अँग्लो इंडियन समाजातील अनेक व्यक्तींनी विविध क्षेत्रांत आपले मोठे योगदान दिले. हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि नर्तिका हेलन हीसुद्धा अँग्लो इंडियनच. हेलन अ‍ॅन रिचर्डसन हिचे वडील जॉर्ज हे अँग्लो इंडियन आणि आई ब्रह्मदेशची. हेलनचा जन्म झाला रंगूनमध्ये १९३८ साली. हेलनला रॉजर हा भाऊ आणि जेनिफर ही बहीण आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हेलनच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे १९४३ साली हेलनची आई मुलांबरोबर मुंबईत येऊन स्थायिक झाली. आई नर्सचे काम करी. तिच्या तुटपुंजा पगारात भागेना म्हणून हेलनची शाळा बंद झाली.

हेलनची अभिनेत्री मत्रीण कुक्कूच्या ओळखीमुळे हेलनला १९५१ साली ‘शबिस्तान’ आणि ‘आवारा’ या चित्रपटांमध्ये समूहनृत्यात काम मिळाले. तिच्या नृत्यातले कसब पाहून अनेक चित्रपटांमध्ये नृत्याभिनयाच्या मागण्या येऊ लागल्या. ‘अलिफलला’ (१९५२), ‘हूर-ई-अरब’ (१९५३) या चित्रपटांत हेलनला प्रथमच एकल नृत्याचे काम मिळाले. १९५८ साली प्रदर्शित झालेल्या ‘हावडा ब्रिज’ या चित्रपटातील गीता दत्तने गायलेल्या ‘मेरा नाम चिन्चिन् चू’ या गीतावर हेलनने केलेल्या नृत्यामुळे ती प्रकाशात आली. ‘गुमनाम’ (१९६५), ‘लहू के दो रंग’ (१९७९) या चित्रपटांतील भूमिकांसाठी हेलनला फिल्मफेअर पुरस्कार मिळाले, तर १९९८ मध्ये याच संस्थेतर्फे कारकीर्द गौरव पुरस्कार देण्यात आला.

भारत सरकारने २००९ मध्ये हेलनला पद्मश्री पुरस्कार देऊन बहुमानित केले. शंभराहून अधिक चित्रपटांमध्ये नृत्याभिनय केलेल्या हेलनने १९८३ साली निवृत्ती स्वीकारली; पण पुढे काही चित्रपटात तिने सहायक अभिनेत्रीचे काम केले आहे.

दिग्दर्शक पी. एन. अरोरा यांच्याशी हेलनने १९५७ मध्ये लग्न केले; परंतु वीस वर्षांनी, १९७७ साली ते विभक्त झाले. पुढे १९८१ मध्ये चित्रपट कथालेखक सलीम खान यांच्याशी तिचा दुसरा विवाह झाला. आता हेलन स्वतचे नाव हेलन खान असे लावते आणि या उभयतांनी मुलगी दत्तक घेतली आहे. तिचे नाव अर्पिता.

सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com