मुलांच्या डोक्याला चालना मिळेल, मुलं विचार करतील, आव्हानं पूर्ण करतील, असं त्यांना शालेय वयात काय मिळतं? घरून किंवा शाळेतून मार्क कमवण्याशिवाय खरीखुरी कोणती आव्हानं मिळतात? वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न सोडवावा लागला आहे, अशी कामगिरी त्यांच्यावर कोणी सोपवतं का? जे आहे ते करण्यासाठीच मुलांना वेळच नसतो. तर वेगळी आव्हानं अंगावर कधी घेणार? सध्या मार्काना इतकं महत्त्व आहे की ज्याला मार्क आहेत, तेवढंच मुलं करतात. त्यापेक्षा जास्त काही करणं अशक्य आहे, असं अनेकांचं मत असतं.
वास्तविक मार्क वेगळे आणि विविध मार्गानी डोकं चालवायला मिळणं हे वेगळं. यातून मुलांचा जो खराखुरा फायदा होणार आहे, त्याच्या डोक्याला चालना मिळणार आहे, तो फायदा त्यांना कसा मिळवून देता येईल? त्यामुळे मुलांसमोर त्यांच्या वयोगटाला योग्य अशी आव्हानं त्यांना द्यायला हवीत.
एखाद्या माहितीच्या, घटनेच्या कारणांचा शोध घेणं (रीझनिंग), तार्किक संबंध लावणं, विश्लेषण करणं, प्रक्रिया समजून घेणं, मूल्यमापन करणं. उदा. समोर दिलेल्या काही घटकांमधून (हे घटक वयानुसार काहीही असू शकतात. पदार्थ, खेळ, प्रयोग इ.) योग्य घटक निवड. घटक निवडता येणं, ते का निवडले ते सांगता येणं, अशा स्वरूपात ही आव्हानं असू शकतात.
यासाठी मुळात मुलांना स्वत:चे प्रश्न पडायला हवेत. त्यासाठी कुतूहल वाटायला हवं. सध्या मुलं पुस्तकात आणि परीक्षेत दिलेले प्रश्न सोडवतात. पण प्रश्न पडणं ही आवश्यक क्रिया मेंदूत होत नाही. कोणत्याही प्रकारच्या संशोधनासाठी प्रश्न पडणं (क्वेश्चनिंग अॅबिलिटी) ही अतिशय महत्त्वाची क्षमता आहे. एका प्रश्नाचं उत्तर मिळालं आणि कुतूहल संपलं, असं व्हायला नको. तर एका प्रश्नातून दुसरा प्रश्न, मिळालेल्या उत्तरातून किंवा मिळालेलं उत्तर अपूर्ण वाटल्यामुळे नवीन प्रश्न, त्याचा शोध- असा प्रवास सुरू व्हायला हवा.
हल्ली परीक्षेत ‘हायर ऑर्डर थिंकिंग स्किल्स’चे – ‘हॉट्स’चे प्रश्न असतात. काही मुलं हे प्रश्न सोडवण्यात यशस्वी होतात. मग असे प्रश्न खऱ्या स्वरूपात आधीपासून, त्यांच्या समोर शिक्षक/ पालकांनी ठेवायला हवेत. या प्रश्नांच्या उत्तरासाठी विविध मार्गाचा अवलंब करणं हे सुचायला हवं. यातून विचारप्रवृत्त करणं हे आवश्यक आहे. – डॉ. श्रुती पानसे
contact@shrutipanse.com