21 November 2019

News Flash

सापेक्षतावादाचे अपत्य

व्यापक सापेक्षतावादानुसार प्रत्येक वस्तूचा, आजूबाजूच्या अंतराळावर परिणाम होऊन या अंतराळाला वक्रता प्राप्त होते.

व्यापक सापेक्षतावादानुसार प्रत्येक वस्तूचा, आजूबाजूच्या अंतराळावर परिणाम होऊन या अंतराळाला वक्रता प्राप्त होते. एखाद्या खगोलीय वस्तूची हालचाल झाली, की अंतराळाच्या या वक्रतेत फरक पडतो. तलावातील संथ पाण्यात दगड टाकल्यावर निर्माण होणाऱ्या लहरी जशा दूरवर पसरत जातात, तसाच वक्रतेतील हा बदल ‘गुरुत्वीय लहरीं’च्या स्वरूपात प्रकाशाच्या वेगाने दूरवर पसरत जातो. अशा गुरुत्वीय लहरी निर्माण होत असल्याची शक्यता आइन्स्टाइनने १९१६ सालीच व्यक्त केली. सापेक्षतावादाचे अपत्य असणाऱ्या या गुरुत्वीय लहरी अतिशय क्षीण असल्याने, त्या प्रत्यक्षात टिपता येतील की नाही, याची आइन्स्टाइनला स्वतलाच शंका होती.

या गुरुत्वीय लहरींचा पहिला अप्रत्यक्ष पुरावा १९७४ साली मिळाला. रसेल हल्स आणि जोसेफ टेलर या अमेरिकन संशोधकांना प्युटरे रिको येथील अरेसिबो रेडिओ दुर्बणिीतून वेध घेताना ताऱ्यांची एक वैशिष्टय़पूर्ण जोडी सापडली. एकमेकांभोवती अवघ्या ७.७ तासांत प्रदक्षिणा घालणाऱ्या या ताऱ्यांचा प्रदक्षिणाकाळ वर्षांला दोन सेकंदांनी कमी होत होता. प्रदक्षिणाकाळातील ही घट या ताऱ्यांची ऊर्जा घटत असल्याचे दर्शवते. व्यापक सापेक्षतावादावर आधारलेल्या गणितानुसार ही घटणारी ऊर्जा गुरुत्वीय लहरींच्या स्वरूपात उत्सर्जति होत असल्याचे स्पष्ट झाले आहे, परंतु या गुरुत्वीय लहरी प्रत्यक्षात मात्र सापडलेल्या नाहीत.

गुरुत्वीय लहरी शोधण्यात सर्वप्रथम यश आले ते १४ सप्टेंबर २०१५ रोजी लायगो प्रकल्पातील संशोधकांना. लायगोद्वारे नोंदल्या गेलेल्या पहिल्यावहिल्या गुरुत्वीय लहरी या, सूर्याच्या तीस-पस्तीसपट वस्तुमान असणाऱ्या दोन कृष्णविवरांच्या भीषण टकरीतून निर्माण झाल्या होत्या. गुरुत्वीय लहरी पृथ्वीवर येऊन पोहोचल्यावर, पृथ्वीभोवतालच्या अंतराळातील वक्रतेत अल्पावधीसाठी काहीसा ताण निर्माण होतो. या ताणामुळे प्रकाशकिरण पार करत असलेल्या मार्गाच्या लांबीत किंचित फरक पडतो. प्रकाशकिरणाचा मूळ मार्ग जितका लांब, तितका हा फरक अधिक. या लायगो प्रकल्पात प्रकाशकिरण म्हणून लेझर किरणांचा वापर केला आहे आणि त्यांच्या प्रवासासाठी चार किलोमीटर लांबीचा बोगदा बांधला आहे. गुरुत्वीय लहरींची नोंद एकमेकांपासून दूर असणाऱ्या किमान दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून होणे गरजेचे आहे. त्यामुळे लायगो प्रकल्पातली अशी दोन एकसारखी असणारी साधने, अमेरिकेतील हॅम्फर्ड आणि लिव्हिगस्टन या एकमेकांपासून तीन हजार किलोमीटर दूर असणाऱ्या दोन ठिकाणी उभारली आहेत.

– डॉ. राजीव चिटणीस

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org

First Published on July 1, 2019 12:03 am

Web Title: theory of relativity
Just Now!
X