24 October 2020

News Flash

कुतूहल – ऑक्सिजन वायू (O2)

नाक दाबले की तोंड उघडते. दोन्ही बंद केले की जीव गुदमरतो, कारण हवेतील ऑक्सिजन वायू आपल्याला मिळत नाही. एरवी तो फुकट मिळतो म्हणून त्याची आपल्याला

| June 16, 2014 12:27 pm

नाक दाबले की तोंड उघडते. दोन्ही बंद केले की जीव गुदमरतो, कारण हवेतील ऑक्सिजन वायू आपल्याला मिळत नाही. एरवी तो फुकट मिळतो म्हणून त्याची आपल्याला पर्वा नसते. परंतु तो आपल्यासाठी ‘प्राणवायू’ असतो, हे अशा आणीबाणीच्या परिस्थितीत कळते.
तसे त्याचे हवेतील प्रमाण बऱ्यापकी म्हणजे २१% पर्यंत असते. परंतु वातावरणातील वाढत्या प्रदूषणामुळे, तो शुद्ध स्वरूपात मिळणे कठीण होऊ लागले आहे. तरी एक बरे आहे की निसर्गातल्या वनस्पती आपल्या ‘प्रकाश संश्लेषण’ या प्रक्रियेद्वारा हवेतला कार्बन डायऑक्साइड अन्न तयार करण्यासठी वापरतात आणि ऑक्सिजन वायू वातावरणात मुक्त करतात. त्यामुळे, सजीवांना सातत्याने प्राणवायूचा पुरवठा होत राहिला आहे.  
ऑक्सिजन एका अणूच्या रूपात स्थिर राहू शकत नाही, म्हणून त्याचे दोन अणू रासायनिक बंधनाने एकत्र जोडून रेणू (ड2) तयार होतो. तो सहजगत्या हवेत वावरतो. जेव्हा वीज चमकते, तेव्हा या वायूचे तीन अणू एकत्र येतात व ओझोन (ड3) वायू तयार होतो. हा ओझोन वातावरणात वर वर जाऊन एक संरक्षक कवच तयार करतो. हे कवच सूर्यकिरणातील प्रखर उष्णतेला थोपवून ठेवतो व पृथ्वीला अति तापण्यापासून वाचवितो. ओझोन हा देखील हरितगृह वायू आहे.  
ज्वलनासाठी ऑक्सिजनची नितांत गरज असते; मग ती कारखान्याच्या भट्टीतील आग असो, चुलीतली प्रखर ज्वाला असो किंवा शरीरपेशीतील मंद ज्वलन असो. कारण या वायूशिवाय ज्वलनक्रिया बहुधा शक्यच नसते. ओलसर धातूंना गंजविण्याचे कामदेखील हा वायू करीत असतो. गंजण्याने धातूचा टणक पृष्ठभाग ठिसूळ बनतो. तिथे त्याचे ऑक्साइड संयुग तयार झालेले असते. त्यासाठी धातूपृष्ठांचे या वायूपासून रक्षण करावे लागते.  
ऑक्सिजन अल्प प्रमाणात पाण्यात विरघळतो व तिथल्या जलचरांना जगवितो. वातावरणात जसे वर जावे तसे वातावरण विरळ होत जाते. परिणामी या वायूचे प्रमाण तेथे कमी असते. म्हणूनच तर गिर्यारोहकांना पाठीवर ऑक्सिजन वायूची नळकांडी घेऊन जावे लागते.
प्रदूषणाचे प्रमाण असेच वाढत राहिले तर काही काळाने शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळावा म्हणून सामान्य माणसालाही गिर्यारोहकांप्रमाणे पाठीवर ऑक्सिजन वायूची नळकांडी घेऊन जगावे लागणार आहे.
जोसेफ तुस्कानो (वसई)- office@mavipamumbai.org

मनमोराचा पिसारा – क्रेजी  वेव्ह
आज ‘फिफा’च्या खेळातल्या स्टेडियममध्ये हजारो प्रेक्षक आपापल्या ‘टीम’ला ललकारीत असतात, ‘चीअर अप’ करीत असतात आणि अचानक स्टेडियममधले निरनिराळे सेक्शन एकामागोमाग एक याप्रमाणे दोन्ही हात उचलून आपल्या टीमला ‘वेव्ह’ करीत असतात. अक्षरश: एखाद्या लाटेप्रमाणे ही ‘वेव्ह’ एका सेक्शनकडून पुढे फिरत फिरून तिथे परतते आणि आणखी एक ‘लाट’ स्टेडियममध्ये विहरत जाते.  गंमत म्हणजे एखाद्या सेक्शनने पुरेसा प्रतिसाद न दिल्यास बाकीचे सेक्शन त्यांना बूऽऽऽ करून डिवचतात. त्यानंतर मग पुन्हा लाटेला तडाखेबंद आरंभ होतो.
अशा प्रकारे स्टेडियममध्ये जमलेल्या ५० ते ६० हजार प्रेक्षकांना ‘वेव्ह’मध्ये खेळवत आणि खिळवत ठेवण्याचं श्रेय अमेरिकेतल्या ‘क्रेझी जॉर्ज हॅण्डरसन’ या चीअर लीडरकडे जाते. आपण चौकार, षटकार मारल्यावर तोकडय़ा कपडय़ांत थयथयाट करणाऱ्या ‘चीअर गर्ल्स’ ओळखतो, पण ‘चीअर लीडर’ स्वत: नाचत नाही तर लोकांना नाचवितो. स्टेडियममधल्या प्रेक्षकांच्या अमाप उत्साहाला उधाण आणण्याचं काम क्रेझी जॉर्ज अनेक र्वष करीत होता. गळ्यात ढोलकं घालून जॉर्ज स्टेडियम आणि बेसबॉलच्या मैदानात अक्षरश: विजेसारखा तळपत असे. तो विलक्षण लोकप्रिय होता आणि खेळांकरता क्रेझी होता. प्रेक्षकांच्या प्रचंड ऊर्जेला शिस्त लावण्यासाठी आणि प्रेक्षकांना खेळाच्या चढ-उतारात सामील करून घेण्यासाठी क्रेझी जॉर्जला १५ ऑक्टोबर १९८१ रोजी नामी शक्कल सुचली आणि तेव्हापासून त्यानं अनेक सामन्यांत लाटांच्या भरती-ओहोटीचा खेळ खेळला.
क्रेझी जॉर्जनं निर्माण केलेल्या आणि आता जगभरात प्रसिद्ध पावलेल्या ‘वेव्ह’मागची मानसिकता तपासण्याच्या प्रयत्नातून लोकप्रिय नेत्याच्या मनोभूमिका आणि लोकाभिमुख धोरणांचं शास्त्र गेल्या २० वर्षांत तयार झालंय. क्रेझी जॉर्ज स्वत:देखील त्यावर भाष्य करतो. त्यातले काही प्रमुख मुद्दे-
१) लोकांमध्ये अशा ‘लाटा’ निर्माण करणाऱ्या नेत्यामध्ये प्रचंड ऊर्जा असावी लागते. २) हा नेता लोकांच्या समोर उभं राहून ‘लीड’ करतो. दिवस असो वा रात्र घामानं भिजलेल्या या नेत्याच्या चेहऱ्यावर प्रसन्न आत्मविश्वास असावा लागतो. ३) हा नेता प्रेक्षकांना (लोकांना) कसलीही लालूच न दाखविता (म्हणजे तुम्ही अमुक करा म्हणजे तमुक मिळेल असे वायदे न करता) खेळण्याच्या प्रोसेसमध्ये सामील होण्याचं वारंवार आव्हान करतो. ४) प्रेक्षकां(लोकां)नी प्रत्यक्ष काय करायला हवं, उदा. हात लावणे, टाळ्या इ.याची सुस्पष्ट जाहीर कल्पना देतो. ५) प्रेक्षकांचा पुरेसा प्रतिसाद न मिळाल्यास त्यांच्यासारख्या इतर प्रेक्षकांकडून प्रोत्साहन मिळेल याची सांगून-सवरून व्यवस्था करतो. ६) सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या ‘टीम’ला पुढे न्यायचं आहे, ही जबाबदारी फक्त ‘टीम’ची नसून आपल्या सर्वाची आहे हे त्यांच्या मनावर ठसवतो. ७) प्रेक्षक सामील होऊन ‘वेव्ह’ यशस्वी झाल्यावर त्याची पोचपावती लगेच ‘ओह! आय लव्ह यू!!’ असं म्हणून त्यांना देतो.
मित्रा, पाहा बरं, ही सर्व लक्षणं कोणाला लागू पडतात?
डॉ.राजेंद्र बर्वे drrajendrabarve@gmail.com

प्रबोधन पर्व – डॉ. बाबासाहेब आंबेडकर – प्रज्ञावंत विचारवंत
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, अस्पृश्यांचे उद्धारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक महाराष्ट्रातील प्रज्ञावंत विचारवंत होते.  समाजसुधारक, पत्रकार, परखड विचारवंत, नामवंत वकील, चिकित्सक अभ्यासक, भविष्यवेत्ता, असे डॉ. आंबेडकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पलू होते. त्यांनी सकल जनवादी भूमिका घेऊन मानव जातीची श्रेणी उंचावण्यासाठी कुठली मूल्ये प्राधान्याने स्वीकारली पाहिजेत यासाठी आपली वाणी आणि लेखणी झिजवली. डॉ. आंबेडकरांची इंग्रजी आणि मराठीमध्ये साधार चरित्रे लिहिणारे धनंजय कीर लिहितात- ‘आंबेडकरांचे नाव देशाच्या इतिहासाशी सदैव निगडित राहील. त्यांच्या ध्येयांपकी अनेक ध्येयांचा राज्यघटनेत समावेश झालेला आहे. त्यांनी मनूविरुद्ध बंड केले आहे आणि मनूला त्याच्या गादीवरून खाली ओढले या विजयाला ह्य़ा देशाच्या इतिहासात तोड नाही.. या युगातील पहिल्या श्रेणीतील अलौकिक पुरुषांमध्ये त्यांचे स्थान आहे. जे आजवर जगात पददलितांचे रक्षणकत्रे नि कैवारी होऊन गेले, मानवी स्वातंत्र्याचे शिल्पकार होऊन गेले त्यांत त्यांचे स्थान उज्ज्वल आहे.’ तर य. दि. फडके म्हणतात- ‘राजकारणातील भक्तिसंप्रदायाला डॉ. आंबेडकरांनी सदैव विरोध केला. महात्मे किंवा प्रेषित यांचे स्तोम माजविणे त्यांना मान्य नव्हते.. दैवतीकरणाला आणि विभूतिपूजेला अनेक वष्रे विरोध करणाऱ्या डॉ. आंबेडकरांनी २५ नोव्हेंबर १९४९ रोजी घटना परिषदेत केलेल्या संस्मरणीय भाषणातही आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला होता. भारतीय घटनेचा अंतिम मसुदा संमत केला जाण्याचा ऐतिहासिक क्षण जवळ येत होता तेव्हाही भारतीय लोकशाहीला असणाऱ्या संभाव्य धोक्यांची ते घटना परिषदेच्या सदस्यांना जाणीव करून देत होते.. डॉ. आंबेडकरांनी आपल्या सार्वजनिक जीवनाच्या सुरुवातीपासून काही मूलभूत तत्त्वे व निष्ठा मानल्या होत्या आणि त्यांच्याशी त्यांनी आयुष्यभर इमान राखले..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2014 12:27 pm

Web Title: the oxygen gas
टॅग Navneet
Next Stories
1 कुतूहल – सल्फर डायॉक्सॉइड वायू (SO2)
2 कुतूहल: मिथेन वायू – ‘जळता बर्फ’
3 कुतूहल: कार्बन डायऑक्साइड वायू (CO2)
Just Now!
X