बायझंटाइन शहराचे कॉन्स्टंटिनोपल असे नामांतर करून ३९५ साली सम्राट कॉन्स्टंटाइन याने पूर्व रोमन साम्राज्य स्थापन केले. इ.स. १४५३ पर्यंत सत्तेवर टिकलेले हे साम्राज्य जगातील सर्वाधिक काळ टिकलेल्या मोजक्या साम्राज्यांपकी एक समजले जाते. कॉन्स्टंटाइन हा ख्रिस्ती धर्मातर केलेला पहिला रोमन सम्राट. सेंट इरिन हे पूर्वेकडचे पहिले चर्च त्याने बांधले. साम्राज्याचे नाव बायझंटाइन एम्पायर असे झाले. १४५३ साली फते सुलतान मेहमत या तुर्की टोळी प्रमुखाने आक्रमण करून दुबळे झालेले बायझंटाइन साम्राज्य उद्ध्वस्त केले. ही घटना जागतिक इतिहासात महत्त्वाची ठरली, तिने इतिहासाला वेगळेच वळण दिले. तत्पूर्वीची अकरा शतके रोमन आणि ख्रिश्चन संस्कृतीत वाढलेले बायझंटाइन शहर; नवीन सत्ताधारी ओटोमन सम्राटांनी पुढच्या दोन शतकांमध्ये त्याचे इस्लामीकरण करून पूर्णपणे बदलून टाकले. बायझंटाइन हे ग्रीक नाव बदलून त्याचे ‘इस्लामबूल’ केले. त्याचे पुढे इस्तंबूल झाले ते आजतागायत. इस्लामबूल हे नाव ग्रीक भाषेतील ‘इस टिन पोलीन’ म्हणजे शहराकडे जाण्याचा मार्ग आणि तुर्की भाषेत ‘इस्लामबूल’ म्हणजे इस्लामची नगरी या दोन शब्दांवरून बनले आहे. ओटोमन सुलतानांनी पंधराव्या सोळाव्या शतकात येथे भव्य प्रासाद, मशिदी बांधून बगिच्यांनी शहराचे सुशोभीकरण केले. या काळात इस्तंबूल शहर जगातले एक प्रमुख सांस्कृतिक, राजकीय, व्यापारी आणि इस्लामधर्मीय केंद्र म्हणून उदय पावले. आसपासच्या प्रदेशातल्या लोकांनी रोजगारासाठी, व्यवसायासाठी इस्तंबूलकडे मोठय़ा प्रमाणात स्थलांतर केल्यामुळे पंधराव्या शतकाच्या मध्यावर इथली लोकसंख्या पाच लाखांवर पोहोचली!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ओटोमान साम्राज्य पुढे पहिल्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर संपले. महायुद्ध समाप्तीनंतर १९२३ पर्यंत इस्तंबूल आणि तुर्कस्तान दोस्त राष्ट्रांच्या हातात होते. अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतर १९२३ मध्ये या प्रदेशात आतातुर्क ऊर्फ केमाल पाशा याने या प्रदेशात तुर्की प्रजासत्ताक स्थापन करून त्याची राजधानी अंकारा येथे केली. सध्या तुर्कस्तानचे प्रमुख आíथक, औद्योगिक, सांस्कृतिक केंद्र असलेल्या इस्तंबूलची लोकसंख्या सवा कोटीहून अधिक आहे.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

 

 

प्रा. टी. व्ही. देसीकाचारी

प्राध्यापक थमारप वेदांत देसीकाचारी यांचा जन्म तिरुपती या ठिकाणी १८ सप्टेंबर १९१९ साली झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण तिरुपती येथील िहदू हायस्कूलमध्येच झाले; नंतर त्यांनी ‘प्रेसिडेंन्सी कॉलेज’ मद्रास येथून १९४४ साली एम.एस्सी. आणि १९५१ साली पीएच.डी. पदवी मिळवली. या पदवीसाठी त्यांना एम.ओ.पी. अय्यंगार यांचे मार्गदर्शन लाभले. प्राध्यापक देसीकाचारी यांनी प्रथम आंध्र विद्यापीठात डेमॉन्स्ट्रेटर आणि त्यानंतर साहाय्यक प्राध्यापक म्हणून काम केले. मद्रास विद्यापीठात त्यांनी ज्युनियर लेक्चररची जबाबदारी आणि सागर विद्यापीठात लेक्चररची जबाबदारी पार पाडली. पुन्हा मद्रास विद्यापीठात १९५७ साली साहाय्यक प्राध्यापक म्हणून रुजू झाले. १९६३ साली डी.एस्सी. पदवी संपादन केली व विद्यापीठात प्राध्यापक झाले.

प्राध्यापक देसीकाचारी यांनी शैवाल या विषयाच्या विविध शाखांमध्ये संशोधन करून शोधपत्र प्रसिद्ध केले. त्यांनी संपादित व प्रसिद्ध केलेली पुस्तके विशेष उल्लेखनीय आहेत.  मोनोग्राफ ऑफ सायनोफायटा, टेक्सॉनॉमी अ‍ॅण्ड बॉयलॉजी ऑफ ब्लू ग्रीन अल्गी, मरीन प्लान्ट अ‍ॅण्ड वॉल्वोकेलस, अ‍ॅटलास ऑफ इंडियन डायएटमस  हे त्यांचे उच्च दर्जाचे कार्य म्हणून मान्यता मिळवून गेले. त्यांनी त्यांच्या गुरूंचे अपूर्ण राहिलेले काम हाती घेतले आणि कॉन्ट्रिब्युशन टू अवर नॉलेज ऑफ साउथ इंडियन अल्गी या ग्रंथातून प्रसिद्ध केले. १९६७ सालापासून प्राध्यापक देसीकाचारी यांनी त्यांच्या गुरूंची शैवाल अभ्यासाची परंपरा नेटाने पुढे नेली.

प्राध्यापक देसीकाचारी यांनी शैवाल कल्चर साठवून ठेवण्याचे केंद्र स्थापन करणारे ते पहिले भारतीय होते. त्यांनी इलेक्ट्रॉनिक सूक्ष्मदर्शक यंत्राचा उपयोग करून ‘डायअ‍ॅटमस’चा अभ्यास केला. त्याचा उपयोग नंतर वर्गीकरणाच्या अभ्यासासाठी झाला. नील-हरित शैवालाच्या न्युमेरिकल टेक्सॉनॉमीवर काम करणारे ते पहिले वनस्पती शास्त्रज्ञ होते. १९७० साली त्यांनी नील-हरित शैवाल आणि १९७४ साली टेक्सॉनॉमी या विषयावर आंतराष्ट्रीय परिषद घडवून आणली. ते इंडियन अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्स, इंडियन नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्स आणि फायकॉलॉजी सोसायटी ऑफ इंडिया यांचे फेलो होते. त्यांच्या प्रदीर्घ कार्याबद्दल २००५ साली दर्बान येथे फायकोलॉजिकल काँग्रेसमध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला.

डॉ. सी. एस. लट्टू

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

 

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Constantine the great ruler
First published on: 09-09-2016 at 02:33 IST