सांडपाण्यातील ‘ग्रे’ पाणी म्हणजे कमी कचरा असलेले पाणी. यामध्ये जवळपास एक ते तीन टक्के तरंगणारे व दृश्य स्वरूपात असणारे सूक्ष्म कण असतात. त्याचप्रमाणे साबण, साबण पावडर, डिर्टजट्स, मळ, चिखल, धूलिकण, तेल व ग्रीस असे विविध घटक असतात. यामुळे हे पाणी काहीसे अपारदर्शी दिसते. प्राथमिक अवस्थेत या पाण्याची आपल्याला घाण वाटत नाही. कारण ते सामान्य पाण्यासारखेच दिसते. परंतु हे पाणी जरा अधिक वेळ राहिले किंवा हवेशीर जागेतून बंदिस्त जागेत अथवा गटारात गेले, तर त्या पाण्याचा रंग बदलून ते करडय़ा रंगाचे आणि काही वेळाने काळ्या रंगाचे होते. यामधील कचऱ्याचे आणि तरंगत्या कणांचे प्रमाणदेखील लक्षणीयरीत्या वाढते आणि ते पाणी पुनर्वापर करण्यास अयोग्य होते. म्हणून सांडपाण्याच्या पुनर्वापरात शक्यतो ताज्या सांडपाण्यावर लगेचच प्रक्रिया सुरू करावी लागते. यामुळे दरुगधीही कमी किंवा नाहीशी होते आणि गाळदेखील साठत नाही.
आपण हे स्वच्छ केलेले पाणी कशाकरिता वापरणार, यावर ते किती प्रमाणात शुद्ध करायचे हे अवलंबून असेल. या सांडपाण्यावर प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय प्रक्रिया केल्यास ते पिण्यायोग्य शुद्ध होऊ शकते. परंतु शौचालयामध्ये फ्लश करण्यासाठी, गाडय़ा धुण्यासाठी, झाडांना घालण्यासाठी वापरायचे असेल, तर असे सांडपाणी फक्त वाळूच्या गाळणीतून स्वच्छ केले तरी चालू शकेल. अर्थात, झाडांना घालण्यासाठी पाण्यातील रसायने काही प्रमाणात कमी करण्यासाठी कार्बनच्या (अॅक्टिव्हेटेड चारकोल) गाळणीतून प्रवाहित केल्यास उत्तम. त्याहीपुढे हे पाणी जर घरात वापरायचे असेल, तर सांडपाण्यावर क्लोरिन किंवा ओझोनची प्रक्रिया करून आणि पुढे प्रेशर फिल्टरमधून प्रवाहित करून घ्यावे लागेल. हे सांडपाणी जर बोअर- वेलमधून आलेल्या पाण्याचा वापर केल्यानंतर निर्माण झाले असेल, तर त्यातील क्षार काढून टाकण्यासाठी त्यावर प्रक्रिया करणे आवश्यक ठरते. अशा प्रकारे सांडपाण्याचे शुद्धीकरण करून ते आपण पुन्हा वापरू शकतो. नजीकच्या भविष्यात कचऱ्यावरील प्रक्रियेप्रमाणे सांडपाण्यावरील प्रक्रिया करणेदेखील कायद्याने बंधनकारक होऊ शकते.
विद्याधर वालावलकर
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org