सजीवांमधील प्रजननाचा काळ हा तसा नाजूकच. फुलपाखरामधील एक विलक्षण रंजक गोष्ट म्हणजे मादी फुलपाखरांच्या अंडी घालण्याच्या विविध पद्धती. महाराष्ट्राचे राज्य- फुलपाखरू ‘नीलवंत’ म्हणजे ‘ब्लू मॉरमॉन’, याची मादी एकावेळी एक किंवा दोन अंडी घालते. तर ‘कृष्णकमलिनी’ म्हणजे ‘टावनी कोस्टर’ या फुलपाखराची मादी एका वेळेला ५० ते ६० अंडी देते. प्रत्येक मादी आपल्या खाद्य वनस्पतीच्या पानांवर, खोडावर किंवा काटय़ांवर अंडी घालते. फुलपाखराच्या पायांवरील केस, हे त्यांच्या ज्ञानेंद्रियाचे काम करतात. या केसांच्या आधारे फुलपाखराची मादी खाद्य वनस्पती शोधून काढते.

प्रत्यक्ष अंडी देतेवेळी, मादी फुलपाखराच्या शरीरातून एक वेगळ्याच प्रकारचा चिकट द्रव स्रवत असतो. ही अंडी झाडाच्या भागांना घट्ट चिटकून राहण्याकरिता, हे द्रव खूप उपयोगी पडते.  सोसाटय़ाचा वारा, मुसळधार पाऊस, कडाक्याचे ऊन या कशाचाही परिणाम तिने घातलेल्या अंडय़ांवर होत नाही. फुलपाखराची मादी अंडी घालताना साधारणपणे २० ते २५ सेकंदाला एक याप्रमाणे अंडे देत असते, यामध्ये तिची बरीच ऊर्जा खर्च होत असते.

‘चारुलता’ म्हणजे ‘तमिळ योमन’ या  फुलपाखराची मादी झाडांच्या पानांवर मध्यभागी लगोरी रचल्या प्रमाणे एकावर एक अशी साधारणपणे नऊ ते बारा अंडी घालते. काही कालावधीनंतर सर्वात वरील अंडय़ामधून अळी बाहेर येते, त्याच्यानंतर त्याखालील अंडय़ातून अळी बाहेर येते आणि मग एकेक करत वरून खाली याप्रमाणे अंडय़ांमधून अळ्या बाहेर येतात.

‘आरक्तिबदू’ म्हणजे ‘रेडस्पॉट’ या दुर्मीळ फुलपाखराची मादी चक्क मुंग्यांच्या सान्निध्यातच झाडावर अंडे देते, आणि मग या अंडय़ाची देखभाल ज्वालामुंग्या करतात. अर्थात या देखभालीच्या बदल्यात त्यांना भविष्यात त्या अंडय़ामधून बाहेर येणाऱ्या अळीकडून अत्यंत मधुर व पौष्टिक द्रव मिळणार असतो. दुर्मीळ फुलपाखरे आपल्या भावी पिढीचे रक्षण या प्रकारे करतात. मुंग्या आणि रेडस्पॉट फुलपाखरांच्या अळी यांच्यामधली ही नैसर्गिक देवाण-घेवाण ‘एकमेकां साह्न’ करू अवघे धरू सुपंथ’ या संत वाङ्मयांतील ओळींचा पुनप्र्रत्यय देणारीच आहे.

– दिवाकर ठोंबरे मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org