News Flash

थोरिअम आणि अणुऊर्जा

न्युट्रॉन्सचा प्रवाह बंद केला की थोरिअमचे विखंडनशील-युरेनिअममध्ये होणारे रूपांतर थांबते आणि पुढची अभिक्रियादेखील थांबते.

ऊर्जा आणि इंधन सध्या महत्त्वाचे प्रश्न बनले आहेत. अणुऊर्जा हा एक पर्याय असला तरी विखंडन प्रक्रिया नियंत्रित करणे ही फार महत्त्वाची बाब आहे. थोरिअम हे स्वत: विखंडनशील नसल्यामुळे शृंखला अभिक्रिया सुरू होण्याचा अथवा ती अनियंत्रित स्थितीत जाऊन स्फोट होण्याचा धोका पुष्कळच कमी होतो. न्युट्रॉन्सचा प्रवाह बंद केला की थोरिअमचे विखंडनशील-युरेनिअममध्ये होणारे रूपांतर थांबते आणि पुढची अभिक्रियादेखील थांबते.

थोरिअमपासून अणुऊर्जा निर्मितीच्या प्रक्रियेतही वापरून उरलेले इंधन किंवा इंधन कचरा हा किरणोत्सारी असतो आणि या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची हा प्रश्न उभा राहतो. परंतु युरेनिअमच्या इंधन कचऱ्याच्या १०,००० वर्षांच्या तुलनेत थोरिअमचा इंधन कचरा ५०० वर्षांतच निरुपद्रवी बनतो. त्यामुळे युरेनिअमच्या तुलनेत याचे व्यवस्थापन सोपे ठरते. याशिवाय, थोरिअमच्या अभिक्रियेत अण्वस्त्रे निर्माण करण्यासाठी लागणारी प्लुटोनिअमसारखी मूलद्रव्येही तयार होत नाहीत. त्यामुळे एखादी राजवट अणुऊर्जेच्या आवरणाखाली गुप्तपणे अण्वस्त्रे विकासाचा कार्यक्रम तर राबवत नाही ना? यासारखे प्रश्नच निर्माण होत नाहीत.

इतके फायदे असतानाही गेल्या ६० ते ७० वर्षांत थोरिअमपासून अणुऊर्जा निर्माण करू शकणारी एकही अणुभट्टी कशी तयार झाली नाही? हा प्रश्न स्वाभाविकच उद्भवतो. याचे उत्तर दुसऱ्या महायुद्धानंतर लगेच सुरू झालेल्या शीतयुद्धात आहे. सन १९५० नंतर पुढची ४० ते ५० वष्रे एकमेकांवर वरचढ होण्यासाठी जास्तीतजास्त अण्वस्त्रे बनविण्याची शर्यत रशिया आणि अमेरिकेमध्ये होती. पण अणुऊर्जेची गरज कुणालाच नव्हती. अण्वस्त्रांसाठी युरेनिअम आणि प्ल्युटोनिअमची आवश्यकता असल्याने संशोधनाचा सारा भर युरेनिअमवरच होता आणि थोरिअम मागे पडले.

शीतयुद्धाची समाप्ती आणि कमीतकमी प्रदूषण करून ऊर्जानिर्मिती आणि ऊर्जेचा वापर याला आलेले महत्त्व, यामुळे थोरिअमवर आधारित अणुऊर्जा ही पुन्हा प्रकाशझोतात येत आहे. या प्रयत्नांत भारत आघाडीवर आहे. दक्षिण भारतात विशेषत: केरळच्या समुद्रकिनाऱ्यावरची वाळू ही मोनाझाइट, थोरिअमचे खनिजमिश्रित आहे. एका अंदाजानुसार भारताच्या समुद्रकिनाऱ्यावर तीन लाख ते आठ लाख टन इतके थोरिअमचे साठे आहेत. भारताची थोरिअमवर चालणारी पहिली अणुभट्टी तामिळनाडूत कल्पाक्कम येथे उभी राहात आहे आणि लवकरच ती कार्यान्वित होईल.

– योगेश सोमण

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2018 3:05 am

Web Title: thorium and nuclear power
Next Stories
1 ब्राह्मी लिपी संशोधक जेम्स प्रिन्सेप (२)
2 जे आले ते रमले.. : जेम्स प्रिन्सेप (१)
3 कुतूहल : थोरिअमचे उपयोग
Just Now!
X