दिवसा परागीभवन होणाऱ्या वनस्पतींची फुलं उठावदार रंगाची असतात. जर परागीभवन पक्षी अथवा अन्य सस्तन प्राण्यामार्फत होणार असेल (उंदराकडूनही चुकून परागीभवन झाल्याचा उल्लेख सापडतो) तर फुले आकाराने मोठी असून त्यात मकरंदाचे प्रमाणही अधिक असते. उदा. पांगारा, काटेसावर. माणसातर्फे होणारे परागीभवन कृत्रिम असतं व ते बहुधा नवीन जातीच्या संशोधनासाठी केलं जातं. यावरून लक्षात येतं की प्रत्येक जातीच्या वनस्पतींच्या फुलांची रचना, फुलण्याची वेळ व फुलण्याचा हंगाम या गोष्टी तिचं परागीभवन करणाऱ्या प्राण्याला (कीटक , पक्षी वा अन्य प्राणी) भावेल, अशा पद्धतीनेच निसर्गाने विकसित केले आहे.
जेव्हा एखादा कीटक परागकण किंवा मकरंद खाण्यासाठी फुलावर बसतो, तेव्हा त्या खाद्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्याला फुलाच्या सर्वात आतल्या भागापर्यंत जावे लागते. असे करताना वरच्या पातळीवर असलेले परागकण त्याच्या शरीराच्या विविध अवयवांना चिकटतात. तिथून उडून दुसऱ्या फुलांवर बसताना हेच परागकण त्या फुलांवर पडतात. म्हणजे परागसिंचन होतं व पुढे फलधारणेची क्रिया होते. मात्र कीटकाला आपण काय पराक्रम केला हे माहीतच नसतं.
मधमाशी, कुंभारमाशी, सुतारमाशी हे कीटक परागीभवनात प्रमुख भूमिका बजावतात. आंबा, काजू, िलबू जातीतील फळझाडं, बदाम, एप्रिकॉट त्याचप्रमाणे सूर्यफूल, अळशी, राई अशा तेलबियांच्या उत्पादनात कीटक  परागीभवनामुळे भरघोस वाढ झाली आहे. भारतात कीटक फुलांकडे येण्याची वेळ ही साधारणत: सकाळी साडेसहा ते दुपापर्यंत असते. मधमाश्या सकाळी साडेनऊ ते साडेअकरा या वेळेत जास्त कृतिशील असतात. एकूण कीटकांत मधमाश्या व त्यांच्या जवळच्या जातींच्या माश्यांचे प्रमाण ९८ ते ९९ टक्के इतके आहे. मधमाश्यांचा सहभाग हा व्यावसायिक फळबागा, काकडी वर्गातील अनेक भाज्या जसे काकडी, खरबूज, किलगड, भोपळे, पडवळ आणि स्ट्रॉबेरीसारख्या फळांच्या फलधारणेसाठी अत्यंत उपयुक्त ठरला आहे. मधमाश्यांची कृत्रिम पदास करून बागा, मळे यांमध्ये त्या ठेवल्यावर उत्पन्नात २० ते ३० टक्के वाढ झाल्याची उदाहरणे आहेत. अशा या उपयुक्त कीटकांवर विषारी द्रव्यांची फवारणी करून आपण आपल्याच पायांवर धोंडा तर मारून घेत नाही ना!
– डॉ. विद्याधर ओगले    मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  
office@mavipamumbai.org

जे देखे रवी..: ‘ही’ आणि मी..
१९६४च्या मे महिन्यात माझे लग्न झाले. आमच्या दोघांचे वडील एकमेकांचे मित्र होते आणि मध्यस्थही त्यांचा मित्र होता. त्या काळात वडील वॉर्डन रोडला राहत आणि माझी सासुरवाडी माटुंग्याची; पण वस्तुस्थिती उलटी होती. आम्ही सरकारी घरात होतो आणि सासऱ्यांची स्वत:ची इमारत होती.
ती मंडळी वऱ्हाडातली आम्ही औरंगाबाद येवल्याचे.
हिला मी आधीच हेरले होते. लांब केस, सुंदर डोळे आणि बालिश भाव ही वैशिष्टय़े आणि सडपातळ अंगकाठी होती. ती मंडळी श्रीमंत होती तेव्हा रविन थत्तेला लॉटरी लागली किंवा रविन चांगल्या घरात पडला असला विनोद झाल्याचे आठवते.
सासुबाई सुग्रण आतिथ्यशील आणि मोकळ्या हाताच्या. होणारे सासरे मुंबईतलेच नव्हे तर भारतातले अग्रगण्य क्ष-किरण तज्ज्ञ. यांच्यावर भारत सरकारने पोस्टाचे तिकीट काढले. माणूस मोठा लोभस, हौशी आणि उमदा होता. त्यांना शिकारीचा छंद होता. लग्न झाले तेव्हा त्यांनी आमच्या खोलीसाठी फर्निचर दिले.  एकदा मी उशिरा आलो म्हणून ही रागावली तेव्हा सासूबाई म्हणाल्या, ‘आम्ही आता तुमच्या गळ्यात घंटा बांधली आहे किती खणखणू दय़ायची हे तुम्हीच ठरवा.’
तसे आमच्यात काहीच साम्य नव्हते. जो नट मला बायल्या वाटत असे त्या देव आनंदचा बंगला हिचे तीर्थक्षेत्र होते. हिला कपडय़ाची भारी आवड मी गबाळा होतो. हिला चष्मेवाला नवरा नको होता, मला नोकरी न करणारी बायको हवी होती. पुढे मला चाळिशी लागली तेव्हा हिने नोकरी सुरू केली.
हिचे नाव आशा. ते तिने यथार्थ ठरविले. आनंदी आणि उत्साही स्वभाव ही तिची वैशिष्टय़े. आमच्या संसारात दोन फार मोठय़ा त्सुनामी आल्या आणि दोन भूकंप झाले. त्यांचे वर्णन करावे की नाही हा प्रश्न सध्या प्रलंबित आहे. स्वत:ची दु:खे चव्हाटय़ावर मांडणे हिला पसंत नाही आणि मी तिचे ऐकणार आहे, पण या अतिजीवघेण्या प्रसंगामुळे ही डगमगली तर नाहीच, पण अशा स्थितीत स्त्री सुलभ मन असूनही कसे जगावे याचा आदर्श तिने घालून दिला.
मी जरा नफ्फ्टच होतो पण ही डगमगली असती तर मला झेपले नसते. तत्त्वज्ञान समजायला मला ज्ञानेश्वरी वाचावी लागली.. हिला हे जग फार गंभीरपणे घेण्यात अर्थ नाही हे ज्ञान उपजत होते.
‘आशा नाम मनुष्याणांकाचिदआश्चर्यशृंखला’ असे सुभाषित आहे. या माझ्या शृंखलेने मला स्वतंत्रपणे जगू दिले आणि स्वत: संसार सांभाळला.
रविन मायदेव थत्ते  
rlthatte@gmail.com

How Sugar Effects On body can digestive cookie make you fat
बिस्किटाच्या पुड्यात किती साखर असते? क्रीम, गोडाची व चटपटीत बिस्किटांची निवड करताना काय बघावं?
feast of snowballs juicy fruits and green fodder for animals at Karunashram Orphanage in Wardha
वन्यप्राणी करताहेत उन्हाळा एन्जॉय! बर्फ के गोले, रसभरीत फळे अन हिरवा चारा यांची मेजवानी
Can adding salt to drinking water help prevent dehydration this summer
उन्हाळ्यात पाण्यात चिमूटभर मीठ टाकून प्यावे का? डॉक्टर काय सांगतात वाचा….
kairi curry recipe in marathi
Recipe : हिरव्यागार कैऱ्यांचे आंबटगोड सार; कसे बनवायचे पाहा कृती अन् प्रमाण

वॉर अँड पीस : कुरूप
पायाला जर खडा टोचला वा काटा लागला तर काय होते हे सर्वानाच माहीत आहे. पायाला एक वा अनेक कुरुपे झालेल्यांचे दु:ख याहून अधिक व वाईट असते. ‘अ‍ॅसिड लावणे’, ब्लेडने कापून काढणे, कॉर्नकॅप लावणे, तूप वा मलम लावणे असे नाना उपाय चालू असतात. हा विकार अनवाणी चालणाऱ्यांना किंवा खेडय़ातील लोकांनाच होतो असे नसून शहरी जीवनात रममाण झालेल्यांनाही होतो. एका रुग्णाच्या रबरी चपलेला, त्याच्या दोन्ही पावलांना झालेल्या अनेक कुरुपांमुळे खड्डे पडलेले मी पाहिले आहेत. त्याला  कुरुपांमुळे एक पाऊलही टाकणे मुश्कील होत होते.
या विकारातील रुग्णांची त्वचा अपवादात्मक खूप मऊ असते. मी पाहिलेल्या रुग्णांपैकी बहुतांशी रुग्णांची तळपायाची त्वचा इतरांच्या तुलनेत खूपच कोमल असल्याचे निदर्शनाला आले आहे. या विकारांत तळपाय किंवा क्वचित तळपायाच्या फुगवटय़ाच्या वरची त्वचा निर्जीव झालेली असते. त्या निर्जीव जागी विलक्षण दुखत असते. त्या भागावर दाब देऊन चालताना अधिक त्रास होतो. कुरूप कुरतडले, कापले तरी पुन्हा वाढते.
तळपायावरील कुरूप उंचवटय़ावर की खोलगट जागी आहे हे पाहावे. कुरुपाची जागा ही निश्चितपणे दडस, जाड व निर्जीव आहे याची खात्री करून घ्यावी. बिलकूल न कापलेल्या दडस व उंचवटय़ावर असलेले कुरूप केवळ अग्निकर्माने बरे होते. पावलाच्या मध्यभागातील कोमल त्वचेवरील कुरुपाकरिता शतधौतघृत, तूप वा लोणी वापरावे. तळपायाच्या कडेला असलेल्या कुरुपाला अग्निकर्म व मलम या दोन्ही उपचारांची मदत होते.
कुरुपाच्या आकाराप्रमाणे लहान, मोठी टोकदार, गोल, चपटी, मूठ असलेली लोखंडी सळई घ्यावी. लालबुंद होईपर्यंत तापवावी. कुरुपाच्या निर्जीव जाड जागेवर डाग द्यावा. लगेचच त्या जागी गोवऱ्याची राख लावावी. डाग देताना थोडा धूर आला पाहिजे. नंतर चांगले तूप, शतधौतघृत लावावे. थोर शल्यतंत्रज्ञ श्री. सुश्रुताचार्याना प्रणाम।
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत : १८ एप्रिल
१८५८ > ‘भारतरत्न’ समाजसुधारक, पहिल्या महिला विद्यापीठाचे संस्थापक महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा जन्म. समाजसेवेतून वेळ काढून काही ग्रंथकार्य त्यांच्या हातून घडले. हर्बर्ट स्पेन्सरच्या पुस्तकाचा ‘आत्मनीतीची तत्त्वे’ हा अनुवाद, तसेच ‘राजनीतीची मूलतत्त्वे’ या पुस्तकाचा अनुवाद व १९१५ मध्ये त्यांनी लिहिलेले ‘आत्मवृत्त’ प्रसिद्ध झाले.
१८८६> कवी, कथाकार, भाषांतरकार बजाबा रामचंद्र प्रधान यांचे निधन. कवी वॉल्टर स्कॉटच्या काव्यावर आधारित ‘दैवसेनी’ हे त्यांनी रचलेले खंडकाव्य, इंग्रजी वळणाचे मराठीतील पहिले खंडकाव्य ठरले. रूपांतरांखेरीज, त्यांच्या स्वतंत्र दीर्घकथाही प्रसिद्ध झाल्या होत्या.
१९७२ > भारतरत्न  महामहोपाध्याय पांडुरंग वामन काणे यांचे निधन. ‘महाकाव्यांत प्रतिबिंबित झालेल्या आर्याच्या चालीरीती व नीती’ तसेच ‘अलंकारशास्त्राचा इतिहास’ या त्यांच्या दोन इंग्रजी निबंधांना मुंबई विद्यापीठाचे सुवर्णपदक मिळाले. ‘स्प्रिंगर रीसर्च स्कॉलर’ म्हणून महाराष्ट्राच्या भूगोलाचे त्यांनी संशोधन केले. ‘हिस्ट्री ऑफ धर्मशास्त्र’  हा ६०० पानांचा पाच खांडांतील ग्रंथ त्यांनी इंग्रजी व मराठीतही लिहिला. मराठीत त्यांची व्याख्यानेही ग्रंथरूप झाली.
– संजय वझरेकर