भारतासारख्या विकसनशील देशात बदलणाऱ्या जीवनशैलीबरोबर मोबाइल, लॅपटॉप इत्यादी उपकरणांचा वापर वाढला आहे आणि परिणाम म्हणून विजेचा वापरही मोठय़ा प्रमाणात होत आहे. वीज हे ऊर्जेचेच एक रूप असले, तरी तिच्या निर्मितीसाठी नैसर्गिक संसाधनांचा वापर करण्यात येतो. यामध्ये काही संसाधने पुनर्नवीकरणाची क्षमता असलेली (रिन्युएबल) आहेत; तर काही संसाधने मूलत: नैसर्गिक असली तरी त्यांचे पुनर्नवीकरण होऊ शकत नाही (नॉन-रिन्युएबल)- यात सर्वात आघाडीवर आहे तो कोळसा!

हा मुख्यत: वनस्पतीजन्य कार्बनी पदार्थाचा बनलेला खडक आहे आणि तो पृथ्वीच्या पोटात दडलेल्या खाणींमध्ये थरांच्या रूपात आढळतो. कोटय़वधी वर्षांपूर्वीपासून पृथ्वीवर अस्तित्वात असलेले वृक्ष, वनस्पती, प्राणी, सूक्ष्म जीव मृत झाल्यानंतर दलदलीत गाडले जात असत. ही प्रक्रिया सातत्याने लाखो वर्षे सुरू राहिली व या सजीवांच्या मृत अवशेषांचे एकावर एक असे जाड थर तयार होत गेले. काळाच्या ओघात पाण्यासोबत वाहून आलेला गाळ या थरांवर साठत राहिला आणि गाळाचे खडक (सेडीमेंटरी रॉक्स) तयार झाले. थोडक्यात, वीजनिर्मितीसाठी आपण वापरत असलेला कोळसा निर्माण होण्याची प्रक्रिया सुरू होऊन पूर्ण होण्यासाठी कोटय़वधी वर्षे लागली.

मानवाच्या वापरासाठी हा कोळसा खाणींमधून उत्खनन करून काढावा लागतो. भारतात कोळसा अगदी प्राचीन काळापासून माहीत आहे. मात्र, पाश्चात्त्य लोक येथे येण्यापूर्वी त्याचे खाणकाम किंवा त्याचा व्यापार यांना सुरुवात झालेली नव्हती. १७७४ साली बीरभूम (प. बंगाल) व पांचेत (झारखंड) या जिल्ह्य़ांत कोळसा प्रथम सापडला. १८२० साली पहिली खाण राणीगंज (प. बंगाल) येथे सुरू झाली. १८५४ साली पूर्व भारतीय रेल्वे सुरू झाल्यावर कोळशाची मागणी व उत्पादन वाढले. पुढे तागाच्या गिरण्या सुरू झाल्यावर कोळशाला अधिकाधिक मागणी येऊन दरवर्षी उत्पादनातही वाढ होऊ लागली. आजच्या घडीला भारताच्या एकूण वीजनिर्मितीच्या ७२ टक्के वीजनिर्मिती ही कोळशावर अवलंबून आहे, तर प्राथमिक ऊर्जानिर्मितीत कोळशाचा वापर ४२ टक्के एवढा आहे. त्याचप्रमाणे देशातील एकूण औष्णिक विद्युतनिर्मिती केंद्रांपैकी ८५ टक्के केंद्रांमध्ये मूलभूत इंधन म्हणून कोळशाचा वापर होतो.

अर्थात, गेल्या चार महिन्यांत टाळेबंदीमुळे एकूणच सर्व व्यवहार ठप्प झाले होते. विजेच्या मागणीत कमालीची घट झाली होती आणि त्यामुळे कोळशाचा वापरदेखील कमी झाला होता. परंतु आत्ता हळूहळू व्यवहार पूर्ववत होऊ लागले आहेत आणि विजेची मागणीदेखील वाढू लागली आहे. त्यामुळे कोळशाचा वापर पुन्हा मोठय़ा प्रमाणात होऊ लागेल असे दिसते.

– भाग्यश्री ग्रामपुरोहित

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org