कुतूहल: पेशींमधील रासायनिक प्रक्रिया
आपलं शरीर म्हणजे जणू एखादा रासायनिक कारखानाच म्हणायला हवा. एखाद्या रासायनिक कारखान्यात घडाव्यात इतक्या विविध प्रकारच्या आणि इतक्या क्षमतेने आपल्या शरीरात व शरीरातल्या सूक्ष्म पेशींमध्ये रासायनिक अभिक्रिया अविरतपणे घडत असतात. आपल्या शरीरामध्ये असलेल्या पेशीतल्या घटकांची आपण तीन गटांमध्ये विभागणी करू शकतो. हे तीन गट म्हणजे पाणी, असेंद्रिय घटक आणि सेंद्रिय घटक. पेशीत असलेल्या सेंद्रिय घटकांमध्ये कबरेदके, स्निग्ध पदार्थ, प्रथिने, जीवनसत्वे आणि डीएनए, आरएनए यांसारखी न्युक्लिक आम्ले यांचा समावेश होतो; तर असेंद्रिय घटकांमध्ये निरनिराळे क्षार, आयन यांचा समावेश होतो. पेशींचा जवळपास ७० टक्के भाग हा पाण्याने बनलेला असतो. पेशींच्या प्रकारानुसार त्यामध्ये असलेले पाण्याचे प्रमाण कमी-जास्त होते. आपल्या शरीरातल्या लाल रक्तपेशींमध्ये सुमारे ६० टक्के भाग इतक्या प्रमाणात पाणी असते, तर स्नायूंमध्ये पाण्याचे प्रमाण ८० टक्के असते.
हे सगळे घटक पेशींकडून वापरले जातात आणि पचलेल्या अन्नाद्वारे ते पेशींकडून पुन:पुन्हा मिळवलेही जातात. थोडक्यात, शरीरातल्या पेशींमार्फत या घटकांचे चक्रीकरण अव्याहतपणे सुरूच असते. या चक्रीकरणात रासायनिक अभिक्रियांची भूमिका खूप महत्त्वाची असते. या सगळ्या प्रक्रियांमधून टाकाऊ पदार्थही निर्माण होत असतात. हे टाकाऊ पदार्थ, तसेच पेशीमध्ये निर्माण होणारे अतिरिक्त पदार्थ पेशीतून बाहेर टाकले जातात. पेशीआवरणाच्या वैशिष्टय़पूर्ण संरचनेमुळे विशिष्ट प्रमाणात विशिष्ट घटक पेशीत ठेवणे किंवा पेशीबाहेर टाकणे शक्य होते. पेशींमधून बाहेर टाकलेले हे पदार्थ उत्सर्जन यंत्रणेमार्फत शरीराबाहेर टाकले जातात.
एखाद्या पेशीच्या रासायनिक स्वरूपाचे संपूर्ण स्पष्टीकरण देणे कठीण आहे. विविध प्रकारच्या पेशींपकी अतिशय साधी रचना असणाऱ्या जीवाणूंच्या पेशीही रासायनिकदृष्टय़ा क्लिष्ट आहेत. त्यांच्यात जवळपास पाच हजार वेगवेगळ्या प्रकारचे रेणू असतात. अर्थातच, आपल्या शरीरातल्या पेशींमध्ये त्याहूनही कितीतरी जास्त प्रकारचे रेणू असतात. पेशीचे आवरण हे रासायनिक पदार्थासाठी संवेदनक्षम असते. पेशी आवरणाच्या या संवेदन क्षमतेमुळेच कुठलीही चेतासंस्था नसलेल्या जीवाणू, आदिजीव यांसारख्या एकपेशीय सूक्ष्मजीवांना कोणत्या दिशेने हालचाल करायची हे समजू शकते. यामुळेच ते आमिनो आम्ले, शर्करा यांसारख्या पदार्थाकडे आकर्षलेि जातात आणि धोकादायक असलेल्या पदार्थापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रिया लागवणकर (डोंबिवली)
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  
office@mavipamumbai.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chemical process in human cells
First published on: 12-11-2014 at 01:16 IST