प्रकाश हा लहरींच्या स्वरूपात मार्गक्रमण करत असल्याचे मत १७ व्या शतकात रॉबर्ट हूक, क्रिस्तियान हायगेन्स यांनी, तर १९ व्या शतकात जेम्स मॅक्सवेल याने व्यक्त केले. त्यामुळे प्रकाशाच्या निर्वात पोकळीतील मार्गक्रमणासाठी एखाद्या माध्यमाची आवश्यकता व्यक्त केली गेली. यासाठी सगळे विश्व हे ‘इथर’ नावाच्या अदृश्य आणि वजनरहित पदार्थाने भरले असल्याचे शास्त्रज्ञांनी मानले. प्रकाशलहरींच्या मार्गक्रमणास मदत करणारे हे इथर, कोणत्याही वस्तूच्या प्रवासात अडथळा निर्माण करत नव्हते. मॅक्सवेलने निर्वात पोकळीत, प्रकाशाचा सेकंदाला सुमारे तीन लाख किलोमीटर हा जो वेग शोधून काढला, तो या इथरच्या संदर्भात असल्याचे मानले गेले.

१९ व्या शतकाच्या अखेरीस अमेरिकी वैज्ञानिक अल्बर्ट मायकेल्सन याने या इथरचा प्रयोगाद्वारे शोध घेण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्याने प्रकाशाचा वेग वेगवेगळ्या दिशेने मोजण्याचे ठरवले. हा वेग पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या प्रदक्षिणेच्या दिशेने मोजला, तर पृथ्वीच्या स्वत:च्या वेगामुळे तो किंचितसा कमी भरायला हवा. याउलट जर तो विरुद्ध दिशेने मोजला, तर तो किंचितसा अधिक भरायला हवा. मायकेल्सनने हे प्रयोग एडवर्ड मोर्ली याच्या सहकार्याने अमेरिकेतील केस वेस्टर्न रिझव्‍‌र्ह विद्यापीठात केले. या प्रयोगात प्रकाशाचा वेग मोजण्यासाठी इंटरफेरोमीटर नावाच्या साधनाचा वापर केला गेला. अत्यंत काळजीपूर्वक केल्या गेलेल्या या प्रयोगात, प्रकाशाचे मापन करण्यासाठी वापरायचे साधन सहजपणे फिरवता येण्यासाठी, ते पाऱ्यावर तरंगणाऱ्या एका प्रचंड दगडी फरशीवर ठेवले होते.

मायकेल्सन आणि मोर्ली यांनी १८८७ साली केलेल्या या प्रयोगांचे निष्कर्ष आश्चर्यकारक निघाले. कुठल्याही दिशेने प्रकाशाचा वेग मोजला तरी तो सारखाच भरला.

असे का व्हावे? तर, यावर वेगवेगळी स्पष्टीकरणे देण्याचा प्रयत्न झाला. पृथ्वीच्या गतीमुळे पदार्थातील अणूंचा आकार बदलत असून, त्यामुळे मोजमापांत फरक पडत असल्याचे मत फिट्झगेराल्ड आणि लोरेंट्झसारख्या संशोधकांनी व्यक्त केले. काही जणांच्या मते, इथर हे काही प्रमाणात पृथ्वीबरोबर खेचले जात असावे. प्रकाशाचा वेग मोजला गेला तो या पृथ्वीबरोबरच प्रवास करणाऱ्या इथरच्या संदर्भात आणि म्हणूनच तो कसाही मोजला तरी सारखाच भरला.

स्पष्टीकरणे वेगवेगळी होती; परंतु जे मुळात अस्तित्वातच नव्हते, त्या इथरचे समर्थन करण्याचे हे प्रयत्न होते. इथरचे कल्पित ‘अस्तित्व’ आता संपले होते.

– डॉ. राजीव चिटणीस

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org