scorecardresearch

कुतूहल : निसर्गातील स्वच्छता प्रणाली

बायोमिमिक्री म्हणजे जैविक घटक आणि त्यांच्या प्रक्रियांमधून तयार झालेली सामग्री, संरचना आणि प्रणालीचा आराखडा आणि उत्पादन.

कुतूहल : निसर्गातील स्वच्छता प्रणाली

सहा ऋतूंचे सोहळे अनुभवताना, त्यांच्या सहवासात राहून अन्न प्राप्त करताना अथवा स्वसंरक्षणासाठी काही प्राण्यांना, कीटकांना त्यांचा रंग बदलून निसर्गाच्या रंगसंगतीशी जुळवून घ्यावे लागते. लहान प्राणी, कीटक निसर्गाची नक्कल करू शकतात. मग विज्ञानाच्या साहाय्याने मानवाने स्वत:च्या कल्याणासाठी तसे का करू नये? यातूनच ‘बायोमिमिक्री’ या शास्त्राचा उदय झाला. बायोमिमिक्री म्हणजे जैविक घटक आणि त्यांच्या प्रक्रियांमधून तयार झालेली सामग्री, संरचना आणि प्रणालीचा आराखडा आणि उत्पादन. बायोमिमिक्री हे निसर्ग आणि विज्ञानाच्या एकत्र येण्याचे सुंदर देखणे रूप आहे. निसर्गाचे प्रतिरूप असणाऱ्या या शास्त्रात जैवप्रेरित रचना निसर्गाकडून शिकता येते आणि निसर्गात असलेल्या प्रणालीपेक्षाही ही यंत्रणा अधिक सोपी आणि तेवढीच कार्यक्षम करता येते. सभोवतालचा निसर्ग हा मानवाचा खरा गुरू आहे. तो सतत त्याला काही तरी शिकवत असतो आणि या विनामोबदला शिकवणीमधून मानव हा विविध तंत्रज्ञानांनी समृद्ध झाला आहे.

‘कमळ’ या पाणथळ भूमीवर, म्हणजे चिखलात वाढणाऱ्या पाणवनस्पतीचेच उदाहरण घ्या. चिखलात राहूनही पाण्याच्या पृष्ठभागावर असणारी कमळाची पाने आरशासारखी स्वच्छ कशी असतात याचे कुतूहल शास्त्रज्ञांना होते. डॉ. बार्थलॉट या जर्मन जीवशास्त्रज्ञाने याचा सविस्तर अभ्यास केला तेव्हा त्यांना आढळले की या पानाच्या पृष्ठभागावर हवा भरलेले हजारो उंचवटे सुप्त अवस्थेत असतात. मात्र जेव्हा पावसाचे थेंब पानावर आदळतात तेव्हा या थेंबाच्या हलक्या दाबामुळे पृष्ठभागावर त्याच्या आतील हवेचे अगणित सूक्ष्म उंचवटे तयार होतात, त्यामुळे हे थेंब उचलले जातात आणि उंचवटय़ांवरून घरंगळत खाली पडतात. सूर्यप्रकाशात मोत्यासारखे चकाकणारे हे थेंब खाली ओघळताना पानावरची सर्व धूळ, चिखलाचे कणसुद्धा घेऊन जातात आणि पान पुन्हा स्वच्छ आरशासारखे चकाकू लागते. डॉ. बार्थलॉट यांनी कमळाच्या पानाच्या या स्वच्छता मोहिमेतून प्रेरित होत एका विशिष्ट रासायनिक रंगाची निर्मिती केली. इमारतींना दिला जाणारा हा रंग कमळाच्या पानाप्रमाणे स्वत:च स्वत:ची स्वच्छता करतो. आज युरोपात तब्बल साडेतीन लाख इमारतींच्या दर्शनी भागास हा रंग दिला आहे. या इमारतींकडे पाहताना वाटते की नुकताच रंग दिला असावा, मात्र तो असतो काही वर्षांपूर्वी दिलेला. येथील रिमझिम पावसात पावसाचे थेंब या रंगावर न थांबता खाली घरंगळत वाहून जातात आणि सोबत धुळीच्या कणांनाही घेऊन जातात. निसर्गाशी जोडलेले विज्ञान संशोधन नेहमीच आनंद देऊन जाते याचे हे उत्तम उदाहरण आहे.

– डॉ. नागेश टेकाळे

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : www.mavipa.org

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-12-2022 at 03:42 IST

संबंधित बातम्या