जगातील सर्वच सागरी परिसंस्था खूप मोठय़ा प्रमाणात प्रदूषित झाल्या आहेत. विविध प्रकारची रसायने, तेलवाहू जहाजांमधून गळती होऊन समुद्रात पसरलेले खनिज तेल, शहरी-नागरी वस्त्यांमधील सांडपाणी, कारखान्यांमधील औद्योगिक सांडपाणी, आण्विक ऊर्जानिर्मिती केंद्रांमधून प्रक्रियेदरम्यान निर्माण झालेले सांडपाणी, घातक कचऱ्याची वाहतूक, जहाजांच्या वाहतुकीमुळे समुद्रात पसरणाऱ्या ध्वनीलहरी आणि त्यामुळे सागरी जीवांसाठी अपायकारक ठरत असलेले ध्वनिप्रदूषण आणि या सगळ्यात अतिशय चिंतेची बाब म्हणजे सागरी जीवसृष्टीला आणि पर्यायाने थेट मानवी आरोग्याला धोकादायक ठरत असलेला प्लास्टिकचा कचरा.. हे सर्व अजैविक घटक सागरी प्रदूषणास कारणीभूत आहेत. याव्यतिरिक्त एका देशातून दुसऱ्या देशात माल वाहून नेणाऱ्या जहाजांच्या निरीम जलाच्या (बलास्ट वॉटर) माध्यमातून आपसूकच प्रवास करत आलेले विविध प्रजातींचे सजीव प्राणी हीदेखील समस्या आहे. जहाज इच्छित बंदरावर पोहोचल्यानंतर तिथे निरीम जल ओतले जाते, तेव्हा त्या स्थानिक परिसंस्थेसाठी सर्वस्वी ‘परकीय’ असलेले हे जीव आपोआपच त्या परिसंस्थेत प्रवेश करतात. तिथे ते आपला जम बसवतात आणि यामुळे अनेकदा ते स्थानिक प्रजातींच्या अस्तित्वाला धोकादायक ठरू शकतात. अशा विविध स्रोतांमधून होणारे सागरी प्रदूषण हे सागरी जीवसृष्टीला आणि पर्यायाने अर्थव्यवस्थेला व शेवटी मानवाच्या अस्तित्वालाच धोकादायक ठरते आहे. मग यावर उपाय काय?

समुद्रातील प्रदूषण कमी करून समुद्र ‘स्वच्छ’ करण्याचे तंत्रज्ञान विकसित करणे केवळ अशक्यप्राय आहे. कारण हे प्रदूषण प्रचंड प्रमाणात आहे आणि सर्वत्र पसरलेले आहे. म्हणूनच त्याऐवजी प्रदूषणकारी घटकांच्या निर्मितीच्या स्रोतांचे जागेवरच नियंत्रण करणे, हे जास्त सयुक्तिक व योग्य ठरेल. यासाठी संपूर्ण जगभर प्रत्येक देशाने अनेकविध कायदे केलेले आहेत. परंतु या नियमांची, करारांची बरेचदा संबंधित यंत्रणांकडून आर्थिक लाभांसाठी पायमल्ली होताना दिसते. ही प्रदूषके किंवा प्लास्टिकचा कचरा आपण व्यक्तिश: थेट समुद्रात टाकत नाही हे खरे असले; तरी अप्रत्यक्षपणे ही सर्व प्रदूषके अंतिमत: समुद्राच्या उदरात पोहोचवण्यास तुमच्या-माझ्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांचा फार मोठा वाटा आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. शेवटी अशा समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रभावी जनजागृती मोहिमा कार्यरत होऊन लोकशिक्षणातून जास्तीत जास्त लोकसहभाग मिळवणे ही काळाची गरज आहे.

Plastic pollution in the ocean
कुतूहल : सागरी प्रदूषण किती, कुठे?
Sustainable Development Goals
UPSC-MPSC : शाश्वत विकास म्हणजे काय? त्याची उद्दिष्टे आणि त्यासाठी उपाययोजना कोणत्या?
ocean benefits to humans
कुतूहल : सागराचे महत्त्व
water pollution problem is serious in millions tone garbage coming in to the sea uran navi mumbai
समुद्रात येणाऱ्या लाखो टन कचऱ्यामुळे निर्माण होतेय जलप्रदूषणाची गंभीर समस्या

– प्रा. विद्याधर वालावलकर

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org