कपडे भिजवताना चमक येण्यासाठी वापरण्यात येणारा ऑप्टिकल ब्राइटनर प्रमाणाबाहेर जास्त घातल्यास किंवा हा ब्राइटनर इतर रसायनांशी संयोग पावणारा असेल तरी कपडे पिवळे पडतात. कपडे धुण्याकरिता वापरलेल्या निर्मलकात (डिर्टजट) लोहाची मात्रा जास्त असेल तर, तसेच निर्मलक आणि ऑप्टिकल ब्राइटनर एकत्र टाकले गेले तरीही कपडा पिवळा पडतो. ओल्या कपडय़ावर इस्त्री केल्यास, निर्मलकात जास्त प्रमाणात आम्लारी असल्यास, पाणी कठीण असल्यास कपडे पिवळे पडतात. अतिशय मळलेला कपडा इतर नेहमीच्या कपडय़ाबरोबर एकत्र भिजवला जाऊन धुवायला गेला तर काळपट पिवळे डाग पडतात, ते निघायला अवघड असतात. पांढऱ्या कपडय़ावर रंगीत बॉर्डर असेल तर किंवा पांढरे व रंगीत कपडे एकत्र धुतल्यास त्या रंगाचा परिणाम होऊ शकतो किंवा कपडे पिवळे/ काळपट पडू शकतात. नीळ जास्त प्रमाणात वापरल्यास तसेच चिखलाचे डाग कपडय़ावर पडल्यासही कपडे पिवळे पडतात. घामाने भिजलेले कपडे फार वेळ न धुतल्यास, खाण्याचे पदार्थ कपडय़ावर सांडल्यास किंवा रक्ताचा डाग कपडय़ावर पडल्याससुद्धा कपडे पिवळे पडू शकतात.
या खेरीज घाम येऊ न देण्याची रसायने वापरणाऱ्या व्यक्तींचे कपडे पिवळे पडू शकतात. तसेच सुगंधी फवारा कापडावर राहिल्यासही कपडे पिवळे पडू शकतात. याकरिता हे कपडे अंगावरून काढल्याबरोबर लगेच धुवावेत म्हणजे कपडे पिवळे पडण्याचा धोका कमी करता येतो. या सर्व बाबी लक्षात घेता निर्मलक, नीळ, ऑप्टिकल ब्राइटनर इत्यादी सर्व चांगल्या दर्जाचे आणि योग्य प्रमाणात वापरले पाहिजेत. रंगीत व पांढरे कपडे एकत्र भिजवू किंवा धुऊ नयेत. कठीण पाण्याचा वापर कपडे धुवायला करू नये. कपडय़ानुसार योग्य प्रकारे इस्त्री करायला हवी. खूप मळलेले कपडे आणि नेहमीच्या वापराने मळलेले कपडे एकत्र धुऊ नयेत. तसेच स्प्रेच्या वापरानंतर कपडे लगेच धुणे कधीही चांगले, म्हणजेच अशी काळजी आपण घेतली तर आपले कपडे पिवळे पडण्यावर नियंत्रण आणू शकतो. कोणताही डाग पडल्यास ताबडतोब त्या कपडय़ाची धुलाई केली तर बऱ्याच वेळा हे डाग निघून जातात, याकडेही लक्ष द्यायला हवे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विजय रोद्द (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cloth washing tips
First published on: 09-11-2015 at 01:26 IST