आइन्स्टाइनचा व्यापक सापेक्षतावादाचा सिद्धांत हा गुरुत्वाकर्षणाचाच सिद्धांत आहे. या सिद्धांतानुसार सूर्याचे वस्तुमान हे सूर्याच्या जवळ दिसणाऱ्या ताऱ्यांकडून येणाऱ्या प्रकाशाचा मार्ग बदलू शकते. त्यामुळे या ताऱ्यांची स्थाने बदललेली दिसू शकतात. आइन्स्टाइनने १९१५ सालच्या नोव्हेंबर महिन्यात केलेल्या गणितानुसार सूर्याच्या अगदी जवळ असणाऱ्या ताऱ्यांच्या स्थानात १.७३ सेकंद इतका कोनात्मक फरक पडायला हवा होता. (एक सेकंद म्हणजे अंशाचा ३६००वा भाग.) न्यूटनचा सिद्धांत वापरला तर हा फरक ०.८७ सेकंद इतका असायला हवा. खग्रास सूर्यग्रहणात सूर्याच्या जवळचे तारे दिसू शकत असल्याने, याची चाचणी खग्रास सूर्यग्रहणादरम्यान घेता येईल, असे आइन्स्टाइनने स्वतच सुचवले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पहिल्या महायुद्धामुळे, त्या काळातील दोन खग्रास सूर्यग्रहणांत ही निरीक्षणे करणे शक्य झाले नाही. १९१९ सालच्या २९ मे रोजी झालेल्या सूर्यग्रहणाच्या वेळी मात्र इंग्लिश खगोलशास्त्रज्ञ आर्थर एिडग्टन याच्या पुढाकाराने, या खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळच्या निरीक्षणांसाठी दोन मोहिमा काढण्यात आल्या. त्यानुसार एक मोहीम आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील प्रिंसिपे या बेटावर, तर दुसरी ब्राझिलमधील सोब्राल येथे काढण्यात आली. यावेळी सूर्य रोहिणी या खुल्या तारकागुच्छाजवळ असल्याने अनेक तेजस्वी तारे तुलनेसाठी उपलब्ध होणार होते. या ग्रहणाचा कालावधीही दीर्घ असल्याने, अनेक छायाचित्रे घेण्याच्या दृष्टीनेही हे ग्रहण सोयीचे ठरणार होते.

एिडग्टन स्वत: प्रिंसिपे येथील मोहिमेत सहभागी झाला होता. प्रिंसिपे येथून या खग्रास स्थितीत एकूण सोळा छायाचित्रे काढली गेली. मात्र ढगांमुळे शेवटच्या फक्त दोन छायाचित्रांतले तारे स्पष्ट दिसत होते. याच वेळी सोब्राल येथून घेण्यात आलेली छायाचित्रे अपेक्षेइतकी स्पष्ट न आल्याने, त्यावरून निष्कर्ष काढणे शक्य झाले नाही. त्यानंतरच्या ऑगस्ट महिन्यात रात्रीच्या वेळी, पुन्हा आकाशाच्या त्याच भागाची छायाचित्रे घेण्यात आली व त्यांची सूर्यग्रहणात काढलेल्या छायाचित्रांशी तुलना केली गेली. प्रिंसिपे येथून घेण्यात आलेल्या छायाचित्रांत सूर्यिबबाच्या जवळ असलेले तारे १.६१ सेकंदाने सरकलेले आढळले. न्यूटनच्या नव्हे तर, आइन्स्टाइनच्या व्यापक सापेक्षतावादाला पूरक असेच हे निष्कर्ष होते. १९१९ सालच्या सप्टेंबर महिन्यात हे निष्कर्ष लंडन येथे जाहीर करण्यात आले.. आणि न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताला यशस्वी आव्हान देणारा आइन्स्टाइन पृथ्वीतलावरचा महामानव ठरला!

– डॉ. राजीव चिटणीस

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ office@mavipamumbai.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Albert einstein light travel sun transit rohini nakshatra zws
First published on: 28-06-2019 at 00:09 IST