भविष्यातील संभाव्य घडामोडींबाबत तर्कसंगत विवेचन करण्याचे द्रष्टेपण असलेले, काळाच्याही पुढे जाऊन विचार करणारे, पृथ्वीवरील सर्व सजीवांप्रति कमालीची अनुकंपा बाळगणारे, आपल्या प्रतिभेने आणि विचारांनी जगातील अनेक थोर व्यक्तिमत्त्वांना प्रभावित करणारे महात्मा गांधी. त्यांची आज १५१ वी जयंती. गांधीजींनी मानवाला निसर्ग आणि पर्यावरण जपण्यासंबंधी जी शिकवण दिली, त्याचा आजच्या लेखांकात थोडक्यात आढावा घेऊ. एकोणिसावे शतक संपून जग विसाव्या शतकात प्रवेश करत होते. आजच्या काळातील पर्यावरण प्रदूषण, जागतिक तापमानवाढ या व अशा समस्यांचा मागमूसदेखील नव्हता आणि यामुळे आता प्रचलित असलेले व सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचलेले ‘पर्यावरण’ किंवा ‘पर्यावरण संरक्षण’ हे शब्ददेखील अस्तित्वात नव्हते. अशा काळात— म्हणजे १९०९ साली प्रकाशित झालेल्या ‘हिंद स्वराज’ या गांधीजींच्या पुस्तकात वाढते शहरीकरण आणि औद्योगिकीकरण यांमुळे मानवाकडून पृथ्वीवरील जीवसृष्टी आणि नैसर्गिक संसाधनांची जी अपरिमित हानी करण्यात येते आहे त्याविषयी मांडलेले विचार वाचून थक्क व्हायला होते.

१९७२ साली पर्यावरण विषय केंद्रस्थानी ठेवून झालेली स्टॉकहोमची पहिली जागतिक परिषद असो किंवा १९९२ साली झालेली पहिली ‘वसुंधरा शिखर परिषद’ असो; या परिषदांमध्ये जगातील राष्ट्रा-राष्ट्रांत झालेले करार, विविध प्रकारचे ठराव जर काळजीपूर्वक अभ्यासले तर लक्षात येते की, गांधीजींनी हे विचार साकल्याने ६०-७० वर्षांपूर्वीच मांडून ठेवले आहेत. ‘अजेण्डा—२१’ च्या अनेक मुद्दय़ांमध्ये गांधीजींचे विचार प्रतिबिंबित झालेले दिसतात. नैसर्गिक साधनसंपत्ती ही आपल्याला आपल्या पूर्वजांकडून दान करण्यात आलेली नसून आपल्या पुढील पिढय़ांकडून आपण घेतलेले हे कर्ज आहे, याची जाणीव ठेवूनच या साधनसंपत्तीचा सुयोग्य वापर करावा, हे गांधीजींचे तत्त्वज्ञान १९८७ साली प्रसिद्ध झालेल्या ब्रण्टलँड अहवालातील शाश्वत विकासाबद्दलच्या व्याख्येत प्रतिबिंबित झालेले दिसते.

port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
Loksatta kutuhal Endowment of Suryaji Pisala Artificial intelligence
कुतूहल: सूर्याजी पिसाळांचा बंदोबस्त
MGIMS Wardha Bharti 2024
Wardha Jobs : महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था अंतर्गत चार पदांसाठी नोकरीची संधी, जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख
Maharashtra Board Class 10th and 12th Result 2024 Date Time in Marathi
१०वी १२वीच्या निकालासंदर्भात मोठी बातमी! ‘या’ तारखेला निकाल लागण्याची शक्यता; कसा पाहाल? जाणून घ्या

मानव आणि इतर सर्व सजीव यांच्या संपन्नतेचे व सुदृढतेचे स्वत:चे असे आंतरिक मूल्य आहे. मानवाच्या केवळ मूलभूत, जीवनावश्यक गरजा भागतील एवढय़ा प्रमाणातच या नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपभोग घ्यावा. याव्यतिरिक्त या अतिशय समृद्ध असलेल्या सजीवसृष्टीचे ‘आंतरिक’ मूल्य कमी करण्याचा मानवाला काहीएक अधिकार नाही. ही ‘डीप इकॉलॉजी’ची संकल्पना विसाव्या शतकात नॉर्वेतील थोर विचारवंत अर्ने नेईस्स यांनी सर्वप्रथम जगासमोर मांडली आणि ती रूढ केली. नेईस्स यांनी महात्मा गांधींबद्दल आदर व्यक्त करताना, ‘‘‘डीप इकॉलॉजी’ या संकल्पनेमागे गांधीजींच्या विचारांची प्रेरणा आहे’’असे आवर्जून नमूद केले आहे. अशा या द्रष्टय़ा महात्म्याचे विचार आजही पर्यावरणाची प्रेरणा देणारे आहेत!

– डॉ. संजय जोशी

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org