‘अर्थ डे’ अर्थात ‘वसुंधरा दिवस’.. नावच किती सुबोध आहे! सजीव सृष्टी ज्या पृथ्वीवर अवतरली आहे तिचा हा दिवस! का बरे साजरा करायचा हा दिवस? निसर्ग-पर्यावरण आणि मानव यांच्यातले नाते अधोरेखित करण्यासाठी आपण दोन प्रकारचे उत्सव साजरे करतो. पहिल्या प्रकारात एखाद्या प्राणी, वनस्पती, पक्षी यांचे अस्तित्व अधोरेखित करणारे दिवस; तर दुसऱ्या प्रकारात विशिष्ट पर्यावरणीय समस्येबद्दल जनजागृती करण्याची आवश्यकता विशद करणारे दिवस. पण ‘वसुंधरा दिन’ हा आगळावेगळा आहे; कारण तो वरील दोन्ही प्रकारांत मोडणारा आहे. पृथ्वीविषयीची कृतज्ञता आणि तिच्या संवर्धनाविषयी जाणीवजागृती व्हावी म्हणून हा दिवस साजरा केला जातो.
याची सुरुवात १९७० साली अमेरिकेत झाली. पहिला वसुधंरा दिन तिथे तब्बल २० लाख लोकांनी साजरा केला. शहराशहरांत लोकांनी एकत्रितपणे पर्यावरणीय हानीकडे धोरणकर्त्यांचे लक्ष वेधले. या कृतीमुळे तिथे नागरी पर्यावरणवादी चळवळीला आकार आला. या रेटय़ामुळे लवकरच अमेरिकेत पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने काही आवश्यक कायदे करणे सरकारला भाग पडले. पर्यावरणरक्षण यंत्रणासुद्धा स्थापन करण्यात आली. पुढे १९९० च्या दशकापासून जवळपास जगभर हा दिवस दरवर्षी साजरा होत आहे. २०१६ साली जगातील १२० हून अधिक देशांनी एकत्र येत याच दिवशी हवामान बदलविषयक ‘पॅरिस कृती करार’ केला होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर या दिवसाचे संचालन ‘अर्थ डे नेटवर्क’ ही संघटना करते. यंदा या संघटनेने वसुंधरा दिन साजरा करण्यासाठी दिलेले संकल्पसूत्र आहे- ‘क्लायमेट अॅक्शन’!
हवामान बदलाचे परिणाम आपण गेल्या काही वर्षांपासून ठळकपणे पाहत आहोत. त्याची झळ प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या आता आपल्याला बसू लागली आहे, हेही आपण अनुभवत आहोत. यावर उपाय म्हणजे निसर्गाचे संरक्षण आणि संवर्धन! आजच्या ५० व्या वसुंधरा दिनानिमित्ताने त्या दृष्टीने आपण काय करू शकतो?
सध्या करोना संकटातील टाळेबंदीमुळे आजचा वसुंधरा दिन साजरा करताना सामूहिक कृतीला मर्यादा आहेत. पण त्यामुळे मिळालेला मोकळा वेळ म्हणजे वसुंधरेचा, निसर्गाचा विचार करण्याची संधी आहे. या काळात प्रदूषणात झालेली घट आणि त्याचे सुपरिणाम आपण अनुभवत असालच! ते अनुभवताना हवामान बदलाचे परिणामही समजून घेऊन त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करायला हवा. नैसर्गिक संसाधनांचा संयत वापर, सार्वजनिक वाहनांचा वापर, वृक्षलागवड अशी काही पावले येत्या काळात उचलता येतील. याचबरोबर प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर थांबवणे आणि रस्त्यावर थुंकणे, कचरा फेकणे अशा घातक कृतींना थारा न देणे या गोष्टीही आवश्यक आहेत. एकुणात, प्रत्येक दिवस हा वसुंधरा दिनच आहे ही भावना मनात कायम ठेवायला हवी!
रुपाली शाईवाले
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org