मातीमध्ये असणाऱ्या जिवाणूंचे शास्त्रीय नाव आहे ‘बॅसिलस थुरिंजिएन्सिस’ (बीटी). बॅसिलस प्रजातीच्या या जिवाणूंना प्रथम जर्मनीतील थुरिंजिया येथे वेगळे केले. म्हणून, त्यांना ‘थुरिंजिएन्सिस’ नाव दिले. हे जिवाणू प्रथिने तयार करतात. ही प्रथिने कापसाच्या बोंडअळ्या, तंबाखूच्या कळीवरील अळी, बीट सुरवंट, कोबीवरील उंट अळी, कापसाच्या पानांना भोके पाडणारी अळी, सोयाबिनवरील उंट अळी, दक्षिणी सुरवंट, मक्याच्या कणसांना भोके पाडणारी अळी या अळ्यांच्या आतडय़ात गेल्यावर त्यांच्या आतडय़ाला भोक पडते. मग त्या अळ्यांना काहीही खाता येत नाही व त्या मरतात.
बीटी जिवाणू वेगवेगळ्या दोनशे प्रकारच्या विकरांची बीटी प्रथिने निर्माण करतात. बीटी जिवाणूंपासून तयार केलेली कीटकनाशके उत्तम जैव-कीटकनाशके समजली जातात. त्यांचा पर्यावरणाला काहीही धोका नसतो. बीटी प्रथिने फवारलेल्या पानांवरील अळीने त्या पानांचा काही भाग खाल्ला की त्यावरील बीटी प्रथिन आपले काम सुरू करते. माती आंबवून बीटी कीटकनाशक सहज तयार करता येते. गेली बरीच वष्रे जगभर ते वापरातही आहे; परंतु फवारणी करून कीड नियंत्रण करणे याला बऱ्याच मर्यादा आहेत. ही बीटी प्रथिने पानांवर असेपर्यंतच परिणामकारक ठरतात. पावसाने धुतली गेल्यावर त्यांचा उपयोग होत नाही.
बियाणांच्या जानुकातच (जनुक संचात) बीटी प्रथिने निर्माण करणारी जनुके घातली, तर मात्र यावर मात करता येते. अशा जनुकी अभियांत्रिकीद्वारे बऱ्याच पिकांचे ‘बीटी वाण’ तयार करण्यात आले आहेत. बियाणांच्या जानुकातच बीटी प्रथिनोत्पादक जनुक घातल्यामुळे ते झाडच बीटी प्रथिने निर्माण करते. ही प्रथिने पाऊस पडल्याने धुतली जाऊन तसेच सूर्यप्रकाशामुळे नष्ट होत नाहीत. त्यामुळे पीक असेपर्यंत पिकांचे संरक्षण होते. जमिनीतील इतर जिवाणूंवर त्यांचा काहीही परिणाम होत नाही. ते मातीतून पाण्यात मिसळून पाणी खराब होत नाही. बीटी वाणातील मक्यासारखी पिके गुरांनी खाल्ली तरी त्यांच्यावर वाईट परिणाम होत नाही. मित्र कीटकांवरही बीटी प्रथिनांचा दुष्परिणाम होत नाही.
बीटी वाण म्हणजे बायो टेक्नॉलॉजिकल वाण असे समजतात, ते चुकीचे आहे. बीटी व्हरायटीज म्हणजे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जे देखे रवी.. -झट की पट
एकोणीसशे पन्नास ते पासष्टच्या दरम्यान भारतात प्लास्टिक सर्जरी हळूहळू प्रवेश करत होती.. खरे तर हा पुन:प्रवेश होता, कारण मुळात जगातला आद्य प्लास्टिक सर्जन, सुश्रुत भारतातला. आंदमासे २००० वर्षांपूर्वी त्याने संस्कृत, काव्यात केलेले प्लास्टिक सर्जरीचे विवेचन वैद्यकीय विश्वाचे भूषण आहे असे सर्वानीच मान्य केले आहे.
विद्रूपता कमी करणे कार्यक्षमता वाढवणे आणि जखमा बऱ्या करणे असे या विज्ञानाचे उद्देश आहेत. हे साध्य करण्यासाठी विकृतीचे स्वरूप आणि ती बरी करण्यासाठी करावयाची डागडुजी किंवा नवी उभारणी याचा ऊहापोह होत असे, त्यावर चर्चा होत. त्याला कल्पनाशक्ती लागत असे. शस्त्रक्रियेआधीच्या या बद्दलच्या चर्चा ऐकणे किंवा करणे एक रम्य आणि प्रगल्भ अनुभव असे. पुढे अनेक दिवस टप्प्याटप्प्याने शस्त्रक्रिया करणे अपरिहार्य होते. त्याकाळात तो रुग्ण आणि डॉक्टर यांच्यात मैत्री होणे स्वाभाविक होते. हे अनुबंध अनेक दिवस टिकत असत. रुग्ण बरा झाला की त्याच्या आणि आमच्या डोळ्यांच्या कडा ओलावत असत.
त्या काळात प्लास्टिक सर्जरीला बाजारात भाव कमी होता पण व्यावसायिकांमध्ये मान होता. मग तंत्रज्ञानाने एकदमच एक उलथापालथ केली. त्वचा, कूर्चा, हाड, स्नायू यांचे स्थलांतर एका झटक्यात करण्यासाठी एक सूक्ष्मदर्शक यंत्र अवतरले. कोठल्याही भागाच्या रक्तवाहिन्या दुसरीकडे जोडण्याची सोय झाली. बहुतेक वाहिन्या एकदोन मिलीमीटर असत. त्या या यंत्राखाली मोठय़ा नळासारख्या दिसत. त्यांना जोडण्यासाठी केसाहून बारीक टाके तयार केले गेले आणि एकापाठोपाठ एक हळूहळू चवीने सुग्रास पदार्थ खात भोजनाची पद्धत बंद पडली आणि हल्लीची एकाच बशीत सगळे पदार्थ वाढून घेऊन उभ्याउभ्या जेवणाची झट की पट पद्धत अवतरली. रुग्णांचा नक्कीच फायदा झाला पण पूर्वीचा अनुबंध नाही म्हटले तरी निखळला. एखाद्या खाटकाचे दुकान असावे त्याने मांसांचे निरनिराळे तुकडे टांगलेले असावेत, त्यातला गिऱ्हाइकाने एखादा निवडावा खाटकाला पैसे द्यावेत आणि चालू पडावे असे झाले. हा व्यवहार झाला आणि तो यंत्रामुळे अवतरला. इंग्रजीत ALIENATION  असा एक शब्द आहे त्याचा ढोबळ अर्थ तुटातूट होणे, विटणे, विमुखणे स्नेहभेद असा आहे. हा शब्द कार्ल मार्क्‍सने कामगारांच्या स्थितीबद्दल वापरला होता. त्यांच्या यांत्रिक जगण्याला ते विटतात कारण एका बाजूला भांडवलदार आणि दुसऱ्या बाजूला हे यंत्र यात ते भरडले जातात असे त्याचे म्हणणे होते. त्यावेळेचे यंत्र आता हल्लीचे तंत्र एवढाच फरक पडला आहे. स्नेहभेद आणि विटण्याची प्रक्रिया वाढील लागली आहे पण ते परवडले. भोगी माणसांची मानसिक भूक भागविण्यासाठी प्लास्टिक सर्जरीच्या मूळ कल्पनेला भगदाडे पडत आहेत, त्याबद्दल लवकरच.
– रविन मायदेव थत्ते  rlthatte@gmail.com

वॉर अँड पीस – ताप- भाग ५
७) मधुमेह, जीर्ण व्रण, चिडत जाणारी जखम यामुळे ताप-जखम कुजणे, शय्याव्रण, महारोग विकारात श्रमाने वा अन्य कारणाने पुन: पुन: जखमा चिघळणे व वाढणे इ. कारणांमुळे जखमा भरून न येता त्या वाढत जातात, चिरत जातात. छाती, कान, नाकाची टोके, हातापायांची बोटे यांना बधिरता येते. चेहरा विद्रुप होतो. शरीरात मुंग्या वारंवार येतात. ताप पिच्छा सोडत नाही. अशा तापाकरिता दीर्घकाळची उपाययोजनाघ्यावयास हवी. लघुमालिनी वसंत ६ गोळ्या, लाक्षादि, त्रिफळा गुग्गुळ, चंद्रप्रभा,आरोग्यवर्धिनी प्रत्येकी तीन गोळ्या दोन वेळा; लाक्षादी घृत किंवा महातिक्त घृतासह घ्याव्या. मधुमेह असल्यास मधुमेह वटी, गोक्षुरादि गुग्गुळ, आरोग्यवर्धिनी, चंद्रप्रभा या गोळ्यांबरोबर रसायन चूर्ण एक चमचा दोन वेळा घ्यावे. जखम भरून यावी म्हणून नियमितपणे त्रिफळाचूर्णाच्या काढय़ाने जखम स्वच्छ धुवावी. कापसाने कोरडी करावी. एलादी तेल लावावे. रात्री शतधौतघृत लावावे. झुरळे, मुंग्या, माशा, डास यांच्यापासून संरक्षणाकरिता शक्यतो मच्छरदाणीत राहावे. मांसाहार, शिळे, आंबवलेले अन्न, बाहेरचे खाद्यपदार्थ, शंकास्पद जेवण कटाक्षाने टाळावे. व्यसन करू नये. जखमेत पू जास्त असल्यास जखम धुतल्यावर मधाचा वापर करावा. उन्हाळ्यात जखम दोनदा स्वच्छ धुवून; योग्य तो व्रणोपचार करावा.
८) सूतिकाज्वर – विषम प्रसूति, सूतिकाकाळात संसर्ग, बाळंतपणानंतर तीन महिने वेडेवाकडे वागणे, कुपथ्य करणे इ. कारणांमुळे; वारंवार बारीक ताप, थकवा, भूक मंदावणे, अरुची, अस्वस्थता अशी लक्षणे असतात. सूतिका ज्वरात योग्य उपचार न झाल्यास नवजात अर्भकाला आईचे दूध देणे काही वेळा बंद करावे लागते. लघुमालिनी वसंत सहा गोळ्या, कामदुधा व प्रतापलंकेश्वर प्र. ३ गोळ्या दोन वेळा द्याव्या. तापाची तीव्र औषधे देऊ नये. थंडी वाजल्यास तुळशीच्या पानांच्या रसाबरोबर थोडी मिरपूड द्यावी.
वाचकांनो मला जेव्हा ताप आला तेव्हा लंघन व फक्त गरम पाण्याचा सहारा घेतला. इति अलम.
वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत – ९ मार्च
१६५० > संत तुकाराम महाराज यांचे निर्वाण.    जगाला मराठीची थोरवी पटविण्याची योग्यता संत तुकाराम महाराजांकडे होती.
१८९९ > ‘राजकवी यशवंत’ म्हणजेच यशवंत दिनकर पेंढरकर यांचा जन्म. ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’  ही त्यांची अजरामर कविता. १९२१ च्या बडोदे येथील साहित्य संमेलनात ‘स्वातंत्र्यलक्ष्मीस मुजरा’ हे काव्य २२ वर्षांच्या या कवीने गायले आणि  संमेलन गाजवून ते बडोद्याचे राजकवी ठरले. छत्रपती शिवाजी महाराजांवर महाकाव्य, पाच काव्यसंग्रह व चार खंडकाव्ये त्यांनी लिहिली.
१९३० > संतसाहित्यावर १० संशोधन-पुस्तके लिहिणारे अभ्यासक यु. म. (युसुफ महमद) पठाण यांचा जन्म. पुणे येथील अ. भा. म. साहित्य संमेलनाचे (१९९०) अध्यक्षपद, पद्मश्री (२००७) असे सन्मान त्यांना मिळाले.
१९३१ > समीक्षक, कादंबरीकार, ललित निबंधकार सदाशिव बाळकृष्ण कऱ्हाडे ऊर्फ सदा कऱ्हाडे यांचा जन्म. ‘एका स्पृश्याची डायरी’ ही त्यांची आत्मपर कादंबरी गाजली.  समीक्षक म्हणून अण्णाभाऊ साठे यांचे साहित्यविश्व, शोकनाटय़ाचे साहित्यरूप, दलित साहित्य यांचा अभ्यास त्यांनी पुस्तकरूपाने मांडला. २६ फेब्रुवारी २०१२ रोजी त्यांचे निधन झाले.
– संजय वझरेकर

More Stories onनवनीतNavneet
मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bacillus thuringiensis mean what
First published on: 09-03-2013 at 05:06 IST