस्कृत, तमिळ या भाषांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी त्याने आयुष्याचा महत्त्वाचा काळ व्यतीत केला. श्वार्ट्झच्या मार्गदर्शनाखाली सरफोजीने एक सुयोजित, भव्य असे ग्रंथालय उभे केले, त्याच्या सूचनेप्रमाणे ग्रंथालयाला जोडूनच सरफोजीने ‘नवविद्याकलानिधी’ हा छापखाना सुरू केला. परंतु हा छापखाना सुरू होण्यासाठी श्वार्ट्झच्या मृत्यूनंतर पुढची सात वर्षे जावी लागली. सन १८०५ मध्ये सुरू झालेल्या या छापखान्यात पहिले मुद्रण झाले ते संस्कृत-मराठी पंचांगाचे.

महाराष्ट्रापासून दूरवर असलेल्या तंजावरमध्ये दोन शतकांपूर्वी मराठी वाङ्मयाची निर्मिती आणि छपाई सुरू झाली आणि तीसुद्धा एका जर्मन ख्रिस्ती मिशनऱ्याच्या प्रेरणेने. हे सर्वच स्तिमित करणारे आहे! श्वार्ट्झच्या मृत्यूनंतर सरफोजी आणि नंतर त्याचा मुलगा शिवाजी द्वितीय याने या ग्रंथालयाचा विस्तार एवढय़ा मोठय़ा प्रमाणात केला, की आता ते मध्ययुगीन काळात स्थापन झालेले आशिया खंडातील सर्वात मोठे आणि जुने ग्रंथालय मानले जाते. छापखान्याचे नाव नवविद्याकलानिधी असे ठेवण्याची सूचनाही श्वार्ट्झचीच! तंजावरच्या या छापखान्यात छापलेले पहिले पुस्तक सखण्णा पंडिताने भाषांतरित केलेले इसापच्या गोष्टींचे होते.

या ग्रंथालयातील मराठी, तमिळ, तेलगू, संस्कृत, इंग्रजी, जर्मन, फ्रेंच भाषांमधील ६५००० हून अधिक पुस्तके, ४६७०० हस्तलिखिते, तंजावर राज्याच्या प्रशासकीय नोंदी असलेली मोडी लिपीतली ८५० गाठोडी हा मध्ययुगीन साहित्यातला मौल्यवान ठेवा आहे. श्वार्ट्झच्या मार्गदर्शनाखाली सरफोजीने हे ग्रंथालय समृद्ध होण्यासाठी अनेक विद्वान पंडितांना नोकरीस ठेवून संपूर्ण भारतभरातून दुर्मीळ हस्तलिखिते, पुस्तके गोळा करण्यासाठी, नकला तयार करण्यासाठी पाठवले. गेल्या दोन शतकांपासून तंजावर हे दक्षिण भारतातले साहित्य, कला आणि संस्कृतीचे एक महत्त्वाचे केंद्र म्हणून ओळखले जाते. याचे श्रेय या ग्रंथसंग्रहालयाला आणि खरे तर ख्रिश्चन श्वार्ट्झलाच द्यायला हवे.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com