सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com
मूळचे ऑस्ट्रियन असलेले हेमेनडॉर्फ हे मानववंशशास्त्रज्ञ तेलंगणातील आदिवासींसाठी एकेकाळी दैवत बनले होते, हे आज अविश्वसनीय वाटेल! त्यांनी आयुष्यातली ४० वर्षे तेलंगणा आणि नेपाळच्या आदिवासींचे समाज जीवन, त्यांचा मानववंशशास्त्रीय अभ्यास याच्यासाठी व्यतीत केली. नागरी संस्कृतीचा स्पर्शदेखील न झालेल्या तेलंगणातील दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासींशी हेमेनडार्फ यांचा ऋणानुबंध जुळला, त्यामागे धर्मप्रसार किंवा इतर कोणतेही प्रलोभन नव्हते.
ख्रिस्तॉफ व्हॉन फ्यूरर हेमेनडॉर्फ यांचा जन्म १९०९ सालचा, ऑस्ट्रियातील व्हिएन्ना येथला एका उच्च, खानदानी कुटुंबातला. वडील उमराव. शालेय जीवनात एकदा रवींद्रनाथ टागोरांचे पुस्तक ख्रिस्तॉफच्या वाचनात आले, तेव्हापासून रवींद्रनाथ व भारताबद्दल एक प्रकारचे गूढ आकर्षण त्यांच्या मनात तयार झाले. व्हिएन्ना विद्यापीठातून मानववंशशास्त्र आणि पुरातत्त्वशास्त्रात पदवी प्राप्त केल्यावर ख्रिस्तॉफ, लंडनच्या स्कूल ऑफ ओरिएंटल अॅण्ड आफ्रिकन स्टडीजमध्ये अध्यापक म्हणून नोकरीवर रुजू झाले. लंडनमधील ज्येष्ठ मानववंशशास्त्रज्ञ ब्रोनीस्लाव यांच्या मार्गदर्शनाखाली ख्रिस्तॉफनी आसाममधील आदिवासींच्या समाजजीवनावर प्रबंध लिहिला. ब्रोस्निस्लाव यांच्या सल्ल्यावरून १९३९ मध्ये ते ईशान्य भारतातील कोन्याक नागा जमातीच्या लोकांचा अभ्यास करण्यासाठी भारतात आले. पहिला प्रश्न होता भाषेचा. परंतु ख्रिस्तॉफ प्रयत्नपूर्वक, केवळ पाच महिन्यांत त्यांची भाषा आत्मसात करून त्यांच्यात वावरू लागले. १९४० साली ख्रिस्तॉफ लंडन येथे जाऊन बेटी बारनाडो ऊर्फ एलिझाबेथ हिच्याशी लग्न करून कलकत्त्यात आले. या काळात दुसऱ्या महायुद्धाचे पडघम वाजू लागले होते. ऑस्ट्रिया या युद्धात जर्मनीच्या गोटात होती. ख्रिस्तॉफ यांच्याकडे थर्ड राइशचा (जर्मन) पासपोर्ट असल्याने भारतातील ब्रिटिश सरकारने ख्रिस्ताफ आणि पत्नी एलिझाबेथला देशाबाहेर जाण्यावर बंदी घालून अटक केली आणि हैदराबादेत स्थानबद्ध केले. या स्थानबद्धतेत असतानाही त्यांच्यावर अनेक बंधने होती परंतु तिथला ब्रिटिश अधिकारी व निजाम या दोघांनाही ख्रिस्तॉफ दाम्पत्याचा हिटलर, नाझी पक्ष आणि राजकारणाशी काहीही संबंध नाही हे पटले आणि त्यांनी त्यांच्यावरची बंधने बरीच शिथिल केली.