‘बायोगॅस’ एक उत्तम पर्यायी एकात्म इंधन म्हणून आज जगभर ओळखले जाते. गॅसनिर्मितीसाठी ‘फिक्सडोम’ (स्थिर घुमट) व ‘फ्लोटिंगडोम’ (तरंगती गॅस टाकी) अशा दोन पद्धतींचे बायोगॅस प्लान्ट वापरले जातात. स्थानिक जमीन व हवामानाचा प्रकार विचारात घेऊन वरीलपैकी एक तंत्रज्ञान ठरवले जाते. ज्या भागात मुरूम व तांबूस मातीचा प्रकार आहे, त्या ठिकाणी स्थिर घुमट संयंत्र प्रकारचे बांधकाम आणि ज्या ठिकाणी काळी माती अगर पाण्यामुळे जमीन फुगणारी आहे अशा ठिकाणी फेरोसिमेंट, प्री-फॅब्रिकेटेड फेरोसिमेंट किंवा अलीकडच्या काळात एफआरपी (फायबर रिएन्फोर्स्ड प्लास्टिक)चे ‘रेडी टु इन्स्टॉल’ बायोगॅस प्लान्ट वापरले जातात.
स्थिर घुमट संयंत्र प्रकारचा बायोगॅस कमी खर्चात होणारा बायोगॅस आहे. मात्र या संयंत्राचे बांधकाम प्रशिक्षित व कसबी गवंडय़ाकडूनच करून घ्यावे लागते. तरंगत्या टाकीचा बायोगॅस तुलनात्मकदृष्टय़ा अधिक महाग आहे. बायोगॅस संयंत्राची रचना करताना त्यामध्ये हवाबंद, बंदिस्त पोकळी तयार करावी लागते. त्या पोकळीत सेंद्रिय पदार्थ टाकण्याची, तसेच सेंद्रिय पदार्थापासून तयार होणारा वायू व खत बाहेर येण्याची आणि साठविण्याची सोय करावी लागते.
बायोगॅस संयंत्रासाठी प्रामुख्याने जनावरांचे शेण, डुकरे-कोंबडय़ांची विष्ठा, जनावरांचे मूत्र, मानवी विष्ठा, स्वयंपाकघरातील टाकाऊ पदार्थ, वाया गेलेल्या भाजीपाल्यांचे बारीक तुकडे आदींचा वापर करता येतो. कुजणारे पदार्थ पाण्याबरोबर त्याच्या विशिष्ट प्रमाणात संयंत्रामध्ये घातले असता त्यांची नैसर्गिक कुजण्याची प्रक्रिया सुरू होते. सदरची प्रक्रिया हवेच्या अनुपस्थितीत निर्वातीय जिवाणूंमुळे होते. तयार होणारा वायू वरच्या घुमटामध्ये साठविण्यात येतो. बायोगॅस संयंत्रातील पदार्थ कुजल्यानंतर तयार होणारी ‘स्लरी’ वायूच्या दाबामुळे बाहेर पडते. स्लरी हे उच्च प्रतीचे सेंद्रिय खत आहे. हे खत द्रवरूप किंवा घनरूपात (वाळवून) वापरता येते. स्लरीरूपात खत शेतात वापरल्यास ते शेतामध्ये मुरून पिकास उपयुक्त ठरते.
घुमटामध्ये साठलेला बायोगॅस पाइपच्या माध्यमातून विशिष्ट प्रकारच्या स्टोव्हला पुरवला जातो. वायू व हवेच्या योग्य प्रमाणातील ज्वलनाच्या परिणामस्वरूप उत्तम निळी ज्योत उपलब्ध होते. निळ्या ज्योतीमुळे शून्य प्रदूषण होते. इतर इंधनांच्या तुलनेने बायोगॅस वापरण्यास अत्यंत सुरक्षित, कारण तो हवेपेक्षा सातपट हलका असल्यामुळे चुकून गळती झाली तरी वातावरणात उंच निघून जातो. त्याचप्रमाणे ज्वलनशील मिथेनबरोबरच निसर्गत: ज्वलनविरोधी कार्बन डायऑक्साइड त्यात उपस्थित असतो.
– श्रीकांत पटवर्धन
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org