‘पृथ्वीचे वय’ हा पूर्वी चर्चेत असणारा एक मोठा मुद्दा होता. एका पद्धतीनुसार, पृथ्वीच्या पूर्वी तप्त असणाऱ्या कवचाचे तापमान आजच्या पातळीवर येण्यास लागणाऱ्या कालावधीच्या गणितावरून पृथ्वीचे वय काढण्याचा प्रयत्न झाला. आणखी एक पद्धत समुद्राच्या पाण्यातील, सतत विरघळत असणाऱ्या सोडियमचे किंवा सल्फेटचे प्रमाण आजच्या पातळीवर येण्यास लागलेल्या कालावधीच्या गणितावर आधारलेली होती. समुद्राच्या तळाशी जमा होणाऱ्या गाळातील थरांवरूनही पृथ्वीचे वय काढण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु या सर्व पद्धतींद्वारे मिळालेली वये ही, काही लाख वर्षांपासून ते काही अब्ज वर्षे, इतकी वेगवेगळी होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

किरणोत्साराचा शोध लागल्यानंतर अल्पकाळातच, पृथ्वीचे वय शोधण्याचा नवा मार्ग इंग्लिश संशोधक रुदरफर्ड याने दाखवून दिला. १९०५ साली, येल विद्यापीठात दिलेल्या व्याख्यानात रुदरफर्डने किरणोत्साराचा वापर पृथ्वीचे वय काढण्यासाठी करता येण्याची शक्यता व्यक्त केली. जुन्या खडकात युरेनियमची खनिजे सापडतात. किरणोत्सारामुळे युरेनियमच्या या अणूंचा सतत ऱ्हास होत असतो. हा ऱ्हास होताना अल्फा कणांचे म्हणजे हेलियमचे उत्सर्जन होत असते. त्यामुळे एखाद्या खडकातील हेलियमच्या प्रमाणावरून, त्या खडकात इतका हेलियम गोळा होण्यास किती काळ लागला ते कळू शकते. हा काळ म्हणजेच त्या खडकाचे वय. आणि पर्यायाने जवळपास पृथ्वीचेही वय! मात्र काही हेलियम खडकातून निसटून गेला असल्यास, पृथ्वीच्या वयाचे हे गणित चुकण्याची शक्यता खूद्द रुदरफर्डनेच व्यक्त केली.

रुदरफर्डने सुचवलेली दुसरी अधिक खात्रीची पद्धत हीसुद्धा युरेनियमच्या ऱ्हासावरच आधारलेली होती. युरेनियमचा ऱ्हास होऊन त्यापासून शिशाची निर्मिती होते. त्यामुळे खडकातल्या युरेनियमची आणि त्यापासून निर्माण झालेल्या शिशाच्या प्रमाणांची तुलना करून त्या खडकाचे वय काढणे शक्य होते. मात्र या पद्धतीत, युरेनियमपासून निर्माण होणाऱ्या शिशाच्या विशिष्ट समस्थानिकाचे प्रमाण माहीत असायला हवे. १९२७ साली फ्रान्सिस अ‍ॅस्टन याने बनवलेल्या मास स्पेक्ट्रोग्राफ या साधनाद्वारे शिशाच्या हव्या त्या समस्थानिकाचे प्रमाण मोजणे शक्य झाले. रुदरफर्डने या पद्धतीचा वापर करून पृथ्वीचे वय निदान ३.४ अब्ज वर्षे असल्याचे दाखवून दिले. कालांतराने समस्थानिकांवर आधारलेल्या या पद्धतीत अधिकाधिक अचूकता येऊन, १९५०च्या दशकात हे वय ४.५ अब्ज म्हणजे आजच्या स्वीकृत वयाच्या आसपास येऊन पोहोचले.

– डॉ. राजीव चिटणीस मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Age of the earth akp
First published on: 31-10-2019 at 02:44 IST