News Flash

अणुभार

रासायनिक प्रक्रियांमध्ये त्या-त्या मूलद्रव्यांचे अणू सहभागी असतात

रासायनिक प्रक्रियांमध्ये त्या-त्या मूलद्रव्यांचे अणू सहभागी असतात; ते जोडले जातात, विलग होतात अथवा त्यांची रचना बदलते; असे सर्व प्रथम ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ जॉन डाल्टन यांनी मांडले. आज मान्यता पावलेला अणू सिद्धांत अंशत: सर्वप्रथम त्यांनी जगापुढे ठेवला आणि एकच प्रोटॉन असलेल्या हायड्रोजनचा अणुभार एक हे एकक मानून १८०३ मध्ये जवळपास सहा मूलद्रव्यांचा सापेक्ष अणुभार त्यांनी मांडला. यात त्यावेळी ज्ञात असणाऱ्या हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन, सल्फर आणि फॉस्फरस या मूलद्रव्यांचा समावेश होता. पुढे साधारणपणे शतकानंतर, १९०९ सालचे नोबेल पारितोषिक विजेता जर्मन रसायनशास्त्रज्ञ फ्रीड्रिख विल्हेम ऑस्टवल्ड यांनी हायड्रोजनऐवजी आठ अणुक्रमांक असणाऱ्या आणि न्युक्लिअसमध्ये आठ  प्रोटॉन व आठ न्युट्रॉन असणाऱ्या ऑक्सिजनच्या अणुभाराचा एक सोळांश (१/१६) भाग एकक मानून त्याप्रमाणे सर्व मूलद्रव्यांचा सापेक्ष अणुभार मोजण्याचा विचार मांडला व पुढे ही पद्धत थोडय़ाफार फरकाने वर्ष १९६१ पर्यंत चालू होती. कारण, सुमारे १९२९ मध्ये निसर्गत: फार मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध असणाऱ्या ऑक्सिजनच्या- त्यापेक्षा थोडे जड असणाऱ्या- अन्य दोन समस्थानिकांचा शोध लागला आणि मग मुळातच प्रमाण मानलेल्या गृहीतकात फरक आढळल्याने त्यात या समस्थानिकांचा विचार क्रमप्राप्त झाला.

इंटरनॅशनल युनियन फॉर प्युअर एण्ड अप्लाइड केमिस्ट्री (आयुपॅक) या रसायनशास्त्रातील प्रमाणके ठरविणाऱ्या आंतराष्ट्रीय संघटनेने काही गोष्टी निश्चित केल्या. यात, सापेक्ष अणुभार ठरविताना ज्या समस्थानिकांचा विचार करावयाचा ती समस्थानिके पृथ्वीवर स्थिर अवस्थेत निसर्गत: उपलब्ध असावीत. या समस्थानिकांचा विचार करून १९६१मध्ये ऑक्सिजनऐवजी सहा अणुक्रमांकी कार्बनच्या -१२ या समस्थानिकाच्या अणुभाराच्या एक बारांश (१/१२) राशी एकक मानण्यात आली. या अणुभारांस एकीकृत अणुभार एकक (युनिफाइड अ‍ॅटोमिक मास युनिट) हे संबोधन मिळाले आणि त्यास इंग्रजी (४) अथवा (ऊं)ने दर्शविले जाऊ लागले. (ऊं) हे एकक जॉन डाल्टन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ!

निसर्गात समस्थानिकांच्या उपलब्धतेमध्ये भिन्न समस्थानिकांची विपुलता वेगवेगळी असते. ही सापेक्ष विपुलता लक्षात घेऊन पुढे सर्व ज्ञात मूलद्रव्यांचे अणुभार निश्चित करण्यात आले. मूलद्रव्याच्या संबोधनात वर त्याचा अणुक्रमांक, मध्ये त्याचे रोमन लिपीतील अक्षर, नंतर नाव आणि खाली त्याचा अणुभार, असे लिहिण्याची पद्धत रूढ आहे.

– विनायक कर्णिक

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2018 3:04 am

Web Title: what is molecular mass
Next Stories
1 अँग्लो इंडियन समाज
2 अणूची रचना
3 भारतातील ख्रिस्ती धर्मप्रसार
Just Now!
X