पूर्व युरोपातील युक्रेनच्या परिसरात प्रथम पूर्व स्लाव वंशाच्या लोकांनी वस्ती केली. युक्रेन या शब्दाचा अर्थ सीमेवरचा प्रदेश असा होता. १९ व्या शतकात युक्रेनच्या दोनतृतीयांश भागावर रशियन तर एकतृतीयांश भागावर ऑस्ट्रिया-हंगेरीने कब्जा करून ते आपापल्या साम्राज्यात समाविष्ट केले. १९व्या शतकाच्या अखेरीस युक्रेनियन बुद्धिजीवी वर्गात राष्ट्रवाद आणि अस्मिता यांचा उदय होऊन स्वायत्तता मिळविण्यासाठी विचार सुरू झाला. पुढे १९१४ साली पहिले महायुद्ध सुरू झाले. या युद्धात जर्मन साम्राज्य, ऑस्ट्रिया-हंगेरी साम्राज्य आणि ऑटोमान साम्राज्य एका आघाडीत तर त्यांच्या विरोधी आघाडीत तिहेरी युतीचे रशियन साम्राज्य, फ्रान्स आणि ग्रेट ब्रिटन हे प्रमुख देश होते. वर उल्लेख केल्याप्रमाणे १९व्या शतकाच्या उत्तरार्धात युक्रेनचा पूर्वेचा मोठा प्रदेश रशियन साम्राज्याच्या तर उर्वरित, पश्चिमेकडील प्रदेश ऑस्ट्रिया-हंगेरी साम्राज्याच्या ताब्यात होता. पहिले महायुद्ध सुरू झाले, त्यामागे ऑस्ट्रिया आणि सर्बिया यांमध्ये झालेला संघर्ष हे कारण होते. या युद्धात रशिया हा सर्बियाच्या बाजूने उतरल्यावर जर्मनी ऑस्ट्रियाच्या मदतीला उतरला. युक्रेन, या काळात अर्धा रशियाच्या तर उर्वरित अर्धा ऑस्ट्रियाच्या अमलाखाली असल्यामुळे पूर्वेकडील रशियन युक्रेनचे मोठे सैन्य रशियाबरोबर दोस्तराष्ट्र आघाडीतून लढले. तर पश्चिमेकडील ऑस्ट्रियन अमलाखालील युक्रेनचे सैन्य जर्मनी-ऑस्ट्रियाच्या सेंट्रल पॉवर्स या आघाडीतून लढले. यामध्ये रशियाच्या बाजूने ३५ लाख युक्रेनचे सैन्य तर ऑस्ट्रियाच्या बाजूने अडीच लाख सैन्य पहिल्या महायुद्धात लढले. १९१८ साली संपलेल्या पहिल्या महायुद्धानंतरची महत्त्वाची गोष्ट म्हणजे युरोपातली अनेक साम्राज्ये अस्त पावली. यामध्ये रशियन तसेच ऑस्ट्रो-रशियन साम्राज्याचाही समावेश आहे. महायुद्धाच्या या धामधुमीतच १९१७ साली रशियात दोन राज्यक्रांती आणि पाठोपाठ नागरी युद्ध झाले. त्यानंतर ब्लादिमीर लेनिन यांच्या नेतृत्वाखाली सोव्हिएत युनियनची स्थापना होऊन त्यांचा बोल्शेवीक हा माक्र्सवादी कम्युनिस्ट पक्ष सत्तेवर आला. रशियात झालेल्या या घडामोडींचे पडसाद शेजारच्या युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात उमटले. रशियन आणि ऑस्ट्रियन साम्राज्ये संपल्यामुळे त्यांच्या वर्चस्वाखालील युक्रेन २०१७ साली मुक्त झाले.

 – सुनीत पोतनीस

sunitpotnis94@gmail.com