ऋजुता पाटील
केंद्रीय भूमिजल मंडळ या संस्थेचा मुख्य उद्देश भूजल संसाधनांचा शाश्वत विकास व व्यवस्थापन हा आहे. या संस्थेचे मुख्यालय फरिदाबाद, हरियाणा येथे आहे. संस्थेची स्थापना १९७० मध्ये झाली. सुरुवातीच्या काळात संस्थेचे नाव ‘एक्सप्लोरेटरी ट्यूब वेल्स ऑर्गनायझेशन’ असे होते. ही संस्था सुरुवातीला कृषी मंत्रालयाच्या आधिपत्याखाली कार्य करत होती. १९७२ मध्ये केंद्रीय भूमिजल मंडळ ही संस्था ‘भारतीय भूसर्वेक्षण संस्थे’त (जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया) समाविष्ट झाली आणि त्यानंतर १९८२ पासून ती जलसंपदा आणि नदी विकास मंत्रालयाच्या अधीनस्थ आहे.
१९९७ पासून भूजल विकास आणि व्यवस्थापनाचे नियमन या संस्थेद्वारे सुरू झाले. भूजल संसाधनांचा शोध घेणे, मूल्यांकन, संवर्धन, संरक्षण आणि वितरण ही सर्व कामे करताना आर्थिक/ पर्यावरणीय कार्यक्षमता वाढवून पर्यावरणाचा समतोल साधणे ही या मंडळाची जबाबदारी आहे. मंडळाच्या प्रमुख उपक्रमात जलधर नकाशे (अक्विफर मॅपिंग), जलधरांचे पुनर्भरण, भूभौतिकीय अन्वेषण, भूजल गुणवत्ता तपासणी यांचा समावेश होतो. ही कार्ये करण्यासाठी मंडळाने ‘भारत भूजल संसाधन आकलन प्रणाली’, सूचना आणि प्रबंधन प्रणाली तसेच ‘नागरिक पोर्टल- जलसंसाधन माहिती’ इत्यादी सुविधा संकेतस्थळाद्वारे उपलब्ध केल्या आहेत.
अलीकडच्या काळात भारतातील गतिशील भूजल संसाधनांचे राष्ट्रीय माहिती संकलन हा उपक्रम केंद्रीय भूमी जल मंडळाद्वारे राबवण्यात आला. हे मंडळ चार केंद्रांद्वारे काम करते : (१) संशोधनात्मक खनिकर्म आणि सामग्री व्यवस्थापन (एक्स्प्लोरेटरी ड्रिलिंग आणि मटेरिअल मॅनेजमेंट) केंद्र, (२) शाश्वत व्यवस्थापन व संपर्क सर्वेक्षण केंद्र, (३) मूल्यांकन, देखरेख केंद्र, (४) प्रशिक्षण आणि तंत्रज्ञान हस्तांतरण. या प्रत्येक विभागाचे प्रतिनिधित्व एकेक सदस्य करतात. देशातील भूजल विकास नियमनाशी संबंधित विविध उपक्रमांवर देखरेख केली जाते.
भूजल संपत्तीच्या नियोजन आणि व्यवस्थापनाबाबत राज्य आणि वापरकर्त्या संस्थांना सल्ला देण्याबरोबरच केंद्रीय भूमिजल मंडळ वैज्ञानिक भूजल शोध, विकास व व्यवस्थापन यांसाठीही कार्य करते. या मंडळाद्वारे नागरी व ग्रामीण भागात विविध पद्धतीने भूजल पुनर्भरण करण्यास प्रोत्साहन दिले जाते. राष्ट्रीय पातळीवर भूजल विकास धोरणावर काम व अंमलबजावणी करणारी ही सरकारी संस्था आपल्या कार्यपद्धतीत अधिकाधिक सुधारणा करताना दिसत आहे. राष्ट्रीय पातळीवर भूजल संसाधनांचा शाश्वत विकास व व्यवस्थापन करण्यात केंद्रीय भूमिजल मंडळाचा मोलाचा वाटा आहे.
ऋजुता पाटील
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org