आधुनिक मेंदू संशोधनातून निघालेल्या निष्कर्षांचा वापर कोणत्याही वर्गातल्या, कोणत्याही इयत्तेतल्या, कोणत्याही मुलांसाठी करता येतो. त्यासाठी न्यूरो इमेजिंग तंत्राद्वारे केलेले प्रयोग आहेत. त्या प्रयोगांचे निष्कर्ष आपल्याला वर्गात वापरता येतात. यातून निघालेले निष्कर्ष हे त्या वयोगटासाठी पूरक असल्यामुळे ती तत्त्वं आपण वर्गात वापरली तर त्याचा थेट परिणाम दिसून येतो.

मुलांच्या कल्पनाशक्तीला संधी देणं, त्यांच्यातल्या विविध बुद्धिमत्तांचा शोध घेऊ देणं, केवळ लेखन, वाचन, पाठांतर यावर भर न देता कल्पकता वापरून विविध विषय स्वत:हून शिकू देणं, या सगळ्यालाच ज्ञानरचनावादाचा पाया असं म्हटलं जाऊ शकतं. ही तंत्रं वापरून मुलांना शिकवायचं याचा अर्थ मुलं आपणहून शिकू शकतील असं वातावरण वर्गात तयार करायचं, हे वातावरण वर्गात उपलब्ध झालं तर शिक्षकांच्या मदतीने मुलं स्वत:हून स्वत:च्या ज्ञानाचा पाया रचत जातात. यालाच ज्ञानरचनावादी सिद्धांत म्हणतात.

यामध्ये मुलांना विषय समजण्यासाठी अनेक पद्धती वापरणं- उदा. चर्चा, गटचर्चा, प्रकल्प, चित्र, प्रयोग, मॉडेल्स, रोल प्ले, विविध खेळ, कोडी, अशा अनेक तत्त्वांचा वापर केला जाऊ शकतो. अशा सर्व गोष्टी इयत्तेनुसार वर्गात वापरल्या तर मुलं आनंदाने शिकतील. ‘शिक्षण आनंददायी असायला हवं’ असं म्हटलं जातं. पण या आनंदासाठी अभावानेच उपाययोजना शाळेत केल्या जातात किंवा ज्या उपाययोजना केल्या जातात त्यातून मुलांना कोणत्या प्रकारचा आनंद मिळतो, हे तपासावं लागेल.

‘मुलांना हल्ली शिकायचंच नसतं, फक्त दंगा करायचा असतो,’ असं शिक्षक आणि पालक म्हणतात. मुलं मात्र एकाच वेळी अनेक विषय अभ्यासत असतात. त्यासाठी शाळा- क्लास- विविध स्पर्धा परीक्षा यांमधून फिरत असतात. पण अशा काही तत्त्वांचा अत्यंत योग्य प्रकारे वापर केला तर  शिकण्यापासून दूर जाणाऱ्या मुलांना शिकण्यात आनंद वाटेल.

मुलांना शिकवताना घाई करून चालणार नाही. तर मूल शिकेल यावर विश्वास ठेवून त्याच्या अवतीभोवती विषयाला साजेसं वातावरण तयार करावं लागतं. मेंदू-प्रयोगशाळेत केल्या जाणाऱ्या प्रयोगांची अंमलबजावणी वर्गामध्ये करता आली तर मुलांना याचा खरोखर फायदा होऊ शकेल.

– श्रुती पानसे

contact@shrutipanse.com