प्रदेशनिष्ठता (एण्डेमिझम) म्हणजे एखाद्या प्रजातीचा एखाद्या विशिष्ट भौगोलिक भागातील अधिवास होय. एकशिंगी गेंडा बघायला आपण आसाममध्ये जातो तसेच सिंह बघायला गुजरातमध्ये. हिमबिबटय़ासाठी लेह-लडाख, तर क्रौंच पक्षी बघायला राजस्थान गाठतो. या प्रजाती तिथेच का आढळतात, असा प्रश्न आपल्याला पडला असेलच. आज जाणून घेऊ या त्याचे उत्तर..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताचा भूभाग एकूण १० जैवभौगोलिक अधिवासांमध्ये विभागलेला आहे. प्रत्येक भौगोलिक अधिवासाची विविध वैशिष्टय़े आढळून येतात. तेथील हवामान, पर्जन्यमान, तापमान, इतर जैवविविधता या सर्वावर एखाद्या प्रजातीचा अधिवास अवलंबून असतो. या प्रदेशनिष्ठतेचे मुख्यत्वे दोन प्रकारांत वर्गीकरण करता येईल :

(१) पॅलीओ-एण्डेमिझम (पॅलीओ म्हणजे अतिपुरातन) : एखादी प्रजाती अनेक वर्षांपूर्वी सर्वत्र आढळत होती; परंतु काही कारणांमुळे ती आज केवळ एका विशिष्ट भागात आढळते. याचा अर्थ बाकीच्या भागांतून ती प्रजाती नामशेष झाली. उदाहरणार्थ, चित्ता हा प्राणी सात-आठ दशकांपूर्वी भारतात आढळत असे; परंतु बेसुमार शिकार आणि त्याच्या अधिवासाचा विनाश या व अशा अनेक कारणांमुळे तो आज आपल्या देशातून नामशेष झाला आहे. आता केवळ आफ्रिका खंडातील गवताळ प्रदेशात तो आढळतो. त्याचप्रमाणे एशियाटिक सिंहाची प्रजाती केवळ गीरच्या जंगलातच आढळते. ‘पॅलिओ-एण्डेमिझम’ची उदाहरणे अटलांटिक महासागरातील कॅनरी, बम्र्युडा आणि इतर अनेक बेटांवरदेखील आढळतात.

(२) निओ-एण्डेमिझम (निओ- नवीन) : यामध्ये एखाद्या प्रदेशनिष्ठ प्रजातीपासून जी उपप्रजाती निर्माण होते तिचा समावेश होतो. सर चार्ल्स डार्विन यांनी जेव्हा निसर्ग वाचायला, अनुभवायला सुरुवात केली, तेव्हा ते इक्वेडोर या देशातील गॅलापेगॉज द्वीपसमूहावर वास्तव्यास होते. तिथे त्यांनी चिमणीसारख्या दिसणाऱ्या फिंच पक्ष्याच्या प्रजातीचा अभ्यास केला. फिंच पक्ष्याच्या एकूण १५ प्रजाती या बेटांवर वास्तव्य करून आहेत. या सर्व प्रजातींमध्ये एकंदरीत खूपच साम्य असले, तरी त्यांच्या चोचींचे आकार आणि रचना यांमध्ये विविधता आढळते. उत्क्रांतीच्या ओघात प्रत्येक प्रजातीला विविध प्रकारचे उपलब्ध अन्न भक्षण करणे सुलभ व्हावे म्हणून यांच्या चोची वेगवेगळ्या आकारांच्या झाल्या, असे डार्विन यांचे निरीक्षण आहे.

सुरभि वि. वालावलकर

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on biodiversity and territoriality abn
First published on: 12-05-2020 at 00:07 IST