– डॉ. यश वेलणकर

आरोग्याचे रहस्य हे भूतकाळात घोटाळत राहण्यात किंवा भविष्याविषयी काळजी करत राहण्यात नसून शहाणपणाने वर्तमान जगण्यात आहे. ध्यान वर्तमानात जगायची कला शिकवते, त्यामुळे अनावश्यक तणाव कमी होतो आणि या तणावामुळे येणारे अकाली वार्धक्य टाळता येते. वैद्यकशास्त्रातील नोबेल मानकरी डॉ. एलिझाबेथ ब्लॅकबर्न यांनी त्यांच्या एका रिसर्च पेपरची सुरुवात या शब्दांनी केली आहे. माणसाच्या प्रत्येक पेशीतील गुणसूत्रावर टेलोमरची टोपी असते याचा शोध त्यांनीच लावला. ही टोपी गुणसूत्रामधील ‘डीएनए’चे संरक्षण करते. नवीन पेशी निर्माण होते, गुणसूत्राचे विभाजन होते त्या वेळी या टोपीची लांबी प्रत्येक वेळी कमी होते. १९८०मध्ये एलिझाबेथ ब्लॅकबर्न यांनी असा शोध लावला की, टेलोमरेझ नावाचे रसायन या टोपीचे संरक्षण करते, त्याची निर्मितीदेखील करते. असे असले तरी पेशींचे विभाजन सतत होत राहिल्याने काही वर्षांनी संरक्षक टोपीची लांबी अगदीच कमी होते आणि त्या वेळी पेशींची नवनिर्मितीची क्षमता संपून जाते, म्हातारपण येते. म्हणजेच आपल्या शरीराच्या वार्धक्याचा वेग टेलोमरच्या लांबीवरून ठरवता येऊ शकतो. लांबी जास्त असेल तर शरीर तरुण असते, वार्धक्य येते तशी टेलोमेरची लांबी कमी होत जाते. या संशोधनाबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक मिळाले. त्यानंतर वार्धक्याची गती आणि मानसिक तणाव यांचा संबंध पाहणारा पायलट स्टडी डॉ. ब्लॅकबर्न यांनी डॉ. एलिसा एपेल यांच्यासोबत केला. मानसिक तणावाखाली असणाऱ्या समान वयाच्या ५८ स्त्रिया त्यांनी निवडल्या. त्याच वयाच्या आणि तशाच आर्थिक स्थितीतील, पण आपल्यावर तणाव नाही असे सांगणाऱ्या तेवढय़ाच स्त्रियांचा गट कंट्रोल ग्रुप म्हणून निश्चित केला. या सर्वाच्या रक्ताची तपासणी करून टेलोमेरची लांबी आणि टेलोमरेझ या रसायनाचे प्रमाण मोजले. तणावामुळे सर्वाधिक अस्वस्थ असलेल्या स्त्रीच्या टेलोमेरची लांबी आणि टेलोमरेझचे प्रमाण सर्वात कमी होते. त्या लांबीनुसार ती तिच्या वयापेक्षा दहा वर्षे अधिक वृद्ध झालेली होती. तणाव कमी असलेल्या स्त्रियांच्या टेलोमेरची लांबी सरासरीने जास्त होती. मानसिक तणावाचा परिणाम केवळ प्रकृतीवरच नाही तर शरीराच्या पेशींवर आणि वार्धक्याच्या गतीवर होतो हे यावरून स्पष्ट झाले. नंतर याच दोघींनी ध्यानाचा परिणाम टेलोमरवर काय होतो याचेही संशोधन केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

yashwel@gmail.com