अ‍ॅनी बेझंट या मूळच्या ब्रिटिश असूनही त्यांची ओळख आहे, ती एक भारतीय स्वातंत्र्यसनिक, भारतीय राजकारणाशी अखेपर्यंत एकनिष्ठ राहिलेल्या महिला, भारतीय समाजसुधारक आणि तत्त्वज्ञानी म्हणून. अ‍ॅनी बेझंटना भारतीय स्वातंत्र्यलढय़ाच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. हिंदू आणि बौद्ध तत्त्वज्ञानाचा त्यांनी पुरस्कार केला. ‘मी जन्माने ख्रिश्चन आणि मनाने हिंदू आहे’ असं त्या नेहमी म्हणत. अ‍ॅनी या माहेरच्या अ‍ॅनी वूड लग्नानंतर अ‍ॅनी फ्रँक बेझंट झाल्या.

एका मध्यमवर्गीय आयरिश कुटुंबात लंडनमध्ये १८४७ मध्ये जन्मलेल्या अ‍ॅनींचे वडील त्या अवघ्या पाच वर्षांच्या असताना निवर्तले. वडील वैद्यकीय पेशात होते परंतु तत्त्वज्ञान आणि गणित या विषयांचे गाढे अभ्यासक होते. आईवडील दोघेही धार्मिक परंपरा पालन करणारे आदर्शवादी होते. त्यामुळे अ‍ॅनीवरही धार्मिक विचारांचा प्रभाव होता. अ‍ॅनीच्या वडिलांच्या अकाली मृत्यूमुळे आíथक परिस्थिती हलाखीची होऊन तिची आई तिला घेऊन हॅरो येथील एका वसतिगृहामध्ये किरकोळ नोकरीला लागली. परंतु या नोकरीतल्या अत्यल्प वेतनामुळे अ‍ॅनीच्या शिक्षणासाठी पसे कमी पडू लागले, त्यामुळे अ‍ॅनीला तिच्या आईने लंडनमधल्या प्रतिष्ठित, समाजसेविका एलन मॅरियट यांच्याकडे ठेवले. वयाच्या १७व्या वर्षांपर्यंत मॅरियटबाईंकडे राहून अ‍ॅनींनी आपले शिक्षण पूर्ण केलं.

१८६७ साली वयाच्या विसाव्या वर्षी लंडनमधील तरुण पाद्री फ्रँक बेझंट यांच्याबरोबर अ‍ॅनींनी विवाह केला. या काळात त्यांचा परिचय मँचेस्टर येथील सुधारणावादी विचारांचे आणि आर्यलँडच्या स्वातंत्र्यवाद्यांना पाठिंबा देणारे फेनियान ब्रदरहूडशी झाला. अ‍ॅनी आणि फ्रँक बेझंट यांना दोन मुले झाली. या काळात अ‍ॅनी वृत्तपत्रांमधून लघुकथा, स्फूट लेखन करीत आणि मुलांसाठी बालकथांची पुस्तके लिहीत. या लेखनातून मिळालेले सर्व पसे फ्रँकनी घेऊन वैयक्तिक खर्चासाठी वापरले आणि इथूनच या बेझंट पतीपत्नींमध्ये संघर्षांची ठिणगी पडली. त्यात दोघांच्या राजकीय मतभिन्नतेमुळे दोघांमधलं अंतर वाढतच गेलं आणि अखेरीस १८७३ साली घटस्फोट घेऊन अ‍ॅनी आणि फ्रँक बेझंट हे दोघे विभक्त झाले.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com