मनमानी कारभार करणाऱ्या पहिल्या चार्ल्सविरोधात बंड केलेल्या प्रजेने चार्ल्सचा शिरच्छेद करून क्रॉम्वेल या नेत्याकडे राज्याची, कारभाराची सूत्रे सोपविली. क्रॉम्वेलच्या मृत्यूनंतर आलेल्या चार्ल्स द्वितीयची कारकीर्द इ.स. १६६० ते १६८५ अशी झाली. याच्या काळात १६६५ साली आलेल्या प्लेगच्या साथीने कहर केला. दोन लाखांच्या आसपास लोक मृत्युमुखी पडले. त्याच्या पुढच्याच वर्षी १६६६ मध्ये एका बेकरीत लागलेल्या आगीने विराट स्वरूप धारण केले. ‘द ग्रेट फायर ऑफ लंडन’ म्हणून विख्यात झालेली ही सहा दिवस लंडनला जाळीत होती. या आगीची झळ व्यापाऱ्यांना अधिक बसली. जीवितहानीपेक्षा वित्तहानीच अधिक झाली. आश्चर्य म्हणजे फक्त सहा माणसांना आपला जीव गमवावा लागला!
पुढच्या २५ वर्षांत लंडनचा जीर्णोद्धार झाल्याप्रमाणे नवीन रस्ते, नव्या वास्तू उभ्या राहिल्या, अनेक बँक्स सुरू झाल्या, बँकांवर नियंत्रण ठेवणारी बँक ऑफ इंग्लंडही स्थापन झाली.
अठराव्या शतकात चार जॉर्ज राजे लंडनच्या गादीवर आले. त्यांच्या जॉर्जीयन कालखंडात लंडनची वस्ती दहा लाखांवर पोहोचली. याच काळात १८२९ साली लंडनचे प्रसिद्ध पोलीस दल ‘बॉबी’ उभे राहिले.
मग १८३७ साली राणी व्हिक्टोरियाचा राज्यारोहण समारंभ झाला. १८३७ ते १९०१ या काळातली तिची कारकीर्द लंडन आणि पूर्ण देशाला प्रगतीच्या वाटेवर नेणारी, म्हणून ‘सुवर्णयुग’ ठरली.
औद्योगिक क्रांतीच्या याच आद्य काळात वाफेच्या इंजिनाचा शोध लागून रेल्वेगाडय़ा वाफेच्या इंजिनवर धावू लागल्या.
– सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com

सपुष्प वनस्पतींचे जतन
सपुष्प वनस्पतींचे जतन करताना शक्यतो फळे आणि फुले असणारी फांदीच नमुना म्हणून गोळा करावी. पुढे वनस्पतींची ओळख पटण्यासाठी याची मदत होते. त्या फांदीवर कमीतकमी ४-५ पाने अथवा ४-५ पानांच्या जोडय़ा असणे उत्तम. ह्य़ा फांदीची लांबी १५ सेमीपेक्षा जास्त नसावी. आकाराने आणि उंचीने लहान असलेल्या वनस्पतींचे संकलन मुळापासून केले जाते. त्या वनस्पतींचे वर्णन फुलांचा रंग, पाकळ्यांची संख्या आणि आकार पुंकेसराची संख्या आणि प्रकार इत्यादी नोंदी करण्यासाठी तसेच निरीक्षण करण्यासाठी १० एक्स पॉवरची लेन्स वापरावी. नोंद पुस्तिकेत लिहिलेले अनुक्रमांक कागदाच्या टॅगवर पेन्सिलने लिहून तो टॅग फांदीला कायम राहील असा चिकटवावा किंवा फांदीला कायम राहील असा चिकटवावा. या वनस्पतींचा आधिवास कोठे आहे, झाडाची उंची किती आहे, इत्यादी नोंदी जरूर कराव्यात. वर्तमानपत्राच्या कागदावर टीपकागद ठेवून त्यावर ही फांदी वनस्पतींचे सर्व भाग ठळक दिसतील अशा पद्धतीने पसरावी. वनस्पतीच्या वर पुन्हा टीपकागद ठेवावा व वर्तमानपत्र बंद करावे. अशा रीतीने केलेले संकलन अनेक वर्तमानपत्रांच्या मध्ये ठेवावे. वनस्पतींच्या संकलनाचा हा गठ्ठा सुतळी अथवा धाग्याने बांधावा. बुरशी किंवा कीटकांना दूर ठेवण्यास या गठ्ठय़ांच्या मध्ये २ टक्के फॉर्मलिन िशपडावे व हा गठ्ठा कार्डबोर्डच्या प्रेसमध्ये (दाब यंत्र) ठेवावा. असा गठ्ठा १५ ते ३० दिवस हवाबंद प्लास्टिकच्या पिशवीत सुरक्षित राहू शकतो. त्यानंतर हा गठ्ठा पिशवीच्या बाहेर काढावा. ओले झालेले वर्तमानपत्राचे कागद आणि टीपकागद बदलणे आवश्यक असते. नाही तर बुरशी लागून नमुने खराब होतात, पूर्णपणे सुकलेली फांदी नंतर मक्र्युरी क्लोराइड आणि अल्कोहोलच्या मिश्रणात ३०-४० सेकंदांपर्यंत बुडवून नंतर वाळवून आयताकृती ड्रॉइंगच्या जाड कागदावर सुई-धाग्याने शिवावी किंवा फेव्हिकॉलने चिकटवावी.
फेव्हिकॉलमुळे भविष्यात कीटकांचा प्रसार होण्याची शक्यता असते. नमुन्याच्या पेपरच्या डाव्या बाजूला खाली वनस्पतींचे वर्गीकरण त्याचे शास्त्रीय नाव, संकलनाचे ठिकाण, दिनांक, वगरे माहिती लिहावी. जर वनस्पती औषधी असेल तर तशी माहिती लिहावी. अशा रीतीने केलेले दस्तऐवज हे संशोधनासाठी भविष्यातील संदर्भासाठी वापरले जातात.
– डॉ. राजेंद्र शिंदे (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org