डॉ. श्रुती पानसे

‘कल्पना करणं’.. फक्त मानवजातीला मिळालेली मेंदूतली एक सुंदर शक्ती. फार पूर्वी होमो सेपियन्सना आसपास विखुरलेली पानं पाहून ही आपण शरीराला गुंडाळली तर उन्हापावसापासून बचाव होऊ  शकेल असे वाटले, ही कल्पना. लाकडाचे गोल ओंडके होते, त्याच्या चकतीसारख्या आकाराचा उपयोग घरंगळण्यासाठी होतोच आहे तर याचा वापर करून काय करता येईल, याच्या कल्पना. ‘कल्पना’ या शक्तीचं सामर्थ्य मोठं आहे.

आपल्याला सर्वत्र विविध आकार-प्रकारांच्या वस्तू दिसतात, माणसांनी उभी केलेली कामं दिसतात, विविध खेळ, विविध प्रकारच्या संस्कृती, भाषा, वाद्यं, कला, यंत्रं इत्यादी दिसतात. या सर्वाचं मूळ एकच- कल्पना!

माणसाच्या मेंदूत प्रथम एक कल्पना तयार होते. ही कल्पना म्हणजे नेमकं काय असतं? कदाचित ती शब्दांच्या स्वरूपात असेल, कधी एखाद्या चित्राच्या स्वरूपात असेल, तर कधी फक्त विचारांच्या स्वरूपात. या कल्पनेवर काम केलं, ती कृतीत उतरवण्यासाठी प्रयत्न केले, की तिला एक स्व-रूप प्राप्त होतं. हे रूप कशाचं असेल, याच्या शक्यता लाखो आहेत.

या कल्पनेचाही शोध मेंदूशास्त्रज्ञांनी घेतला आहे. कल्पना करायला एक वेगळी प्रतिभा लागते, हा विचार पुढे नेत भामह, दंडी, वामन, रुदट्र अशा अनेक संस्कृत अभ्यासकांनी प्रतिभेची व्याख्या केली आहे. काव्यप्रतिभेला वर्डस्वर्थ यांनी ‘स्पॉन्टॅनिअस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फीलिंग्ज’ मानलं.

आधुनिक यंत्राच्या साहाय्याने जिवंत मेंदूला इलेक्ट्रोड्स लावून संगणकाच्या पडद्यावर पाहिलं असता, कल्पनांचं उगमस्थान आणि प्रवाह दिसला. आपण एखादी प्रतिमा डोळ्यांनी बघतो, त्याची माहिती मेंदूकडे पाठवली जाते. तेव्हा ती मेंदूतल्या ‘ऑक्सीपेटल लोब’मधून ‘परायटल लोब’कडे जात असते. मात्र, कल्पनेच्या बाबतीत उलट प्रक्रिया घडते. कल्पना आधी परायटल लोबमध्ये तयार होते, तिथून ऑक्सीपेटल लोबमध्ये पाठवली जाते. तिथे गेल्यावर ती दृश्य स्वरूपात डोळ्यांना वा मनश्चक्षूंना जाणवते. ही एक विद्युत-रासायनिक प्रक्रिया आहे.  अशा प्रकारे जाणवलेली कल्पना कदाचित सेकंदात विरूनही जाते. अशा विरलेल्या कल्पनांची संख्याही फार मोठी असते. कल्पना सुचली होती; पण पुढे त्याचं काही झालं नाही, असं किती तरी वेळा घडतं. काही कल्पना मात्र पुन:पुन्हा जाणवतात.. अक्षरश: धडका देतात. त्यावर काम करणं भागच पडतं. म्हणून प्रत्येक कल्पनेवर किमान विचार तरी करायला हवा.

contact@shrutipanse.com