उत्पादन क्षेत्रात चार गोष्टी महत्त्वाच्या मानतात. कच्चा माल, पद्धती (Method), यंत्रे आणि मनुष्यबळ. उत्पादन यशस्वी करायचे असेल, तर ते अचूकपणे आणि कार्यक्षमतेने होणे आवश्यक असते. यंत्राची कार्यक्षमता मोजणे सोपे असते, पण माणसाची कार्यक्षमता कशी मोजणार?

एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी यावर अनेक तज्ज्ञांनी काम केले. फ्रेडरिक टेलर (१८५६-१९१५) याने त्यासाठी टाइम स्टडी पद्धत सुचवली. नंतर फ्रँक गिलब्रेथ (१८६८-१९२४) आणि लिलियन गिलब्रेथ (१८७८-१९७२) यांनी त्यात मोशन स्टडीची भर घातली. आज या दोन्ही पद्धती टाइम अ‍ॅण्ड मोशन स्टडी अशा एकत्रितपणे ओळखल्या जातात.

एखादे काम करताना त्यात किती छोटय़ा छोटय़ा उपक्रिया किंवा पायऱ्या आहेत आणि त्या प्रत्येकासाठी किती वेळ लागतो याची माहिती मिळवली जाते. अनेक कामगारांच्या अशा सांख्यिकी मोजमापामधून (Statistics) एक  मानक (Standard) निर्माण केले जाते आणि मग प्रत्येकाची कार्यक्षमता या मानकाच्या तुलनेत मोजली जाते असे या पद्धतीचे थोडक्यात वर्णन करता येईल.

उदाहरणार्थ, बांधकामाची एक वीट रचताना चार कामगारांना ४, ४, ४, ५ सेकंद असा वेळ लागत असेल, तर मानक वेळ होते ४ सेकंद. या मानकाच्या तुलनेत चौथ्या कामगाराची कार्यक्षमता कमी आहे. शिवाय एका विटेला ४ सेकंद या माहितीवरून कामाची आखणी आणि उत्पादन खर्च अचूक ठरवता येतो.

या पद्धतीने कामगारांची कार्यक्षमता मोजण्याची सुरुवात पहिल्यांदा उत्पादन क्षेत्रात झाली. पुढे टाइम अ‍ॅण्ड मोशन स्टडी अनेक क्षेत्रांत वापरली गेली आहे. आपणही घरातील कामे करताना, खरेदीसाठी वेगवेगळ्या ठिकाणी फिरताना ही पद्धत अमलात आणून आपली कार्यक्षमता वाढवू शकतो.

टाइम अ‍ॅण्ड मोशन स्टडी केल्यावर बऱ्याचदा प्रक्रियेतील चुकीच्या किंवा वेळखाऊ पायऱ्या लक्षात येतात. काही वेळा पायऱ्यांचा क्रम बदलून किंवा दोन-तीन पायऱ्या एकत्र करून ती प्रक्रियाच अधिक सुसंगत करता येते. तर काही वेळा कामगारांची कामाशी योग्य सांगड घालून किंवा चांगली उपकरणे वापरून कार्यक्षमता वाढवता येते.

अलीकडे कामाचा वेळ आणि कार्यक्षमता मोजमापनासाठी इतरही वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात.

मेघश्री दळवी

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

 

महादेवी वर्मा : ज्ञानपीठावरील विचार..

१९८२ चा ज्ञानपीठ पुरस्कार स्वीकारल्यावर महादेवी वर्मानी केलेल्या भाषणात साहित्यिकांच्या भूमिकेविषयी काही विचार व्यक्त केले. त्या म्हणाल्या, ‘कोणत्याही पुरस्काराच्या अपेक्षेने साहित्य लिहिले जात नाही, हे आपण जाणताच. किंवा कोणताही पुरस्कार साहित्याला महत्त्वपूर्ण बनवू शकत नाही. पण पुरस्काराच्या मागे विद्वान लोकांची स्वीकृती असते, तीच लेखकाला आनंद देण्यास कारणीभूत ठरते.

कधी कधी साहित्यिकाला त्याच्या काळातील लोकही समजू शकत नाहीत, पण अशा स्थितीतही तो लेखनापासून दूर होत नाही. सामान्यत: साहित्यिक एखाद्या पोकळीत उत्पन्न होत नाही. तो एका विशेष युगात, विशेष समाजात आणि विशेष वातावरणात उत्पन्न होतो. त्यामुळे त्या काळाचा प्रभाव त्याच्यावर असणं स्वाभाविक आहे. फरक इतकाच आहे की, त्या युगाची जाणीव त्याला असतेच. पण युगानंतरची जाणीवही त्याला असते.  .. .. .. आधुनिक युगात साहित्यिकाला सर्वात मोठे आव्हान विज्ञानाने दिले आहे. विज्ञान हे भौतिक जगातील गोष्टींचा शोध घेते. त्याच्या मदतीने त्याला निसर्गावर विजय मिळवता येतो. पण ही शक्ती दिशाहीन आणि अनियंत्रित राहते.

जीवनात काही मंगल घडवायचे असेल, तर मनुष्यात तरल संवेदनशीलता असणे आवश्यक आहे. जर मनुष्यात संवेदनशीलता उरली नाही तर ज्वालामुखीच्या तोंडावर बसलेली मानवजात कोणत्याही क्षणी नष्ट होऊ शकेल. या भौतिक जवळीकीने मानवाची मने जवळ आणली नाहीत, उलट त्यांनी मानवाला एकमेकांपासून इतके अपरिचित बनवले की, त्याच्या मनात करुणा उत्पन्न होत नाही, की त्याला त्याचा पश्चात्तापही होत नाही.  .. .. .. प्रत्येक युगातल्या साहित्यिकाला नेहमी आव्हानांना सामोर जावे लागलेले आहे. ते आव्हान त्याला कधी धर्माकडून, तर कधी राजकीय परिस्थितीकडून, तर कधी समाजाकडून मिळालेले आहे. या सर्वानी कधी ना कधी साहित्यासमोर अशी परिस्थिती निर्माण केलेली आहे, की तिच्याशी संघर्ष केल्याशिवाय त्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचणे शक्य झालेले नाही. त्यामुळे प्रत्येक साहित्यिकाला क्रांतिकारी होणे भागच पडलेले आहे. आणि आपल्या विद्रोहासाठी त्याने शिक्षादेखील आनंदाने भोगलेली आहे.

प्रत्येक छोटय़ा-मोठय़ा, विकसित-अविकसित देशांतील कवींच्या पुढे जीवनाचे जे आव्हान आहे, ते स्वीकारूनच तो मानवजातीचे कल्याण करू शकेल.

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com