इंटरनेट म्हणजे जगभर पसरलेल्या अनेक संगणकांना जोडून त्यांचे एक भलेमोठे वैश्विक जाळे (नेटवर्क) बनवणारे तंत्रज्ञान. या जाळ्यातील संगणक माहितीची एकमेकांत देवाण-घेवाण करतात. मॅसेच्युसेट्स विद्यापीठातील जोसेफ लिकलाइडर या संगणकतज्ज्ञाने १९६२ साली मांडलेल्या ‘गॅलेक्टिक नेटवर्क’च्या संकल्पनेनुसार माहितीची ही देवाण-घेवाण जागतिक स्तरावर, आणि तीही कुठल्याही संगणकाकडून कुठल्याही संगणकाकडे होणे अभिप्रेत होते. त्या काळी एका संगणकावरून दुसऱ्या संगणकावरील माहिती ही एकसंध स्वरूपात दूरध्वनीच्या लाइनवरून पाठवली जात असे. ही माहिती पाठवताना अनेक वेळा संपर्क खंडित होऊन माहिती पाठवण्यास पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करावी लागायची. या अडचणींतून जन्म झाला तो छोटय़ा ‘पॅकेट’च्या स्वरूपात डेटा पाठवण्याच्या कल्पनेचा. डेटाच्या प्रत्येक छोटय़ा पॅकेटमध्ये पाठवणाऱ्याचे ‘नाव’, ज्याला पॅकेट पाठवायचे त्याचे ‘नाव’ आणि त्या पॅकेटचा क्रमांक इतकी माहिती त्या पॅकेटबरोबर आवश्यक असणार होती. पॅकेटच्या क्रमांकामुळे, ही माहिती ज्याला पाठवली त्याला ती माहिती व्यवस्थित जुळवलेल्या क्रमाने मिळू शकणार होती. यामुळे माहितीच्या प्रक्षेपणात खंड पडला तरी अडचण येणार नव्हती.
‘अर्पानेट’ या नावे ओळखल्या गेलेल्या या जाळ्यातला पहिला संगणक कॅलिफोर्निया (लॉस एंजलिस) विद्यापीठात होता, तर दुसरा संगणक स्टॅनफर्ड विद्यापीठात होता. २९ ऑक्टोबर १९६९ रोजी या जाळ्याद्वारे पहिला संदेश कॅलिफोर्निया विद्यापीठातून स्टॅनफर्ड विद्यापीठात पाठवला गेला. त्यानंतर एका महिन्यातच कॅलिफोर्निया (सांता बार्बरा) विद्यापीठातील आणि युटा विद्यापीठातील संगणकही या जाळ्यात सामील झाल्याने, या जाळ्याचा विस्तार होऊ लागला. या अर्पानेट संगणकीय जाळ्यातूनच वैयक्तिक स्वरूपाचा पहिला संदेश- म्हणजे ‘ईमेल’ १९७२ साली पाठवला गेला. १९७३ साली इंग्लंडमधील युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडन आणि नॉर्वेची रॉयल रडार एस्टॅब्लिशमेंट या संस्थांचे संगणकही या अर्पानेटमध्ये सहभागी झाल्याने, या जाळ्याला जागतिक स्वरूप येण्यास सुरुवात झाली. १९७४ साली ‘टेलिनेट’ ही व्यावसायिक स्वरूपाची कंपनी सुरू होऊन व्यावसायिक स्वरूपाचे जाळेही अस्तित्वात आले. ‘सर्न’ या युरोपीय संशोधन संस्थेने १९९१ साली आपल्या ‘वर्ल्ड वाइड वेब’ या जाळ्याची सर्वसामान्यांना ओळख करून दिली. त्यानंतर एका दशकातच या सर्व जाळ्यांनी एकत्रितपणे महाजाळ्याचे स्वरूप धारण केले. १९९५ सालापासून हे महाजाळे ‘इंटरनेट’ म्हणून ओळखले जाऊ लागले!
– मकरंद भोंसले
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org