कृत्रिम वंगणतेले ही संश्लेषित स्वरूपाची रसायने असतात. विशेष म्हणजे, ती वंगण-गुण नसलेल्या रसायनांपासून तयार करतात. ती सहसा पेटत नाहीत की गोठत नाहीत, त्यामुळे ती फार मोठय़ा तापमानाच्या कक्षेत कार्यरत राहू शकतात. द्रावणीयता विष्यदंता(व्हिस्कोसिटी), अग्निरोधकता (फायर रिटरडसी), अपायकारकता (टॉक्सिसिटी) इत्यादी बाबतीत कृत्रिम वंगणतेले खनिज वंगणतेलांपेक्षा कांकणभर सरस असतात. सिंथेटिक हायड्रोकरबस, ऑरगॅनिक इस्टर्स, पोलिग्लायकॉल इथर्स, सिलिकाँस, सिलाँस, परफ्लुरोइथर्स, क्लोरोफ्लुरो करबस हे वंगणतेलांचे काही प्रकार.
ही कृत्रिम वंगणे स्वयंचलित वाहने, खाद्यपदार्थ, रेफ्रिजरेशन, विमाने, हायड्रोलिक यंत्रे, व्हॅक्यूम पंप, कृत्रिम तंतुनिर्मिती, गीयर यंत्रभाग, ब्रेक फ्लूइड इत्यादी विविध ठिकाणी वापरतात. कृत्रिम वंगणतेले इंधनात खनिज तेलाप्रमाणे सहज मिसळत नाहीत, हा त्यांचा एक ठळक फायदा होय. तसेच, त्यांच्या टिकाऊ गुणधर्मामुळे ते जास्त काळ वापरता येतात. खनिज तेलापासून घनरूपातील वंगणे (ग्रीजेस) तयार करताना, त्यात मिसळलेला साबण उच्च तापमानाला वेगळा होतो. मग ते घनरूप वंगण द्रवरूप धारण करते व यंत्रभागावरून निसटून जाते. इथे, कृत्रिम ग्रीज बाजी मारते.
वेळोवेळी येणाऱ्या तेल संकटाने देशाला खूप मोठे आíथक हादरे दिले आहेत, पण या संकटाने तोटय़ाबरोबरच काही मोजके फायदेसुद्धा देऊ केले आहेत. नावीन्याच्या आविष्कारातून नवे शोध लागत आहेत. कृत्रिम वंगणाची निर्मिती त्यातलाच एक आविष्कार. ‘टेफ्लॉन’ हा बुळबुळीत पदार्थ आतापर्यंत सर्वात उत्कृष्ट कृत्रिम वंगण म्हणून मानला जाई. त्याच्या चलत व स्थिर घर्षणाचा सहगुणक (कोईफिशंट ऑफ फ्रिक्शन) ०.०४ आहे. १९६५ साली न्यू जर्सीतील ‘जनरल मॅग्नाप्लेट’ कंपनीने ‘हाय-टी-ल्यूब’ हे खास वंगण ‘नासा’साठी बनवले होते. काही वर्षांपूर्वी तिथल्याच ‘फ्युरोनिक्स’ कंपनीने ०.०२९ सहगुणकाचे ‘टफ ऑइल’ कृत्रिम वंगण बनवून रेकॉर्ड केला आहे. वंगणाच्या घर्षणावर मात करणाऱ्या बुळ्बुळीतपणाचा निचमत सहगुणक ०.०३ असू शकतो, असे मानले होते. त्यावर झालेली ही मात होय.
ल्ल जोसेफ तुस्कानो, (वसई)
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org

प्रबोधन पर्व
चरित्रे घोटकित्त्याप्रमाणे विद्यार्थ्यांच्या उपयोगी असतात
‘‘जडपदार्थाचें पृथक्करण करून त्यांतील घटक द्रवें शोधून काढणें कठिण तर खरेंच; परंतु मनुष्याच्या अंत:करणांत उत्पन्न होणाऱ्या विचारांचें व विकारांचें पृथक्करण करणें त्याहून किती तरी कठिण आहे. जगांतील वैमनस्यें व कलह यांपैकीं शेंकडा नव्वदांचें मूळ परस्परांच्या मनोवृत्तीचें पृथक्करण करण्यांत घडलेल्या चुकांमध्ये सांपडेल. इतरांच्या मनोवृत्ति बरोबर जाणणें हें तर बहुतेक असाध्यच आहे; पण स्वत:च्या मनाची बरोबर परीक्षा करणें हें काम देखील फार अवघड आहे.’’ महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी १९१५ साली आपले आत्मचरित्र लिहिले. त्यात त्यांनी स्वत:कडे तटस्थपणे पाहणे कसे कठीण असते हे सुरुवातीलाच वरील शब्दांत नमूद केले आहे. पण त्याचबरोबर लोकोत्तर स्त्रीपुरुषांच्या चरित्र-आत्मचरित्रांचा भावी पिढय़ांना नेमका काय उपयोग होतो हेही कर्वे यांनी अधोरेखित केले आहे.
‘‘तीव्र बुद्धीच्या व लोकोत्तर तेजाच्या विभूति फार क्वचित् निर्माण होतात. अशा पुरुषांमध्ये निसर्गप्राप्त गुणांची संपत्ति दांडगी असून तिला उद्योगाची जोडहि तशीच मिळते.. अशा पुरुषांचीं चरित्रें जगांतील कर्तृत्ववान व होतकरू स्त्रीपुरुषांच्या हातांत पडलीं असतां तीं त्यांच्या अंत:करणवृत्ति उचंबळून टाकतील.. लोकोत्तर स्त्रीपुरुषांचीं व त्यांच्या खालोखाल विशेष सामर्थ्यांच्या मनुष्यांचीं चरित्रें हीं बंडोपंती अथवा बिवलकरी कित्त्यांप्रमाणें होत. अशीं चरित्रें वाङ्मयांत चिरस्थायी होऊन रहावयाचीं. हे जाड व टिकाऊ कागदावर घातलेले कित्ते आपल्यापुढें ठेवून विद्यार्थ्यांनीं त्यांजवर दृष्टि ठेवली पाहिजे; पण सामान्य विद्यार्थ्यांचें या कित्त्यांनीं भागत नाहीं. अक्षरं गिरवण्यासाठीं म्हणजे त्यांतून लेखणीचें सुकें अगर ओलें टोंक फिरविण्यासाठीं त्यांना घोंटकित्ते अगर वळणें लागत असतात. हीं वर्गाचा शिक्षक अथवा शाळेंतला एकादा चांगल्या अक्षराचा मुलगा पाठकोऱ्या अगर पातळ कागदावर घालून देत असतो. हीं वळणें चुरगळलीं, फाटलीं अगर त्यांवर शाई सांडली, तरी फारशी फिकीर नसते.. या चरित्रांची आयुमर्यादा अर्थात् घोंटकित्त्यांप्रमाणेंच असणार; पण तितक्या मुदतींत त्यांचा तेवढय़ापुरता उपयोग होईल.. ’’

मनमोराचा पिसारा-मिकॅशचे ‘साजिरे’ उपरेपण

लेखक आपल्या पहिल्या पुस्तकाची प्रस्तावना का लिहितो? आणि त्याच पुस्तकाच्या चोविसाव्या आवृत्तीकरता पुन्हा प्रस्तावना का लिहितो? असे गमतीदार प्रश्न ‘हाऊ टु बी अ ब्रिट?’ हे जॉर्ज मिकॅश यांचे पुस्तक हातात घेताना मनात निर्माण झाले. पहिल्या आवृत्तीच्या वेळी वाचकांच्या प्रतिक्रियेसंबंधी उत्सुकता वाटत्येय असं काहीसं मिकॅश म्हणतात आणि त्याचं उत्तर चोविसाव्या आवृत्तीमध्ये देतात यात गंमत आहे.
मुळात ‘जो कहना था सो कह दिया’ अशा तृप्त मनानं पुस्तक संपवणारा लेखक प्रस्तावना का लिहितो? आपल्या शब्दांच्या प्रेमात पडून की स्वत:च्या? मिकॅश आपल्या नव्या उभरत्या प्रकाशकाची गोष्ट सांगतात आणि थांबतात. पहिल्या प्रस्तावनेत आणि चोविसाव्या आवृत्तीत मिकॅश ज्या लोकांवर पहिलं पुस्तक लिहिलं ‘हाऊ टु बी अ‍ॅन एलिअन’ त्यांच्या विचार संस्कृतीबद्दल भाष्य करतात.
‘हाऊ टु बी अ ब्रिट’ ही त्यांची ऑम्नी बस (ही खास ब्रिटिश कौन्सिल लायब्ररीची संज्ञा) आहे. ‘हाऊ टु बी अ‍ॅन एलिअन’, ‘हाऊ नॉट टु बी अ‍ॅन एलियन’ आणि ‘हाऊ टु बी इनिमिटेबल’ या तीन पुस्तकांचा संग्रह म्हणजे ट्रिपल धमाका.
मिकॅश हे इंग्रजी वाङ्मयातलं आणखी एक लाडकं व्यक्तिमत्त्व ठरलं, कारण पहिल्याच पुस्तकात त्यानं इंग्लिश मंडळींची यथेच्छ मस्करी केली आहे.
मिकॅश नर्मविनोदी लिहितात. कधी कधी खदाखदा हसू येतं, पण पुस्तकभर गमतीच असतात. सूक्ष्म निरीक्षण आणि बोलता बोलता टोप्या उडवण्याची पद्धत खास त्यांचीच.
मिकॅशनं १९४० नंतरचा इंग्लंडचा युद्धोत्तर काळ पाहिला. वातावरण मळभटलेलं होतं. युद्ध जिंकूनसुद्धा उत्साहाचं वारं खेळत नव्हतं आणि त्यात मिकॅश हा हंगेरीचा ‘उपरा’ त्यांच्या देशात शिरून त्यांचीच मस्करी करतो!!
मिकॅश म्हणतात, परंतु इंग्लिश लोकांनी पुस्तकाचं उत्साहानं स्वागत केलं. त्यांची अपेक्षा होती की, १) आपल्या लेखनानं आमच्या भावना दुखावल्या आहेत असं म्हणावं!, २) जाहीर निषेधपत्रक- जाहीर धिक्काराचे फतवे, ३) पुस्तकावर बंदी घालण्यासाठी मोर्चे, ४) घराबाहेर धरणे, ५) निदान पुस्तकाची जाळपोळ, ६) इंग्रज धर्म बुडाल्याची हाकाटी.
पैकी अशी प्रतिक्रिया न देता वाचकांच्या उडय़ा पडल्या. इतर उपऱ्यांना इंग्लिश लोकांची संस्कृती कळावी म्हणून गठ्ठय़ानं पुस्तकं खरेदी केली. यावर मिकॅश म्हणतात, इंग्लिश लोकांची अंडर स्टेटमेंटकरिता ख्याती आहे, पण हे भलतंच!
एके ठिकाणी मिकॅश म्हणतात. उत्तम इंग्रजी बोलणाऱ्या व्यक्तीला पाहून स्वत: इंग्लिश लोक ‘x डी फॉरेनर!’ असं म्हणतात, कारण त्यांना स्वत:लाच इंग्रजीतले फक्त ८६० शब्द ठाऊक असतात.
मिकॅश या टिपिकल इंग्लिश सहिष्णू वृत्तीच्या प्रेमात पडतात. पुढे पुढे त्यानं इंग्लिश लोकांची युरोपातल्या इतर लोकांशी तुलना केल्यावर तर इंग्लिश लोक भरपूर खूश झाले. हे सगळं मिकॅश प्रस्तावनेत मांडतात आणि या राणीची परंपरा न मोडणाऱ्या लोकशाही देशाबद्दल वाचकांना विशेष कुतूहल वाटतं.
अर्थात, त्यासाठी मिकॅश मुळातून वाचला पाहिजे. त्याचा विनोद लिंबाच्या लोणच्यासारखा आहे. लोणचं मुरलं की अधिक खुलतं. मिकॅश मनात भिनला की त्याचं एकही पुस्तक सोडवत नाही. त्यासाठी आपली ‘टेस्ट’ चोखंदळ असावी लागते.
पण गुगलण्याकरिता मिकॅशचं स्पेलिंग टकङएर होतं हे विसरू नका..

डॉ. राजेंद्र बर्बे  drrajendrabarve@gmail.com