औद्योगिक क्रांतीनंतर भरभराटीला आलेल्या कारखान्यांच्या धुराडय़ातून निघणाऱ्या काळ्या धुराने पर्यावरणावर आपली जणू मोहोर उमटवली आणि त्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम त्यानंतर काही काळाने प्रकाशात आले. कारखान्यातील जळणाऱ्या कोळशामुळे त्या काळात अकाली होणाऱ्या मृत्यूंचा आकडा देखील फार मोठा होता. या सगळ्याचा आणखी एक परिणाम म्हणजे १८५० साली माणसाने प्रथम अनुभवलेला आम्लयुक्त पाऊस. एकोणिसाव्या तसेच विसाव्या शतकात अनेक कारणांसाठी जगात प्रचंड जंगलतोड झाली. त्या दरम्यान ६६ टक्के इतक्या जंगलांचा नाश झाला. उद्योग वाढले त्यामुळे शहरे वाढली, लोकसंख्या वाढली, वाहने वाढली. या सगळ्याच्या परिणामी पृथ्वीचे तापमान वाढू लागले, जल- वायुमान बदलले आणि हवामान बदलाचा वेग वाढू लागला. जे हवेचे तेच पाण्याचे. अनेक विकासात्मक प्रकल्प, कारखाने सागरी किनाऱ्यावर, नदी किनाऱ्यावर उभे राहिले. या कारखान्यांचे दूषित सांडपाणी तसेच गावांमधील, शहरांमधील नागरी वस्त्यांमधून निर्माण होणारं सांडपाणी (सिवेज) इ. विहिरीत, नदीनाल्यात, तलावात, सागरात, सोडण्यात येऊ लागले. या दूषित पाण्यातून अनेक घातक, विषारी प्रदूषके   या सर्व जलसाठय़ांमध्ये मिसळत गेले आणि अशा रीतीने  जमिनीच्या पृष्ठभागावरील आणि भूमिगत जलसाठे प्रदूषित झाले. रासायनिक कीटकनाशके, कवकनाशके, जंतूनाशके यांचा वापर वाढला. काही विशिष्ट उद्योगांमुळे हवेत अतिसूक्ष्म विषारीकण आणि धूलिकण वाढले. एकोणिसाव्या शतकात प्रचंड प्रगती झाली परंतु जोन्सटाऊनचा १८८९ मधील महापूर, १८७१ मधील शिकागोतील आग, खोल समुद्रातील खाणकामामुळे पॅसिफिक महासागरातील ज्वालामुखीचा उद्रेक (१८८३), विसाव्या शतकातील १९४८ मधील पेनसिल्वानिया मधील हवेचे प्रदूषण, १९५२ मधील, हजारो नागरिकांचा बळी घेणारे ‘लंडन स्मॉग’, हिरोशिमा- नागासाकीवर टाकलेल्या अणुबॉम्बच्या स्फोटांत हवेत सर्वदूर पसरलेली अत्यंत घातक किरणोत्सारी मूलद्रव्ये, १९८६ मधील चेर्नोबिल अणुभट्टी विस्फोट, यासारख्या आपत्ति सुद्धा आल्या; ज्यांच्या मुळाशी शेवटी मानवी हस्तक्षेप होता. परंतु हे जरी खरे असले तरी प्रदूषण आणि त्याचे निसर्गावर होणारे परिणाम या विषयीची सजगता हळूहळू वाढू लागली. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस औद्योगिक क्षेत्रात राहणारे लोक आवाजामुळे, दुर्गंधीमुळे, धुक्यामुळे, धुरामुळे होणाऱ्या प्रदूषणाविषयीच्या तक्रारी घेऊन न्यायालयांत जाऊ लागले. पर्यावरणाविषयीची जागरुकता येत असताना सुरुवातीला निसर्गाची होणारी अवनती केवळ काही ठराविक ठिकाणांसाठी आणि जागांसाठी लक्षात घेण्यात आली. त्याचा राष्ट्रीय अथवा जागतिक पातळीवर होणारा परिणाम गंभीरपणे घेतला गेला नाही. निसर्गात संसाधने अमर्यादित आहेत आणि निसर्गाकडे पुनर्निर्माणाची अमर्याद क्षमता आहे या चुकीच्या गृहीतकावर माणूस ठाम होता असे दिसते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

– डॉ. नीलिमा कुलकर्णी

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Awareness of man made pollution zws
First published on: 01-12-2020 at 00:22 IST