डॉ. रंजन गर्गे
शेळ्या-मेंढय़ांना स्क्रॅपी नावाचा एक रोग होतो. मज्जासंस्थेशी निगडित असणाऱ्या या रोगामुळे, शेळ्या-मेंढय़ांचे स्वत:वरचे नियंत्रण नाहीसे होते. संसर्गजन्य स्वरूपाचा हा रोग एखाद्या धिम्या गतीने परिणाम करणाऱ्या विषाणूमुळे होत असल्याची शक्यता १९३०च्या दशकात काही वैद्यकतज्ज्ञांकडून वर्तवली गेली. फॉर्मालिनसारखे द्रव्यही स्क्रॅपीला कारणीभूत ठरणाऱ्या घटकांना नष्ट करू शकत नव्हते. यानंतर काही वर्षांनी पापुआ न्यू गिनी येथील कुरू या जमातीतील लोकांनासुद्धा अशाच प्रकारचा एक मानसिक आजार होत असल्याची नोंद केली गेली.
आतापर्यंत संसर्ग हा मुख्यत: जिवाणू (बॅक्टेरिया) किंवा विषाणू (व्हायरस) यांद्वारे होत असल्याचे मानले गेले होते. यात जनुकीय गुणधर्माशी संबंधित आरएनए आणि डीएनएसारख्या रेणूंचे अस्तित्व असते. स्क्रॅपीला कारणीभूत ठरणाऱ्या घटकांवर अतिनील किरण, उच्च तापमान, उच्च दाब यांचा काय परिणाम होतो ते अभ्यासले गेले. या घटकांच्या क्रियाशीलतेवर तीव्र अतिनील किरणांचाही विशेष परिणाम होत नसल्याचे दिसून आले. ही निरीक्षणे, या घटकांत आरएनए किंवा डीएनएसारख्या रेणूंचा अभाव असल्याचे दाखवीत होती. हे घटक म्हणजे काही प्रकारची संसर्गजन्य प्रथिनेही असावीत, अशी शक्यता अमेरिकन वैद्यकतज्ज्ञ स्टॅनली प्रुसिनर याने व्यक्त केली. इतकेच नव्हे तर, १९८२ साली प्रुसिनर आणि त्याच्या चमूने संसर्गग्रस्त प्राण्यांच्या शरीरातून हे रसायन वेगळेही केले. प्रथिने नष्ट करण्यासाठी ज्या पद्धती वापरल्या जातात, त्या पद्धतींद्वारे ते नष्ट करता येत असल्याचे दिसून आले. अशा प्रकारची संसर्गजन्य प्रथिने कालांतराने ‘प्रिऑन’ या नावे ओळखली जाऊ लागली. या संशोधनासाठी स्टॅनली प्रुसिनर याला १९९७ सालचे नोबेल पारितोषिक दिले गेले.
प्रिऑनची गणना सजीवात केलेली नाही. हे एक चुकीच्या पद्धतीने तयार झालेले ‘घडय़ांच्या स्वरूपातला रेणू’ असणारे प्रथिन आहे. प्रिऑनला पेशीस्वरूप नाही, तसेच त्यात केंद्रकही नाही. या प्रथिनांत आरएनए आणि डीएनए हे जनुकीय माहिती साठवणारे रेणू नसले, तरी ही प्रथिने स्वत:ची प्रतिकृती मात्र तयार करू शकतात. हे प्रथिन जर एखाद्या सूक्ष्मजीवाच्या पेशीत स्थलांतरित झाले तर तो सूक्ष्मजीवदेखील तशाच चुकीच्या पद्धतीचे प्रथिन तयार करतो आणि रोगकारक बनतो. अल्झायमर, हटिंग्टन डिसीज अशा व्याधींशी प्रिऑनचा संबंध असल्याचे दिसून आले आहे.
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org