वनस्पती अभ्यासकांसाठी असलेले ग्रंथ आणि पुस्तकांचा परिचय जसा महत्त्वाचा आहे त्याचप्रमाणे हे ग्रंथ आणि पुस्तके लिहिणारे लेखकही महत्त्वाचे आहेत. हे लेखक लौकिक अर्थाने वनस्पतीशास्त्रज्ञ नाहीत. पण त्यांनी लिहिलेल्या पुस्तकात वनस्पतींचे महत्त्व दिलेले असून वनस्पतींविषयी जिव्हाळा निर्माण करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. पर्यायाने निसर्ग संरक्षण व संवर्धनाच्या कार्यात हे मोठे योगदानच म्हणायला हवे.
डॉ. शरदिनी डहाणूकर व्यवसायाने मेडिकल डॉक्टर, त्यांच्या ‘नक्षत्र वृक्ष’ आणि ‘हिरवाई’ या दोन पुस्तकांची एका वेगळ्या दृष्टिकोनातून उपयुक्तता जाणवते. डॉ. श्री. श. क्षीरसागर व्यवसायाने डॉक्टर, त्यांचे ‘बहर’ हे पुस्तक उत्तम माहितीबरोबरच सुंदर छायाचित्रे यासाठी महत्त्वाचे.
श्रीकांत इंगळहळीकर व्यवसायाने मेकॅनिकल इंजिनीअर जवळजवळ ३० वर्षे निसर्गात भ्रमंती करत आहेत. त्यांच्या भ्रमंतीचे फलित ‘फ्लॉव्हर्स ऑफ सह्याद्री’, ‘ए फील्ड गाइड भाग एक व दोन’, यात १२०० वनस्पतींची सचित्र महिती आहे. शास्त्रशुद्ध मांडणी व आकर्षक छायाचित्रांचे तांत्रिक आणि नेटके आरेखन ही या दोन पुस्तकांच्या जमेच्या बाजू. निसर्गभ्रमण करणाऱ्यांमध्ये हे पुस्तक अत्यंत लोकप्रिय आहे. ‘ट्रीज ऑफ पुणे’ हे त्यांचेच अजून एक पुस्तक त्यांनी शर्वरी बर्वे यांच्याबरोबर लिहिले. पुणे शहराला लाभलेल्या वृक्षसंपदेची माहिती प्रस्तुत पुस्तकात दिली आहे. वृक्ष ओळखीसाठी (नेमकी जागा) जीपीएस प्रणालीचा वापर पुस्तकाचे नक्कीच महत्त्व वाढवते.
अशोक कोठारी हेदेखील व्यवसायाने डॉक्टर. त्यांचे ‘कॉफी टेबल पुस्तक’ आणि ‘सेलिब्रेशन ऑफ इंडियन ट्रीज’ उत्तम माहिती आणि स्थिर चित्रण यासाठी महत्त्वाचे. मार्ग पब्लिकेशनने हे पुस्तक प्रसिद्ध केले आहे. श्री. अच्च्युत गोखले प्रशासकीय अधिकारी, वास्तव्य पूर्वोत्तर प्रदेशात. ‘सिग्नेचर फ्लॉवर्स युकेमेरा’ हे त्यांचे थोडक्यात माहिती देणारे पुस्तक आहे.
ज्यांचे लहानपण निसर्गाच्या सान्निध्यात गेले, निसर्गाची आवड जपण्यासाठी ज्यांनी सतत भटकंती केली असे प्रकाश काळे यांचे ‘सफर मुंबईच्या वृक्षतीर्थाची’ हे पुस्तक एका वेगळ्या दृष्टिकोनातून लिहिलेले आहे. नक्षत्र-वृक्षांवरील पुस्तकात वृक्ष आणि माणसांचे जीवन यावर विशेष भर आहे.
– डॉ. सी. एस. लट्ट (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org
फ्योदोर दोस्तोव्हस्की
जुलमी झार राजवट आणि नेपोलियनचे आक्रमण यातून निर्माण झालेल्या सामाजिक परिस्थितीचा परिपोष म्हणून रशियाने जगाला अनेक उत्तमोत्तम लेखक, कवी आणि कादंबरीकार दिले. मॉस्कोत १८२१ मध्ये जन्मलेले फ्योदोर दोस्तोव्हस्की हे त्यापकी एक कादंबरीकार. तत्कालीन वास्तववादाचं एक अत्यंत निराळं स्वरूप त्यांच्या लेखनातून दृग्गोचर होतं. रशियन साहित्यात एकोणिसावं शतक हे वास्तववादी लेखनाचं शतक म्हणून ओळखलं जातं. त्यातून मानवी अंतर्मनाचा वेध घेणारा लेखक म्हणून दोस्तोव्हस्कीचं नाव विश्वविख्यात झालं. दोस्तोव्हस्की यांची ‘पुअर फोक’ ही पहिली कादंबरी १८४६ साली प्रसिद्ध झाली. वरवर सामान्य वाटणाऱ्या एका दरिद्री माणसाच्या अंतर्गत भयगंडाचे वर्णन करणारी ही कादंबरी अल्पकाळातच लोकप्रिय झाली. ‘द डबल’ या १८४६ सालीच प्रसिद्ध झालेल्या कादंबरीत दोस्तोव्हस्कीने दुभंग व्यक्तिमत्त्वाच्या कारकुनी करणाऱ्या व्यक्तीची कहाणी मांडली. पुढे त्यांनी ‘द हाऊस ऑफ द डेड’ ही सबेरियातील कैद्यांच्या यातनामय जीवनावर आधारित कादंबरी लिहिली. त्यांच्या इतर साहित्य कृतींपकी ‘द इन्सल्टेड अॅण्ड द इंज्युअर्ड’, ‘द इडियट’, ‘द पझेस्ड’, ‘क्राइम अॅण्ड पनिशमेंट’ या कादंबऱ्या सर्वोत्तम समजल्या जातात. त्यांच्या बहुतेक कादंबऱ्यांमधील पात्र आत्यंतिक तीव्र भावना असणारी, आपल्यावरील जबाबदाऱ्या पेलताना वाकलेली आणि त्यामुळे घुसमटलेली दिसतात. काही कादंबऱ्यांतली पात्रं गुन्ह्यंमधून वाट शोधणारी किंवा क्रांतिकारी कटकारस्थानं करताना दिसतात. एक तत्त्वज्ञ, विचारवंत आणि सर्जनशील लेखक म्हणून दोस्तोव्हस्कीचा रशियन संस्कृतीवर मोठा प्रभाव पडलेला दिसतो. सुरुवातीच्या काळात ते एका बंडखोर राजकीय गटात सामील होऊन राजकीय आणि सामाजिक बदलासाठी जहाल पत्रक छापू लागले. १८४९ साली त्यांना अटक होऊन देहान्त शासन फर्मावण्यात आलं. गोळ्या घालून मारण्यासाठी सनिकांसमोर उभे करण्यात आल्यावर चमत्कार घडला! झार निकोलसने दोस्तोव्हस्कीला माफ करून चार वर्षांच्या सश्रम कारावासासाठी पाठवले. ही शिक्षा भोगून आल्यावर त्यांनी मॉस्कोत आपल्या नित्यक्रमाला सुरुवात केली. १८८१ साली त्यांचा मृत्यू झाला.
– सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com