जलप्रदूषणामुळे जलीय जीवसृष्टीवर अनेक घातक परिणाम होतात. हे घातक परिणाम त्यांच्यापर्यंतच मर्यादित न राहता, अन्नसाखळीच्या माध्यमातून मानवापर्यंत पोहोचले आहेत. विविध प्रकारची जलप्रदूषके- उदा. जड धातू, कीडनाशके अन्नामार्फत जलचरांच्या शरीरात प्रवेश करतात. कालांतराने या प्रदूषकांचा जलचरांच्या शरीरात ‘जैवसंचय (बायोअ‍ॅक्युम्युलेशन)’ होतो. या जैवसंचयामुळे त्यांच्या मज्जासंस्था, प्रजनन संस्था व संप्रेरकांचे संतुलन बिघडते. याचा एकूणच परिणाम त्यांच्या जीवनचक्रावर होतो. अशा प्रदूषकांचा जैवसंचय झालेले शिंपले व मासे माणूस खातो व घातक प्रदूषके माणसाच्या शरीरात प्रवेश करतात. हे सतत चालू राहिल्याने माणसाच्या शरीरात या प्रदूषकांची मात्रा वाढत जाते. जसजसे अन्नसाखळीत आपण वरच्या पोषण पातळीवर जाऊ, तसतसे प्राण्यांच्या शरीरातील या प्रदूषकांची मात्राही वाढताना दिसते. यास ‘जैवविशालन (बायोमॅग्निफिकेशन)’ म्हणतात. यामुळे माणसाच्या मज्जासंस्था, प्रजनन क्षमता तसेच संप्रेरके यांचे कार्य विस्कळीत होते. त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती व हृदय, मूत्रपिंड अशा अवयवांवरही विपरीत परिणाम होतात.

Pile of Dead fish, Airoli creek
ऐरोली खाडीत मृत माशांचा खच….मच्छीमार हवालदिल; मासे का मरत आहेत ? 
Obesity kid
सिडेंटरी लाईफस्टाईल, आऊटिंग, टेस्ट बड्स, स्क्रीन टाईममुळे मुलांचा स्थुलपणा वाढतो? पण म्हणजे काय?
Loksatta explained Many birds are on the verge of extinction but why is this happening
कित्येक पक्षी नामशेषत्वाच्या मार्गावर… पण असे का घडत आहे?
Loksatta kutuhal Artificial Neural Networks Perceptrons Machine learning
कुतूहल: कृत्रिम चेतापेशींचे जाळे

आणखी एक अनियंत्रित जलप्रदूषक म्हणजे मायक्रोप्लास्टिक. समुद्रापर्यंत पोहोचलेल्या प्लास्टिकचे लाटांमुळे, दगडांवर आदळल्याने, सूर्यप्रकाशामुळे मायक्रोप्लास्टिकमध्ये रूपांतर होते. माणूस खात असलेल्या समुद्री जीवांच्या शरीरात मायक्रोप्लास्टिक आहे, असे अनेक शोधनिबंधांनी निदर्शनास आणून दिले आहे. मायक्रोप्लास्टिकमुळे विविध प्रकारच्या कर्करोगांचे प्रमाण वाढले आहे.

जगभरातील महासागरांमधल्या प्रवाहांमुळे, पृथ्वीच्या अक्षीय गतीमुळे सागरी पाण्यातील प्लास्टिक व मायक्रोप्लास्टिक प्रशांत महासागरात एका ठिकाणी संचयित झाले आहे. ती जागा ‘ग्रेट पॅसिफिक गार्बेज’ म्हणून ओळखली जाते. मायक्रोप्लास्टिक आकाराने पाच मिलिमीटरपेक्षा कमी असते. ते सागरी प्राण्यांच्या नकळत त्यांच्या शरीरात शिरते. याचा परिणाम कासव, डॉल्फिन व सागरी पक्ष्यांवर होत असतो.

तेलगळतीसुद्धा चिंताजनक बाब आहे. तेलाच्या थरामुळे पाण्यात हवेतील ऑक्सिजन विरघळू शकत नाही. पक्षी व मासे यांच्या पंख आणि परांवर तेलाचा थर चढतो आणि त्यांना उडणे वा पोहणे अवघड होते. पेट्रोलियम व खनिज तेलातील विषारी रेणूंमुळे प्राण्यांच्या आरोग्यास धोका पोहोचतो. वर उल्लेख केल्याप्रमाणे अन्नसाखळीतून त्याचे दुष्परिणाम माणसापर्यंतसुद्धा पोहोचतात.

‘जलप्रदूषणाचे स्रोत’ या लेखांकात (सोमवार, २१ डिसेंबर)- ‘अणुऊर्जानिर्मिती प्रकल्पांद्वारे मोठय़ा प्रमाणात वीजनिर्मिती केली जाते. या प्रक्रियेदरम्यान निर्माण होणाऱ्या सांडपाण्यात काही प्रमाणात किरणोत्सारी मूलद्रव्येदेखील असतात,’ असा उल्लेख करण्यात आला होता. तो चुकीचा असून अणुऊर्जा प्रकल्पांतून किरणोत्सारी मूलद्रव्ये जलाशयांत सोडली जात नाहीत.

– चिन्मय सोमणी

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org