सुनीत पोतनीस

११ नोव्हेंबर १९७५ रोजी अंगोला हा पश्चिम आफ्रिकेतला देश अस्तित्वात आला. त्या प्रदेशातल्या तीन स्वातंत्र्यवादी संघटनांच्या युतीकडे राजकीय सत्ता आली. परंतु हे तीन संघटनांचे अंगोलियन सरकार अल्पजीवी ठरले. या संघटनांनी आपापले सामथ्र्य वाढविण्यासाठी शस्त्रास्त्रे जमा करून जमेल तो प्रदेश ताब्यात घेण्यास सुरुवात केली. त्यांपैकी एका संघटनेला क्युबाने पाठिंबा दिला आणि दुसऱ्या दोघांना रशिया व अमेरिकेने पाठिंबा दिल्यानंतर या तीन राजकीय संघटनांमध्ये रक्तरंजित यादवी युद्ध सुरू झाले, ते २००२ पर्यंत चालले. अखेरीस या तीन संघटनांमध्ये समेट होऊन ‘पीपल्स मुव्हमेंट फॉर द लिबरेशन ऑफ अंगोला (एमपीएलए)’ या संघटनेच्या पक्षाने सरकार बनविले. अंगोलात स्वातंत्र्यानंतर झालेल्या २७ वर्षांच्या अंतर्गत यादवी युद्धात साधारणत: दीड लाख लोकांचा बळी गेला असावा.

सध्या अंगोलात अध्यक्षीय प्रजासत्ताक राज्यप्रणाली आहे. १९७५ नंतर अंगोलातले पहिले सरकार मार्क्‍सवादी-लेनिनवादी प्रणालीचे एकपक्षीय साम्यवादी सरकार होते. परंतु सत्तारूढ पक्षाने १९९२ मध्ये नवे संविधान कायम करून अंगोलात लोकशाहीवादी बहुपक्षीय प्रणालीचे अध्यक्षीय सरकार आणले. जोस एडय़ुआर्दो डॉस सॅण्टोस हे स्वतंत्र अंगोलाचे पहिले निर्वाचित राष्ट्राध्यक्ष. सँटोस यांची राष्ट्राध्यक्षपदाची ३८ वर्षांची प्रदीर्घ कारकीर्द संपून २०१८ साली ते पायउतार झाले. त्यांच्या कारकीर्दीची पहिली १३ वर्षे साम्यवादी सरकारमध्ये आणि बाकी २५ वर्षे प्रजासत्ताक अंगोला सरकारमध्ये गेली. २०१७ साली बहुमताने निर्वाचित झालेले जोऑव् लॉरेन्को हे अंगोलाचे सध्याचे अध्यक्ष होत.

बहुवांशिक आणि बहुसांस्कृतिक सार्वभौम अंगोलाची लोकसंख्या सुमारे तीन कोटी आणि त्यांपैकी ९५ टक्के लोक ख्रिस्ती धर्मीय आहेत. अंगोलावरील पोर्तुगीजांच्या अनेक शतकांच्या शासनामुळे तिथल्या मूळच्या पश्चिम आफ्रिकी जीवनशैलीवर पोर्तुगीज प्रभाव पडलेला आहे. अंगोलात पोर्तुगीज भाषाही सर्रास बोलली जाते. अंगोलाची अर्थव्यवस्था तिथल्या हिरे व पेट्रोलियम तेलाच्या निर्यातीवर अवलंबून आहे. संसाधनांनी समृद्ध असूनही अंगोलाची गणना अत्यंत गरीब देशांमध्ये होते याचे प्रमुख कारण म्हणजे- यादवी युद्धांमध्ये झालेला विध्वंस आणि भ्रष्टाचार! परंतु अलीकडे तेल उत्पादन वाढवून चीनला पेट्रोलियम तेलाचा सर्वात मोठा पुरवठादार बनल्यामुळे अंगोलाची अर्थव्यवस्था झपाटय़ाने सुधारते आहे.

sunitpotnis94@gmail.com