scorecardresearch

मनोवेध : कर्करोगात ध्यान

रोगप्रतिकारशक्ती दुबळी होण्याचे एक कारण मानसिक तणाव, नैराश्य, एकटेपणा हे असू शकते.

(संग्रहित छायाचित्र)

– डॉ. यश वेलणकर

कर्करोगावरील उपचारांचा रुग्णास त्रास होऊ नये यासाठी ध्यानाचा उपयोग होऊ शकतो, असे कर्करोगतज्ज्ञ डॉक्टरांकडून आता अधिकृतरीत्या सांगितले जाऊ लागले आहे. कर्करोग टाळण्यासाठीही ध्यानाचा उपयोग होऊ शकतो. माणसाची रोगप्रतिकारशक्ती दुबळी झाली की कर्करोग होण्याची शक्यता वाढते. माणसाच्या शरीरात अब्जावधी पेशी असतात. त्यांचे आयुष्य ठरलेले असते. ठरावीक काळाने त्या मरतात, नवीन पेशी तयार होतात. आयुष्यभर हे चक्र चालू राहात असले तरी निरोगी शरीरातदेखील काही पेशी मरायचे नाकारतात. दररोज अशा चार ते पाच हजार पेशी तयार होतात. रोगप्रतिकारशक्ती सक्षम असेल तर ती या बंडखोर पेशींना वेळीच ओळखते आणि नष्ट करते. त्यामुळेच माणूस निरोगी राहतो. पण रोगप्रतिकारशक्ती दुबळी झाली किंवा बंडखोर पेशी मोठय़ा संख्येने निर्माण होऊ लागल्या, तर त्या पूर्णत: नष्ट होत नाहीत. त्यांची संख्या वेगाने वाढू लागते आणि शरीरात कर्करोगाची वाढ होऊ लागते.

रोगप्रतिकारशक्ती दुबळी होण्याचे एक कारण मानसिक तणाव, नैराश्य, एकटेपणा हे असू शकते. नैराश्यामुळे रोगप्रतिकारशक्ती दुबळी होते आणि त्यामुळे कर्करोगाच्या बंडखोर पेशी त्यांची संख्या वेगाने वाढवतात. मानसिक भावभावनांचा परिणाम शरीरातील मज्जासंस्थेवर आणि त्याचा परिणाम रोगप्रतिकारशक्तीवर कसा होतो, याचाच अभ्यास करण्यासाठी ‘सायकोन्युरोइम्युनोलॉजी’ नावाची शास्त्रशाखा निर्माण झाली आहे, त्यात हे संशोधन होते. कर्करोग झाल्यानंतर त्यावर रेडिएशन किंवा केमोथेरपी दिली जाते आणि या बंडखोर पेशींना नष्ट केले जाते; पण ‘सुक्याबरोबर ओलेही जळते’ तसे काही निरोगी पेशींनादेखील या उपचारांमुळे दुखापत होते. त्यामुळे त्या वेळी बरेच शारीरिक आणि मानसिक त्रास होऊ लागतात. हे त्रास कमी करण्यासाठी ध्यानाचा उपयोग होऊ शकतो, असे ‘अमेरिकन कॅन्सर सोसायटी’च्या अधिकृत संकेतस्थळावर नमूद केलेले आहे.

अमेरिकेतील ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थ (एनआयएच)’च्या अहवालानुसार कर्करोग रुग्णांच्या वेदना आणि निद्रानाश कमी करण्यासाठी ध्यान उपयोगी ठरते. एका अभ्यासानुसार, ‘कर्करोगासाठी ध्यान’ या विषयावर १९ शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. या सर्व शोधनिबंधांमध्ये- ध्यानामुळे कर्करोगग्रस्त रुग्णांचा तणाव आणि वेदनांचा त्रास कमी होतो, असे नोंदवले आहे.

yashwel@gmail.com

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Article on meditation on cancer abn