आर्यभट (पहिले) हे त्यांच्या ‘आर्यभटीय’ या गणिती ग्रंथासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनीच लिहिलेल्या माहितीवरून त्यांचा जन्म इ. स. ४७६ मध्ये झाला असणार असा तर्क करता येतो. ‘आर्यभटीय’वरून असाही अंदाज करता येतो की, कुसुमपूर ऊर्फ पाटलीपुत्र (सध्याचे पाटणा!) येथे त्यांचा जन्म झाला असावा आणि तिथेच त्यांनी अध्ययन आणि संशोधन करून मौलिक ज्ञान मिळवले असावे. आर्यभट नालंदा विद्यापीठाचे कुलपती असावेत असा काहींचा तर्क आहे. अवघ्या २३ व्या वर्षी त्यांनी लिहिलेला ‘आर्यभटीय’ हा ग्रंथ जगभरातील अनेक विद्वानांनी अभ्यासला आहे, वाखाणला आहे; तसेच त्याची अनेक भाषांतरेही झालेली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मध्ययुगीन भारतातील बहुतेक गणितींप्रमाणे आर्यभटही खगोलज्ञ होते. म्हणूनच नवल नाही की, ‘आर्यभटीय’ ग्रंथाच्या चार विभागांपैकी ‘गणितपाद’ हा विभाग पूर्णत: गणिताला वाहिलेला असून, बाकीचे तीन विभाग (दशगीतिका, कालक्रियापाद व गोलपाद) खगोलशास्त्राला वाहिलेले आहेत. या ग्रंथात एकूण १२१ पद्ये असून, त्यातील गणितपादामध्ये ३३ पद्ये आहेत. गणितपादामध्ये संख्यांचे वर्गमूळ व घनमूळ काढायच्या पद्धती, द्विमितीय आकारांच्या क्षेत्रफळांची सूत्रे, त्रिमितीय वस्तूंच्या घनफळांची सूत्रे, श्रेढी गणित, कुट्टक सोडवण्याची पद्धत, त्रराशिक, एकपदीय समीकरणे, ‘पाय’ची आसन्न किंमत (३.१४१६), मूलभूत त्रिकोणमिती आणि विविध कोनांच्या ‘ज्या’ फलाच्या किमती (कोणत्याही कोनाच्या ‘साईन’ गुणोत्तराला ३४३८ ने गुणल्यावर त्या कोनाची ‘ज्या’ किंमत मिळते.) अशा अनेक मूलभूत बाबी आहेत. विविध संख्यांसाठी विविध वर्ण योजून त्या-त्या वर्णापासून तयार होणारे (मात्र, एरवी निर्थक ठरणारे) शब्द त्यांनी संख्यालेखनासाठी वापरले. (उदा. ‘ख्युघृ’ असा शब्द ४३२०००० या संख्येसाठी). यामुळे मोठमोठय़ा संख्यांसाठी अल्पाक्षरी शब्द तयार करणे त्यांना शक्य झाले. मात्र, यातूनच ‘आर्यभटीय’ हा ग्रंथ काही प्रमाणात क्लिष्ट झाला.

कालगणना, ग्रहांच्या कक्षा, ग्रहांचे क्रांतिवृत्ताबरोबर होणारे कोन, ग्रहांचे व्यास, ग्रहांचे पृथ्वीपासूनचे अंतर, ग्रहांच्या गती, ग्रहांची प्रकाशमानता, ग्रहणविचार अशा अनेक खगोलीय घटनांचा मागोवा ‘आर्यभटीय’मध्ये घेतलेला आहे. यावरून असा तर्क निघतो की, ग्रहांची गोलाकारता तसेच सूर्य-चंद्रांच्या ग्रहणांमागील कार्यकारणभाव त्यांना माहीत होता. त्यांनी वापरलेली मापनाची एकके आज निश्चितपणे ज्ञात नसली तरीही त्यांनी पृथ्वी व चंद्र यांचे व्यास जवळपास अचूक शोधले होते असे अनेक अभ्यासान्ती पुढे आले आहे. पृथ्वी स्वत:च्या अक्षाभोवती परिवलन करते असे आर्यभटांनीच सर्वप्रथम मांडले होते. आर्यभटांचा मृत्यू इ. स. ५५० मध्ये झाला असा अंदाज आहे. इसवी सनानंतर भारतीय गणिताचा सुवर्णकाळ आर्यभटांपासून सुरू झाला असे मानले जाते.

– प्रा. सलिल सावरकर

मराठी विज्ञान परिषद,

संकेतस्थळ : www.mavipa.org    

ईमेल : office@mavipamumbai.org

 

 

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Astronomer mathematics aryabhatta golden age of indian mathematics zws
First published on: 05-05-2021 at 04:14 IST