‘ग्लोबल रिसायकलिंग डे’ १८ मार्च रोजी पाळण्याची प्रथा २०१८ पासून पुनर्चक्रीकरण (रिसायकलिंग) क्षेत्रातील ‘विश्व पुनर्चक्रीकरण संघटने’ने सुरू केली. https://www.globalrecyclingday.com/ या संकेतस्थळावर २०२०ची ग्लोबल रिसायकलिंगची संकल्पना ‘रिसायकलिंग हीरोज’ शोधण्याची आहे.
उगवणारा प्रत्येक दिवस हा पृथ्वीच्या एकूण तापमानात भर घालतो. गेल्या १० वर्षांत सर्व ठिकाणी आपण तापमानाचे सर्व उच्चांक मोडून टाकले आहेत. आपल्याकडे आता वेळ कमी आहे. हवामान आणीबाणी (क्लायमेट इमर्जन्सी)च्या अंतर्गत आता आपल्याला काही मोठे बदल जाणीवपूर्वक स्वीकारावे लागतील. अन्यथा जागतिक तापमान वाढ, वितळणारे हिमखंड, जळणारी विषुववृत्तीय जंगले आणि झपाटय़ाने अदृश्य होणारे जंगल याचे आपण मूक साक्षीदार होऊ. यामध्ये एक आशेचा किरण आहे, तो म्हणजे सर्वत्र कार्यरत असणारे पर्यावरण कार्यकर्ते. अशा सर्व छोटय़ा-मोठय़ा पर्यावरणामधील पुनर्चक्रीकरणाबद्दल जनजागृती करणाऱ्या व्यक्ती, समूह, संघटना, सरकारी अधिकारी, अगदी खासगी उद्योजकसुद्धा- यांची ‘रिसायकलिंग हीरोज’ म्हणून माहिती जगाला देण्याचे काम या संकेतस्थळावरून सामान्यजनही करू शकतात.
पुनर्चक्रीकरण (पुनश्चकरण) करणे, ही पर्यावरणीय सवयींपैकी सर्वाधिक उपयुक्त सवय. २०२० सालामध्ये विश्व पुनर्चक्रीकरण संघटनेने सर्व जगातील छोटय़ा मोठय़ा शहरातील किंवा गावातील अभिनव पुनश्चकरण पद्धतीबद्दल प्रसार आणि प्रचार करणाऱ्या आणि त्यामध्ये यशस्वी पद्धती उभ्या करणाऱ्या सर्वाना जगासमोर आणण्याचे ठरवले आहे.
ग्रेट थुनबर्ग आणि लिओनाडरे दि कॅप्रिओप्रमाणे आपापल्या परिसरात आढळणाऱ्या या सर्व पुनश्चकरण कार्यकर्त्यांचा या निमित्ताने सन्मान होऊ शकतो आणि त्यांना अधिक कामाची प्रेरणा मिळू शकते. अजूनही पुनश्चकरण करावे की करू नये अशा दुविधेत आपण असाल तर निर्णय घेऊन या दिनाच्या निमित्ताने आपण रिसायकलिंगचा पंथ स्वीकारावा.
– विद्याधर वालावलकर मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org