आसपासच्या परिस्थितीमुळे स्वभावात बदल होतो का? हा एक गहन प्रश्न आहे. या गहन प्रश्नाची सोडवणूक अनेक विचारवंतांनी आपापल्या पद्धतीने केलेली आहे.

फिलिप झिम्बडरे या नावाच्या एका अमेरिकन मानसशास्त्रज्ञाने याच प्रश्नाच्या मुळापर्यंत जाण्यासाठी एक प्रयोग रचला. या प्रयोगामध्ये त्याने एक खोटा तुरुंग तयार केला. विशीतली चोवीस मुलं त्याने यासाठी निवडली. या २४ तरुण मुलांना कोणतीही गुन्हेगारी पाश्र्वभूमी नव्हती. आणि त्यांचं मानसिक आरोग्य अतिशय चांगलं होतं हे त्यांनी बघून घेतलं. या मुलांपकी काही जणांची नेमणूक तुरुंग रक्षक म्हणून आणि काही जणांची नेमणूक कैदी म्हणून केली. सर्व कैदी २४ तास या तुरुंगात राहणार होते आणि तुरुंग रक्षक दर आठ तासांनी बदलणार होते. हा प्रयोग दोन आठवडे चालणार होता. परंतु तुरुंग रक्षकांच्या अत्यंत वाईट वागणुकीमुळे हा प्रयोग केवळ सहा दिवसांमध्ये बंद करावा लागला. याचं कारण तुरुंग रक्षक मुलांनी कैदी मुलांना फार मानसिक त्रास दिला. या त्रासामुळे कैदी मुलांमध्ये भावनिक ताणतणाव आणि चिंतेचं प्रमाण भयानक वाढलं. सर्व प्रयोगावर छुप्या कॅमेऱ्याद्वारा नजर ठेवण्यात येत होती.

या प्रयोगाबद्दल फिलिप झिम्बडरे म्हणतात :  केवळ सहा दिवसानंतर हा प्रयोग बंद करावा लागला. कारण या गोष्टी माझ्या नियंत्रणाच्या बाहेर गेल्या.

असं का घडलं? याचं कारण तुरुंग रक्षकांना कैद्यांवर नजर ठेवायचं काम दिल्यावर त्यांच्याकडून माणूसपणाच्या सीमा ओलांडल्या गेल्या. आपण खोटे खोटे तुरुंगरक्षक आहोत याची जाणीव ठेवली गेली नाही. तेच कैद्यांच्या बाबतीतही झालं. आपण केवळ एका प्रयोगापुरते कैदी बनलो आहोत हा विचार मागे पडला. आणि माणसं आपल्याला इतकी अपमानास्पद वागणूक कशी देऊ शकतात, या छळवणुकीला रोज सामोरं जावं लागल्यामुळे त्यांच्यामध्ये ताणतणाव निर्माण झाले.

रागीट आणि दुसऱ्यांना अपमानास्पद वागणूक देणाऱ्या स्वभावाच्या माणसांबरोबर इतर माणसं राहतात, तेव्हा त्यांच्या स्वभावातही बदल होऊ शकतो हे या प्रयोगाने दाखवून दिलं. घरात, ऑफिसमध्ये, शाळेत, पाळणाघरात कुठेही हे घडू शकतं. आणि  माणसांच्या मेंदूवर अशा घटनांचा अतिशय सखोल परिणाम होतो हेच त्यातून शिकण्यासारखी गोष्ट आहे.

– डॉ. श्रुती पानसे

contact@shrutipanse.com