कर्करोगावर किरणोत्सारी विकिरणांचा मारा करण्याची उपचारपद्धती आता चांगलीच रूढ झाली आहे. यात बहुधा कोबाल्टच्या ६० अणुभाराच्या समस्थानिकामधून उत्सर्जति होणाऱ्या गॅमा किरणांचा मारा करण्यात येतो. गॅमा किरण चांगलेच भेदक असल्यामुळे ते दूरदूरवर सहज मजल मारू शकतात. त्यामुळे त्या किरणांचा स्रोत शरीराच्या बाहेर ठेवून त्यांचा हल्ला कर्करोगग्रस्त पेशींवर किंवा त्यांनी जिथं आपलं बस्तान बसवलं आहे त्या भागावर करणं शक्य होतं. पण या किरणांची संहारक शक्तीही तगडी असल्यानं त्यांच्या झोतापासून इतर निरोगी अवयवाचा बचाव कसा करायचा, हा प्रश्न सतावतो. त्यासाठी मग तो झोत अतिशय निमुळता आणि टोकदार बनवून तो केवळ कर्करोगाच्या गाठीवरच नेम धरेल याची व्यवस्था करावी लागते.

म्हणून गॅमा किरणांच्या ऐवजी बीटा किरणांचा वापर करता येईल का याचा वेध वैज्ञानिक घेत होते. बीटा किरणांची भेदक क्षमता गॅमा किरणांपेक्षा कमी असते. त्यामुळे त्यांचा स्रोत शरीराच्या बाहेर ठेवून काहीच उपयोग होत नाही. कारण शरीरापर्यंत पोहोचेतोच ते थकून जातात. आत शिरकावही करू शकत नाहीत. मग त्या कर्करोगग्रस्त पेशींना काय धक्का पोहोचवणार? पण तो स्रोत शरीरातच ठेवणं मात्र शक्य होतं. इथंच आयोडिन उपयोगी ठरतं. आयोडिनच्या १३१ अणुभाराच्या समस्थानिकामधून बीटा किरण उत्सर्जति होतात. थायरॉईड ग्रंथी सामान्यत आयोडिन शोषून घेत असते. त्यामुळे आयोडिन १३१ ज्यात आहे अशी कुपी त्या ग्रंथीतील कर्करोगाच्या गाठीत ठेवली जाऊ शकते. तिथून मग अहोरात्र त्यातल्या बीटा किरणांचा मारा त्या कर्करोगग्रस्त पेशींवर होत राहतो. त्यांचा बंदोबस्त करतो. बीटा किरण कमी संहारक असले तरी शरीराच्या आतूनच त्यांचा हल्ला होत असल्यामुळे त्यांची सर्व संहारक शक्ती त्या गाठीतच खर्ची पडते आणि आपली कामगिरी यशस्वीरीत्या पार पाडू शकते. ट्रॉयच्या ऐतिहासिक लढाईत भक्कम तटबंदी असलेल्या शत्रूच्या गोटात लाकडी घोडा पाठवून त्या घोडय़ाच्या पोटातल्या सनिकी तुकडीचा हल्ला करण्याची युक्ती योजली गेली होती. कर्करोगाच्या गाठीत ठेवली जाणारी ही किरणोत्सर्गी आयोडिनची कुपी म्हणजे आधुनिक ट्रॉयचा घोडाच आहे. घरात शिरून शत्रूला नेस्तनाबूत करण्याची किमया हा आयोडिनचा घोडा सहज साध्य करू शकतो. आयोडिनच्या आणखी एका उपयोगी गुणधर्माची प्रचीती देतो.

डॉ. बाळ फोंडके

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org